Samas 1
समास 1 - समास पहिला : देवशोधन
समास 1 - दशक ६
समास पहिला : देवशोधन
॥ श्रीराम ॥
चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥
कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी ।
न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥
म्हणौनि ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें ।
म्हणिजे होय श्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३॥
प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४॥
म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी एक तरी नायक ।
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५॥
त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी ।
तेथें न करितां चोरी । अंगीं लागे ॥ ६॥
याकारणें जो शहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा ।
ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७॥
ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती ।
देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८॥
राष्ट्राचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा ।
महाराजांचाही राजा । तो चक्रवर्ती ॥ ९॥
एक नरपती एक गजपती । एक हयपती एक भूपती ।
सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजा ॥ १०॥
असो ऐशिया समस्तां । एक ब्रह्मा निर्माणकर्ता ।
त्या ब्रह्म्यासही निर्मिता । कोण आहे ॥ ११॥
ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर ।
तो ओळखावा परमेश्वर । नाना यत्नें ॥ १२॥
तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना ।
ब्रह्माण्डनायका चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३॥
जेणें संसारीं घातलें । अवघें ब्रह्माण्ड निर्माण केलें ।
त्यासी नाहीं ओळखिलें । तोचि पतित ॥ १४॥
म्हणोनि देव ओळखावा । जन्म सार्थकचि करावा ।
न कळे तरी सत्संग धरावा । म्हणजे कळे ॥ १५॥
जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।
जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६॥
चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।
तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधू ॥ १७॥
जो जनांमध्ये वागे । परी जनांवेगळी गोष्टी सांगे ।
ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधू ॥ १८॥
जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासींच म्हणावें ज्ञान ।
त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९॥
पोट भरावयाकारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।
त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २०॥
देव ओळखावा एक । तेंचि ज्ञान तें सार्थक ।
येर अवघेंचि निरर्थक । पोटविद्या ॥ २१॥
जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।
पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२॥
एवं पोट भरावयाची विद्या । तियेसी म्हणों नये सद्विद्या ।
सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३॥
ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन ।
तयापासीं समाधान । पुशिलें पाहिजे ॥ २४॥
अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांपडेल ज्ञान ।
करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचें ॥ २५॥
रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला ।
निर्बळापाशीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६॥
पिशाच्यापाशीं पिशाच गेलें । तेथें कोण सार्थक झालें ।
उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणू ॥ २७॥
भिकायापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं मागतां दीक्षा ।
उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८॥
अबद्धापाशीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबद्ध ।
बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९॥
देह्यापाशीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही ।
म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३०॥
याकारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा ।
सारासारविचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१॥
हरि ॐ तत्सत् । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥