Samas 1
समास 1 - समास पहिला : मंगलाचरण
समास 1 - दशक ७
समास पहिला : मंगलाचरण
॥ श्रीराम ॥
विद्यावंतांचा पूर्वजू । गजानन एकद्विजू ।
त्रिनयन चतुर्भुजू । परशुपाणि ॥ १॥
कुबेरापासून अर्थ । वेदांपासून परमार्थ ।
लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासी आले ॥ २॥
तैशी मंगळमूर्ती आद्या । तियेपासून झाल्या सकळ विद्या ।
तेणें कवि लाघवगद्या । सत्पात्रें जाहलीं ॥ ३॥
जैशीं समर्थाचीं लेकुरें । नाना अलंकारीं सुंदरें ।
मूळपुरुषाचेनि द्वारें । तैसे कवी ॥ ४॥
नमूं ऐशिया गणेंद्रा । विद्याप्रकाशपूर्णचंद्रा ।
जयाचेनि बोधसमुद्रा । भरतें दाटे बळें ॥ ५॥
जो कर्तृत्वास आरंभ । मूळपुरुष मूळारंभ ।
जो परात्पर स्वयंभ । आदि अंतीं ॥ ६॥
तयापासून प्रमदा । इच्छाकुमारी शारदा ।
आदित्यापासून गोदा । मृगजळ वाहे ॥ ७॥
जे मिथ्या म्हणतांच गोंवी । मायिकपणें लाघवी ।
वक्तयास वेढा लावी । वेगळेपणें ॥ ८॥
जे द्वैताची जननी । कीं ते अद्वैताची खाणी ।
मूळमाया गवसणी । अनंत ब्रह्मांडांची ॥ ९॥
कीं ते अवडंबरी वल्ली । अनंत ब्रह्मांडें लगडली ।
मूळपुरुषाची माउली । दुहितारूपें ॥ १० ।
वंदूं ऐशी वेदमाता । आदिपुरुषाची जे सत्ता ।
आतां आठवीन समर्था । सद्गुरूसी ॥ ११॥
जयाचेनि कृपादृष्टी । होय आनंदाची वृष्टी ।
तेणें गुणें सर्व सृष्टी । आनंदमय ॥ १२॥
कीं तो आनंदाचा जनक । सायुज्यमुक्तीचा नायक ।
कैवल्यपददायक । अनाथबन्धू ॥ १३॥
मुमुक्षचातकीं सुस्वर । करुणां पाहिजे अंबर ।
वोळे कृपेचा जलधर । साधकांवरी ॥ १४॥
कीं तें भवार्णवींचें तारूं । बोधें पाववी पैलपारू ।
महाआवर्तीं आधारू । भाविकांसी ॥ १५॥
कीं तो काळाचा नियंता । नाना संकटीं सोडविता ।
कीं ते भाविकाची माता । परम स्नेहाळ ॥ १६॥
कीं तो परत्रींचा आधारू । कीं तो विश्रांतीचा थारू ।
नातरी सुखाचें माहेरू । सुखरूप ॥ १७॥
ऐसा सद्गुरु पूर्णपणीं । तुटे भेदाची कडसणी ।
देहेंविण लोटांगणीं । तया प्रभूसी ॥ १८॥
साधु संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९॥
संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन ।
माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २०॥
ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्रकाश लोपला ।
अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१॥
नाहीं सत्वाचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे जेणें ।
सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२॥
देहबुद्धिअहंकारे । निजले घोरती घोरे ।
दुःखें आक्रंदती थोरे । विषयसुखाकारणें ॥ २३॥
निजले असतांचि मेले । पुनः उपजतांच निजले ।
ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ २४॥
निदसुरेपणेंचि सैरावैरा । बहुतीं केल्या येरझारा ।
नेणोनियां परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥ २५॥
त्या कष्टांचें निरसन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान ।
म्हणोनि हें निरूपण । अध्यात्मग्रंथीं ॥ २६॥
सकळ विद्यामध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार ।
दशमाध्यायीं शार्ङ्गधर । भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७॥
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥
याकारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्मविद्येचा परमार्थ ।
पावावया तोचि समर्थ । जो सर्वांगें श्रोता ॥ २८॥
जयाचें चंचळ हृदय । तेणें ग्रंथ सोडूंचि नये ।
सोडितां अलभ्य होय । अर्थ येथींचा ॥ २९॥
जयास जोडला परमार्थ । तेणें पहावा हा ग्रंथ ।
अर्थ शोधितां परमार्थ । निश्चयो बाणे ॥ ३०॥
जयास नाहीं परमार्थ । तयास न कळे येथींचा अर्थ ।
नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधास न कळे ॥ ३१॥
एक म्हणती मराठें काये । हें तों भल्यानें ऐकों नये ।
तीं मूर्खें नेणती सोयें । अर्थान्वयांची ॥ ३२॥
लोहाची मांदूस केली । नाना रत्नेंच सांठविलीं ।
तीं अभाग्यानें त्यागिलीं । लोखंड म्हणोनि ॥ ३३॥
तैशी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत ।
नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४॥
अहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण ।
द्रव्य घ्यावें सांठवण । पाहोंचि नये ॥ ३५॥
परिस देखिला अंगणीं । मार्गीं सांपडला चिंतामणी ।
अव्हा वेल महागुणी । कूपामध्यें ॥ ३६॥
तैसें प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि सप्रचीत ।
अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७॥
न करितां व्युत्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होय सुगम ।
सत्समागमाचें वर्म । तें हें ऐसें असे ॥ ३८॥
जें व्युत्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे ।
सकळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९॥
म्हणोनि कारण सत्समागम । तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम ।
जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंचि असे ॥ ४०॥
भाषाभेदाश्च वर्तन्ते अर्थ एको न संशयः ।
पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥ १॥
भाषापालटें कांहीं । अर्थ वाया जात नाहीं ।
कार्यसिद्धि ते सर्वही । अर्थाचपासीं ॥ ४१॥
तथापि प्राकृताकरितां । संस्कृताची सार्थकता ।
येर्ह व्हीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२॥
आतां असो हें बोलणें । भाषा त्यागून अर्थ घेणें ।
उत्तम घेऊन त्याग करणें । सालीटरफलांचा ॥ ४३॥
अर्थ सार भाषा पोंचट । अभिमानें करवी खटपट ।
नाना अहंतेनें वाट । रोधिली मोक्षाची ॥ ४४॥
शोध घेतां लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा ।
अगाध महिमा भगवंताचा । कळला पाहिजे ॥ ४५॥
मुकेपणाचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणें ।
स्वानुभवाचिये खुणें । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६॥
अर्थ जाणे अध्यात्माचा । ऐसा श्रोता मिळेल कैंचा ।
जयासि बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥ ४७॥
परीक्षावंतापुढें रत्नस । ठेवितां होय समाधान ।
तैसें ज्ञानियापुढें ज्ञान । बोलावें वाटे ॥ ४८॥
मायाजाळें दुश्चित होय । तें निरूपणें कामा नये ।
संसारिका कळे काय । अर्थ येथींचा ॥ ४९॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन ।
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो । अव्यवसायिनाम् ॥ १॥
व्यवसायी जो मळिण । त्यासि न कळे निरूपण ।
येथें पाहिजे सावधपण । अतिशयेंसीं ॥ ५०॥
नाना रत्नें नाना नाणीं । दुश्चितपणें घेतां हानी ।
परीक्षा नेणतां प्राणी । ठकला तेथें ॥ ५१॥
तैसें निरूपणीं जाणा । आहाच पाहतां कळेना ।
मराठेंचि उमजेना । कांहीं केल्या ॥ ५२॥
जेथें निरूपणाचे बोल । आणि अनुभवाची ओल ।
ते संस्कृतापरी सखोल । अध्यात्मश्रवण ॥ ५३॥
माया ब्रह्म वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें ।
तरी तें मायेचें जाणावें । स्वरूप आधीं ॥ ५४॥
माया सगुण साकार । माया सर्व विकार ।
माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५॥
माया दृश्य दृष्टीस दिसे । मायाभास मनास भासे ।
माया क्षणभंगुर नासे । विवेकें पाहतां ॥ ५६॥
माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप ।
मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७॥
माया बहुरूप बहुरंग । माया ईश्वराचा संग ।
माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८॥
माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना ।
माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९॥
ऐशी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६०॥
पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें ब्रह्मज्ञान ।
जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१॥
हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥