Samas 3
समास 3 - समास तिसरा : मायोद्भवनिरूपण
समास 3 - दशक ६
समास तिसरा : मायोद्भवनिरूपण
॥ श्रीराम ॥
निर्गुण आत्मा तो निश्चळ । जैसें आकाश अंतराळ ।
घन दाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १॥
जें खंडलेंचि नाहीं अखंड । जें उदंडाहूनि उदंड ।
जें गगनाहूनि वाड । अति सूक्ष्म ॥ २॥
जें दिसेना ना भासेना । जें उपजेना ना नासेना ।
जें येईना ना जाईना । परब्रह्म तें ॥ ३॥
जें चळेना ना ढळेना । जें तुटेना ना फुटेना ।
जें रचेना ना खचेना । परब्रह्म तें ॥ ४॥
जें सन्मुखचि सर्वकाळ । जें निष्कलंक आणि निखळ ।
सर्वांतर आकाश पाताळ । व्यापूनि असे ॥ ५॥
अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे तें माया सगुण ।
सगुण आणि निर्गुण । कालवलें ॥ ६॥
या कर्दमाचा विचार । करूं जाणती योगीश्वर ।
जैसें क्षीर आणि नीर । राजहंस निवडिती ॥ ७॥
जड सकळ पंचभौतिक । त्यामध्यें आत्मा व्यापक ।
तो नित्यानित्यविवेक । पाहतां कळे ॥ ८॥
उंसामधील घेईजे रस । येर तें सांडिजे बाकस ।
तैसा जगामध्यें जगदीश । विवेकें ओळखावा ॥ ९॥
रस नाशवंत पातळ । आत्मा शाश्वत निश्चळ ।
रस अपूर्ण आत्मा केवळ । परिपूर्ण जाणावा ॥ १०॥
आत्म्यासारिखें एक असावें । मग तें दृष्टांतासि द्यावें ।
दृष्टांतमिसे समजावें । कैसें तरी ॥ ११॥
ऐशी आत्मस्थिति संचली । तेथें माया कैशी झाली ।
जैशी आकाशीं वाहिली । झुळूक वायूची ॥ १२॥
वायूपासून तेज झालें । तेजापासून आप निपजलें ।
आपापासून आकारलें । भूमंडळ ॥ १३॥
भूमंडळापासून उत्पत्ती । जीव नेणों झाले किती ।
परंतु ब्रह्म आदि अंतीं । व्यापून आहे ॥ १४॥
जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें अवघेंचि नासलें ।
परी मुळीं ब्रह्म तें संचलें । जैसें तैसें ॥ १५॥
घटापूर्वीं आकाश असे । घटामध्येंही आकाश भासे ।
घट फुटतां न नासे । आकाश जैसें ॥ १६॥
तैसें परब्रह्म केवळ । अचळ आणि अढळ ।
मध्यें होत जात सकळ । सचराचर ॥ १७॥
जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें आधीं ब्रह्में व्यापिलें ।
सर्व नासतां उरलें । अविनाश ब्रह्म ॥ १८॥
ऐसें ब्रह्म अविनाश । तें सेविती ज्ञाते पुरुष ।
तत्त्वनिरसनें आपणास । आपण लाभे ॥ १९॥
तत्त्वें तत्त्व मेळविलें । त्यासि देह ऐसें नाम ठेविलें ।
तें जाणते पुरुषीं शोधिलें । तत्त्वें तत्त्व ॥ २०॥
तत्त्वझाडा निःशेष होतां । तेथें निमाली देहाहंता ।
निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता । विवेकें जाहली ॥ २१॥
विवेकें देहाकडे पाहिलें । तों तत्त्वें तत्त्व ओसरलें ।
आपण कांहीं नाहीं आलें । प्रत्ययासी ॥ २२॥
आपला आपण शोध घेतां । आपुली तों मायिक वार्ता ।
तत्त्वांतीं उरलें तत्त्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३॥
आपणाविण निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म ।
तत्त्वासरिसा गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४॥
मीपण पाहतां आढळेना । निर्गुण ब्रह्म तें चळेना ।
आपण तेंचि परी कळेना । सद्गुरूविण ॥ २५॥
सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें ।
पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६॥
आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळामध्यें व्यापिलें ।
सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७॥
होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार ।
आपला आपणासि विचार । ठायीं पडे ॥ २८॥
आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।
मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९॥
झालिया तत्त्वांचें निरसन । निर्गुण आत्माचि आपण ।
कां दाखवावें मीपण । तत्त्वनिरसनाउपरी ॥ ३०॥
तत्त्वांमध्यें मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें ।
सोहंभावें प्रत्यया आलें । आत्मनिवेदन ॥ ३१॥
आत्मनिवेदन होतां । देवभक्तांस ऐक्यता ।
साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२॥
निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पाप पुण्य ।
निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३॥
तत्त्वीं वेंटाळूनि घेतला । प्राणी संशयें गुंडाळला ।
आपणास आपण भुलला । कोहं म्हणे ॥ ३४॥
तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सोहं ।
अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५॥
याउपरि उर्वरित । तेंचि स्वरूप संत ।
देहीं असोनि देहातीत । जाणिजे ऐसा ॥ ३६॥
संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे ॥
आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७॥
हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मायोद्भवनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥