उपासना

Samas 4

समास 4 - समास चौथा : ब्रह्मनिरूपण

समास 4 - दशक ६

समास चौथा : ब्रह्मनिरूपण॥ श्रीराम ॥

कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र । त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र ।

द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र । आतां कलियुग ऐका ॥ १॥

कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र । चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र ।

ऐशीं चतुर्युगें सहस्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २॥

ऐसे ब्रह्मे सहस्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका ।

विष्णू सहस्र होतां ऐका । पळ एक ईश्वराचें ॥ ३॥

ईश्वर जाय सहस्र वेळ । तैं शक्तीचें अर्ध पळ ।

ऐशी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४॥

चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् ।

पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥

विष्णोरेकः सहस्राणि पलमेकं महेश्वरम् ।

महेश्वरसहस्राणि शक्तेरर्धं पलं भवेत् ॥

ऐशा अनन्त शक्ती होती । अनंत रचना होती जाती ।

तरी अखंड खंडेना स्थिति । परब्रह्माची ॥ ५॥

परब्रह्मासि कैंची स्थिती । परी ही बोलावयाची रीती ।

वेदश्रुती नेति नेति म्हणती । परब्रह्मीं ॥ ६॥

चार सहस्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहाटी ।

उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७॥

चार लक्ष सत्तावीस सहस्र । दोनशें चाळीस संवत्सर ।

पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८॥

ऐसें रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर ।

पाहतां येथींचा विचार । अंत न लगे ॥ ९॥

एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर ।

एक म्हणती शक्ति थोर । सकळांमध्यें ॥ १०॥

ऐसे आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं ।

यद्दृष्टं तन्नष्टं हें श्रुति । बोलतसे ॥ ११॥

आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां ।

याचा निश्चयो निवडेना । साधुविण ॥ १२॥

साधु निश्चयो करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक ।

येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३॥

चित्रीं लिहिली सेना । त्यांत कोण थोर कोण साना ।

हें कां तुम्ही विचाराना । आपुलें ठायीं ॥ १४॥

स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरही कल्पिलें ।

परंतु जागें झालिया झालें । कैसें पहा ॥ १५॥

पाहतां जागृतीचा विचार । कैंचें लहान कैंचें थोर ।

झाला अवघाचि विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६॥

अवघाचि मायिक विचार । कैंचें लहान कैंचें थोर ।

लहानथोराचा हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७॥

जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतचि मेला ।

परी याचा विचार पाहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८॥

जयां झालें आत्मज्ञान । तेचि थोर महाजन ।

वेद शास्त्रें पुराण । साधु संत बोलिले ॥ १९॥

एवं सकळांमध्यें थोर । तो एकचि परमेश्वर ।

तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २०॥

तो निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार ।

स्थानमानांचा विचार । ऐलिकडे ॥ २१॥

नांव रूप स्थान मान । हा तों अवघाचि अनुमान ।

तथापि होईल निदान । ब्रह्मप्रळयीं ॥ २२॥

ब्रह्म प्रळयावेगळें । ब्रह्म नामरूपावेगळें ।

ब्रह्म कोणा एक्या काळें । जैसें तैसें ॥ २३॥

करिती ब्रह्मनिरूपण । जाणती ब्रह्म संपूर्ण ।

तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४॥

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥

20px