Samas 9
समास ९ - समास नववा : सारशोधन
समास ९ - दशक ६
समास नववा : सारशोधन॥ श्रीराम ॥
गुप्त आहे उदंड धन । काय जाणती सेवकजन ।
तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचें ॥ १॥
गुप्त ठेविले उदंड अर्थ । आणि प्रगट दिसती पदार्थ ।
शहाणे शोधिति स्वार्थ । अंतरीं असे ॥ २॥
तैसें दृश्य हें मायिक । पाहत असती सकळ लोक ।
परी जयांस ठाउका विवेक । ते अंतर जाणती ॥ ३॥
द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें ।
तयाचें अभ्यंतर कळलें । समर्थ जनांसी ॥ ४॥
तैसे ज्ञाते जे समर्थ । तिहीं ओळखिला परमार्थ ।
इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थांचा ॥ ५॥
काबाडी वाहती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्नें जाड ।
हें जयांचें त्यांस गोड । कर्मयोगें ॥ ६॥
एक काष्ठस्वार्थ करिती । एक शुभा एकवटिती ।
तैसे नव्हेत कीं नृपती । सारभोक्ते ॥ ७॥
जयांस आहे विचार । ते सुखासनीं झाले स्वार ।
इतर ते जवळील भार । वाहतचि मेले ॥ ८॥
एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा सावडिती ।
आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥ ९॥
सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेइजे वृथापुष्टीं ।
सारासाराची गोष्टी । सज्ञान जाणती ॥ १०॥
गुप्त परिस चिंतामणी । प्रगट खडे काचमणी ।
गुप्त हेम रत्नखाणी । प्रगट पाषाण मृत्तिका ॥ ११॥
अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पती अमूल्य ।
एरंड धोत्रे बहुसाल । प्रगट शिंपी ॥ १२॥
कोठें दिसेना कल्पतरू । उदंड शेरांचा विस्तारू ।
पाहतां नाहीं मैलागरू । बोरी बाभळी उदंड ॥ १३॥
कामधेनु जाणिजे इंद्रें । सृष्टींत उदंड खिल्लारें ।
महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतरां कर्मानुसार ॥ १४॥
नाना व्यापार करिती जन । अवघेच म्हणती सकांचन ।
परंतु कुबेराचें महिमान । कोणासीच न ये ॥ १५॥
तैसा ज्ञानी योगीश्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्वर ।
इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥ १६॥
तस्मात् सार तें दिसेना । आणि असार तें दिसे जनां ।
सारासारविवंचना । साधु जाणती ॥ १७॥
इतरांस हें काये सांगणे |खरें खोटें कोण जाणे ।
साधुसंतांचिये खुणे |साधुसंत जाणती ॥ १८ ॥
दिसेना जें गुप्त धन । तयास करणें लागे अंजन ।
गुप्त परमात्मा सज्जन । संगतीं शोधावा ॥ १९॥
रायाचें सान्निध्य होतां । सहजचि लाभे श्रीमंतता ।
तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥ २०॥
सद्वस्तूस लाभे सद्वस्तु । अव्यवस्थासि अव्यवस्थु ।
पाहतां प्रशस्तासि प्रशस्तु । विचार लाभे ॥ २१॥
म्हणोनि हें दृश्यजात । अवघें आहे अशाश्वत ।
परमात्मा अच्युत अनंत । तो या दृष्यावेगळा ॥ २२॥
दृश्यावेगळा दृश्याअन्तरीं । सर्वात्मा तो चराचरीं ।
विचार पाहतां अंतरीं । निश्चयो बाणे ॥ २३॥
संसारत्याग न करितां । प्रपंचौपाधि न सांडितां ।
जनांमध्ये सार्थकता । विचारेंचि होय ॥ २४॥
हें प्रचीतीचें बोलणें । विवेकें प्रचीत बाणे ।
प्रचीत पाहतील ते शहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५॥
प्रचीत आणि अनुमान । उधार आणि रोकडें धन ।
मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यास महदंतर ॥ २६॥
पुढें जन्मांतरीं होणार । हा तो अवघाच उधार ।
तैसें नव्हे सारासार । तत्काळ लभे ॥ २७॥
तत्काळचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो ।
संशय अवघाचि तुटतो । जन्ममरणांचा ॥ २८॥
याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें ।
मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारें ॥ २९॥
ये गोष्टीस करी अनुमान । तो शीघ्रचि पावेल पतन ।
मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३०॥
हें यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्रचि मुक्त होणें ।
असोनि कांहींच नसणें । जनांमध्यें ॥ ३१॥
देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण ।
हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२॥
देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें ।
जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥
येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे ।
संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरुवचनें ॥ ३४॥
हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सारशोधननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥