Samas 8
समास 8 - समास आठवा : दृश्यनिरूपण
समास 8 - दशक ६
समास आठवा : दृश्यनिरूपण॥ श्रीराम ॥
मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें ।
त्याचें उत्तर बोलिजेल तें । सावधान ऐका ॥ १॥
देखिलें तें सत्यचि मानावें । हें ज्ञात्याचें देखणें नव्हे ।
जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे ॥ २॥
एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी ।
संतमहंतांच्या गोष्टी । त्याही मिथ्या मानाव्या ॥ ३॥
माझें दिसतें हेंचि खरें । तेथें चालेना दुसरें ।
ऐशिया संशयाच्या भरें । भरोंचि नये ॥ ४॥
मृगें देखिलें मृगजळ । तेथें धांवे तें बरळ ।
जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूसि कोणें म्हणावें ॥ ५॥
रात्रौ स्वप्न देखिलें । बहुत द्रव्य सांपडलें ।
बहुत जनांसि वेव्हारिलें । तें खरें कैसेनि मानावें ॥ ६॥
कुशळ चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र ।
देखतां उठे प्रीति मात्र । परंतु तेथें मृत्तिका ॥ ७॥
नाना वनिता हस्ती घोडे । रात्रौ देखतां मन बुडे ।
दिवसा पाहतां कातडें । कंटाळवाणें ॥ ८॥
काष्ठी पाषाणी पुतळ्या । नाना प्रकारें निर्मिल्या ।
परम सुंदर वाटल्या । परंतु तेथें पाषाण ॥ ९॥
नाना गोपुरीं पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं पाहती ।
लाघव देखता भरे वृत्ती । परंतु तेथें त्रिभाग ॥ १०॥
खेळतां नेटके दशावतारी । तेथें येती सुंदर नारी ।
नेत्र मोडिती कळाकुसरीं । परी ते अवघे धटिंगण ॥ ११॥
सृष्टि बहुरंगी असत्य । बहुरूपाचें हें कृत्य ।
तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या ॥ १२॥
मिथ्या साचासारिखें देखिलें । परी तें पाहिजे विचारिलें ।
दृष्टि तरळतां भासलें । तें साच कैसें मानावें ॥ १३॥
वरी पाहतां पालथें आकाश । उदकीं पाहतां उताणें आकाश ।
मध्यें चांदण्याचाही प्रकाश । परी तें अवघें मिथ्या ॥ १४॥
नृपतीनें चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले ।
पाहतां तेचि ऐसे गमले । परी ते अवघे मायिक ॥ १५॥
नेत्रीं कांहीं बाहुली नसे । जेव्हां जें पहावें तेव्हां तें भासे ।
डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ॥ १६॥
जितुके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्यें रूपें दिसती ।
क्षणामध्यें फुटोनि जाती । रूपें मिथ्या ॥ १७॥
लघुदर्पणें दोनी चारी होतीं । तितुकीं मुखें प्रतिबिंबती ।
परी तीं मिथ्या आदिअंतीं । एकचि मुख ॥ १८॥
नदीतीरीं भार जातां । दुसरा भार दिसे पालथा ।
कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ॥ १९॥
वापी सरोवरांचें नीर । तेथें पशु पक्षी नर वानर ।
नाना पत्रें वृक्ष विस्तार । दिसे दोहीं सवां ॥ २०॥
एक शस्त्र झाडूं जातां । दोन दिसती तत्त्वतां ।
नाना तंतु टणत्कारितां । द्विधा भासती ॥ २१॥
कां ते दर्पणाचे मंदिरीं । बैसली सभा दिसे दुसरी ।
बहुत दीपांचिये हारीं । बहुत छाया दिसती ॥ २२॥
ऐसें हें बहुविध भासे । साचासारिखें दिसे ।
परी हें सत्य म्हणोन कैसें । विश्वासावें ॥ २३॥
माया मिथ्या बाजीगिरी । दिसे साचाचिये परी ।
परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये ॥ २४॥
लटिकें साचा ऐसे भावावें । तरी मग पारखी कासया असावें ।
एवं ये अविद्येचे गोवें । ऐसेचि असती ॥ २५॥
मनुष्यांची बाजीगिरी । बहुत जनां वाटे खरी ।
शेवट पाहतां निर्धारीं । मिथ्या होय ॥ २६॥
तैशीच माव राक्षसांची । देवांसही वाटे साची ।
पंचवटिकेसि मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७॥
पूर्वकाया पालटिती । एकाचेचि बहुत होती ।
रक्तबिंदीं जन्मती । रजनीचर ॥ २८॥
नाना पदार्थ फळेंचि झाले । द्वारकेमध्यें प्रवेशले ।
कृष्णें दैत्य किती वधिले । कपटरूपी ॥ २९॥
कैसें कपट रावणाचें । शिर केलें मावेचें ।
काळनेमीच्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३०॥
नाना दैत्य कपटमती । जे देवांसही नाटोपती ।
मग निर्माण होऊन शक्ती । संहार केला ॥ ३१॥
ऐसी राक्षसांची माव । जाणों न शकती देव ।
कपटविद्येचें लाघव । अघटित ज्यांचें ॥ ३२॥
मनुष्यांची बाजीगिरी । राक्षसांची वोडंबरी ।
भगवंताची नानापरी । विचित्र माया ॥ ३३॥
हे साचासारिखीच देइसे । विचारितांचि निरसे ।
मिथ्याच परी आभासे । निरंतर ॥ ३४॥
साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे ।
दोहीं पदार्थीं अविश्वासे । सांगतां मन ॥ ३५॥
परंतु हें नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार ।
दिसतें हें स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६॥
तथापि असो तुजला । भासचि सत्य वाटला ।
तरी तेथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७॥
दृश्यभास अविद्यात्मक । तुझाही देह तदात्मक ।
म्हणोनि हा विवेक । तेथें संचरला ॥ ३८॥
दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावरी बैसलें ।
परी तें लिंगदेह झालें । अविद्यात्मक ॥ ३९॥
अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोन गोष्टी विश्वासली ।
तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४०॥
तेचि काया मी आपण । हें देहबुद्धीचें लक्षण ।
येणेंकरितां झालें प्रमाण । दृश्य अवघें ॥ ४१॥
इकडे सत्य मानिला देह । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह ।
दोंहींमध्यें हा संदेह । पैसावला बळें ॥ ४२॥
देहबुद्धी केली बळकट । आणि ब्रह्म पाहों गेला धीट ।
तों दृश्यानें रोधिली वाट । परब्रह्माची ॥ ४३॥
तेथें साच मानिलें दृश्याला । निश्चयचि बाणोनि गेला ।
पहा हो केवढा चुका पडिला । अकस्मात ॥ ४४॥
आतां असो हें बोलणें । ब्रह्म न पाविजे मीपणें ।
देहबुद्धीची लक्षणें । दृश्य भाविती ॥ ४५॥
अस्थींच्या देहीं मांसाचा गोळा । पाहेन म्हणे ब्रह्मींचा सोहळा ।
तो ज्ञाता नव्हे आंधळा । केवळ मूर्ख ॥ ४६॥
दृष्टीस दिसे मनास भासे । तितुकें काळांतरीं नासे ।
म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रह्म तें ॥ ४७॥
परब्रह्म तें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।
ऐसा बोलिला निश्चितार्थ । नानाशास्त्रीं ॥ ४८॥
आतां पुढें निरूपण । देहबुद्धीचें लक्षण ।
चुका पडिला तो कोण । बोलिलें असे ॥ ४९॥
मी कोण हें जाणावें । मीपण त्यागून अनन्य व्हावें ।
मग समाधान तें स्वभावें । अंगीं बाणे ॥ ५०॥
हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
दृश्यनिरसनं नाम अष्टमः समासः ॥ ८॥