उपासना

Samas 5

समास 5 - समास पाचवा : मायाब्रह्मनिरूपण

समास 5 - दशक ६

समास पाचवा : मायाब्रह्मनिरूपण॥ श्रीराम ॥

श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें ।

श्रोत्या वक्त्या चे मिषें । निरूपण ऐका ॥ १॥

ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार ।

ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥ २॥

ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ ।

ब्रह्म निरुपाधि केवळ । माया उपाधिरूप ॥ ३॥

माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना ।

माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४॥

माया रचे ब्रह्म रचेना । माया खचे ब्रह्म खचेना ।

माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५॥

माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना ।

माया धरे ब्रह्म धरेना । धारणेसी ॥ ६॥

माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना ।

माया विटे ब्रह्म विटेना । अविट तें ॥ ७॥

माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म कांहींच न करी ।

माया नाना रूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८॥

माया पंचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक ।

मायाब्रह्माचा विवेक । विवेकी जाणती ॥ ९॥

माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।

माया अर्ति पारावार । ब्रह्मासि नाहीं ॥ १०॥

सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिति आच्छादिली ।

परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११॥

गोंडाळ सांडून नीर घेइजे । नीर सांडून क्षीर सेविजे ।

माया सांडून अनुभविजे । परब्रह्म तैसें ॥ १२॥

ब्रह्म आकाशा ऐसें निवळ । माया वसुंधरा डहुळ ।

ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरूप ॥ १३॥

ब्रह्म तें अप्रत्यक्ष असे । माया ते प्रत्यक्ष दिसे ।

ब्रह्म तें समचि असे । माया ते विषमरूप ॥ १४॥

माया लक्ष्य ब्रह्म अलक्ष्य । माया साक्ष ब्रह्म असाक्ष ।

मायेमध्यें दोन्ही पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं ॥ १५॥

माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत । माया असत् ब्रह्म सत् ।

ब्रह्मासि नाहीं करणें हित । मायेसि आहे ॥ १६॥

ब्रह्म अखंड घनदाट । माया पंचभौतिक पोंचट ।

ब्रह्म तें निरंतर निघोट । माया ते जुनी जर्जरी ॥ १७॥

माया घडे ब्रह्म घडेना । माया पडे ब्रह्म पडेना ।

माया विघडे ब्रह्म विघडेना । जैसें तैसें ॥ १८॥

ब्रह्म असतचि असे । माया निरसितांच निरसे ।

ब्रह्मास कल्पांत नसे । मायेसि असे ॥ १९॥

माया कठिण ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म विशाळ ।

माया नसे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २०॥

वस्तु नव्हे बोलिजे ऐशी । माया जैशी बोलिजे तैशी ।

काळ पावेना वस्तूसी । मायेसी झडपी ॥ २१॥

नाना रूप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग ।

माया भंगे ब्रह्म अभंग । जैसें तैसें ॥ २२॥

आतां असो हा विस्तार । चालत जातें सचराचर ।

तितुकी माया परमेश्वर । सबाह्य अभ्यंतरीं ॥ २३॥

सकळ उपाधींवेगळा । तो परमात्मा निराळा ।

जळीं असोन नातळे जळा । आकाश जैसें ॥ २४॥

मायाब्रह्मांचें विवरण । करितां चुके जन्ममरण ।

संतांसि गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५॥

अरे या संतांचा महिमा । बोलावया नाहीं सीमा ।

जयांचेनि जगदात्मा । अंतरींच होय ॥ २६॥

हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

मायाब्रह्मनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥

20px