उपासना

Samas 9

समास ९ - समास नववा : साधकनिरूपण

समास ९ - दशक ५

समास नववा : साधकनिरूपण ॥ श्रीराम ॥

मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन । आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १॥

अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग । तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥२॥

जो संतांसि शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रन्थांतरीं ॥ ३॥

उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें करी साधन । या नांव साधक ॥ ४॥

धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी । मननें अर्थांतर काढी । या नांव साधक ॥ ५॥

होतां सारासार विचार । ऐके हो‍ऊनि तत्पर । संदेह छेदूनि, दृढोत्तर- । आत्मज्ञान पाहे ॥ ६॥

नाना संदेहनिवृत्ती- । व्हावया, धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसी आणी ॥ ७॥

देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी । श्रवण मन केलेंचि करी । या नांव साधक ॥ ८॥

विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥ ९॥

तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी । लावी ऐक्यतेची समाधी । या नांव साधक ॥ १०॥

आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार । विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११॥

उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरूपणें । बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव साधक ॥ १२॥

असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली । स्वरूपस्थिती बळावली । या नांव साधक ॥ १३॥

अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास । स्वरूपीं लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४॥

दृढ निश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे । सदा स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५॥

प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं । आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥ १६॥

जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ॥ १७॥

जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहातांचि अंध करी । तें साधी नाना परी । या नांव साधक ॥ १८॥

जें साधूं जाता साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना । तेंचि अनुभवें आणी मना । या नांव साधक ॥ १९॥

जेथें मनचि मावळे । जेथे तर्कचि पांगुळे । तेंचि अनुभवा आणी बळें । या नांव साधक ॥ २०॥

स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें । तेंचि वस्तु होये आंगें । या नांव साधक ॥ २१॥

अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । कांहींच नहोन असणें । या नांव साधक ॥ २२॥

परती सारून उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी । स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३॥

देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ । साध्यचि होये तत्काळ । या नांव साधक ॥ २४॥

विवेकबळें गुप्त जाला । आपेंआप मावळला । दिसतो, परी देखिला । नाहींच कोणीं ॥ २५॥

मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें । तुर्येसहि वोलांडिलें । या नांव साधक ॥ २६॥

पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी । अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७॥

द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला । देहीं असोनि विदेह जाला । या नांव साधक ॥ २८॥

जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेहनिवृत्ती । या नांव साधक ॥ २९॥

पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३०॥

स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतास नाहीं आलें । सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१॥

मायेचें जें प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२॥

निद्रा सांडूनि चे‍इरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला । माया सांडून तैसा गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३॥

ऐसि अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली । संसारौपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४॥

कामापासूनि सुटला । क्रोधापासूनि पळाला । मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५॥

कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें । परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६॥

अविद्येपासूनि फडकला । प्रपञ्चापासूनि निष्टला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥

थोरपणासि पाडिलें । वैभवासि लाथाडिलें । महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८॥

भेदाचा मडगा मोडिला । अहंकार झोडूनि पाडिला । पा‍ईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥

विकल्पाचा केला वधू । थापें मारिला भवसिंधू । सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४०॥

भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें । मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१॥

देह समंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२॥

अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें । पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३॥

गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थीं घातला । अनर्थ तोही निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४॥

मोहासि मध्येंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें । शोकासि खंडून सांडिलें । एकीकडे ॥ ४५॥

द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी । धाकें उदर तडाडी । कुतर्काचे ॥ ४६॥

ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चयो बळावला । अवगुणांचा संव्हार केला । वैराग्यबळें ॥ ४७॥

अधर्मास स्वधर्में लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झुगटिलें । लांटुन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८॥

तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला । विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९॥

कोपावरी घालणें घातलें । कापट्य अन्तरीं कुटिलें । सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५०॥

प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग । निवृत्तिपंथें ज्ञानयोग । साधिता जाहला ॥ ५१॥

विषयमैंदासि सिंतरिलें । कुविद्येसी वेढा लाविलें । आपणास सोडविलें । आप्ततस्करांपासूनी ॥ ५२॥

पराधीनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला । दुराशेचा त्याग केला । येकायेकीं ॥ ५३॥

स्वरूपीं घातलें मना । यातनेसि केली यातना । साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४॥

अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला । प्रेत्न सांगातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५॥

सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्यविवेक । संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६॥

बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार । शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७॥

विसरास विसरला । आळसाचा आळस केला । सावध नाहीं दुश्चित्त झाला । दुश्चित्तपणासी ॥ ५८॥

आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरूपणें । तो साधक ऐसा येणें- । प्रमाणें बुझावा ॥ ५९॥

बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणोनि साधक बोलिजे । आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६०॥

येथें संशयो उठिला । निस्पृह तोचि साधक जाहला । त्याग न घडे संसारिकाला । तरि तो साधक नव्हे कीं ॥ ६१॥

ऐसें श्रोतयाचें उत्तर । त्याचें कैसें प्रत्युत्तर । पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधकलक्षणनिरूपण नाम समास नववा ॥ ९॥

20px