Samas 10
समास 10 - समास दहावा : देहान्तनिरूपण
समास 10 - दशक ७
समास दहावा : देहान्तनिरूपण ॥ श्रीराम ॥
मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें असत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहतां ॥ १॥ जी दृश्य वृष्टी वास्तविक मिथ्या आहे, ती आपल्याला सत्य वाटते, जे परब्रह्म सत्य आहे ते आपल्याला असत्य वाटते हे सर्व मायेमुळे जो विशेष श्रम उत्पन्न होतो, त्यामुळे घडून येते. (१)
सत्य कळावयाकारणें । बोलिलीं नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २॥ सत्य अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून नाना निरूपणे, निरनिराळे उपाय सांगतात तरीही असत्य मायेचे धरणे काही उठत नाही. (२)
असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३॥ असत्य असून ‘ मी देह ‘ ही देहाहंता आणि दृश्य वृष्टीच सत्य आहे हा निश्चय अंतरात दृढ ठसलेला आहे. तो आपोआप जन्मल्यापासून अनेक जन्मांच्या संस्कासंमुळे उत्पन्न झालेला असतो आणि परब्रह्म मात्र सत्य व सर्वत्र असून तिचे ज्ञान आपल्याला नसते. (३)
वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चयो करिती । तरि न ये आत्मप्रचीती । सत्य स्वरूप ॥ ४॥ वेद, शास्त्रे, पुराणे नाना प्रकारे सत्याचा निश्चय व्हावा म्हणून उपदेश करतात, पण याप्रमाणे शास्त्रांनी सांगूनही त्या सत्य स्वरूपाची आत्मप्रचीती येत नाही. (४)
सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखतदेखतां ॥ ५॥ परब्रह्म सत्य असून ते मायेच्या योगे आच्छादिले जाते व माया मिथ्या असून ती सत्य वाटत असते. असे सगळे आपल्या समक्षच विपरीत घडून येते. (५)
ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६॥ पण ज्यावेळी संतसमागम घडतो व अध्यात्मनिरूपणाच्या श्रवणाने साससारविवेक उत्पन्न होतो तेव्हा या मायेची करणी समजून येते. (६)
मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि आपण । तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७॥ याचे निरूपण पूर्वी आले आहे. आपणच आपला शोध घेऊन स्वस्वरूपानुभवाने आपले खरे रूप जाणून घेतले आहे. त्यामुळे परमार्थाची खूण अंतरात बाणली आहे. (७)
तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें । निजस्वरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८॥ त्यामुळे समाधान लाभले असून चित्त चैतन्याशी एकरूप झाल्याने आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप आहोत अशी आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटली आहे. (८)
प्रारब्धें टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवर ॥ ९॥ आत्मबोध झाल्याने संदेह नाहीसे झालेले असून आता देह प्रारब्धाच्या हवाली केला आहे. आता हे मिथ्या कलेवर म्हणजेच देह लगेच पडला अथवा राहिला तरी त्याच्याशी आपला संबंधच उरलेला नाही, अशी ज्ञानी लोकांची भूमिका असते. (९)
ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ॥ १०॥ ज्ञानी लोकांना ‘ शरीर मिथ्या ‘ आहे या विचाराने जिवंतपणीच ते असून नसल्यासारखेच वाटत असते. थोडक्यात, ज्ञानी ममत्वरहित असतानाच त्याचे शरीर जेथे कुठे पडते, ती भूमी खरोखरच पुण्यभूमी होय. (१०)
साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ । साधू न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥ ११॥ साधुसंतांच्या दर्शनानेच तीर्थांना पावित्र्य येते व त्यांचे माहात्म्य वाढते. साधुसंत जर आले नाहीत तर त्या तीर्थक्षेत्रांचे जिणे व्यर्थ ठरते. (११)
पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तोंचि नित्यमुक्त ॥ १२॥ सामान्य लोकांची अशी इच्छा असते की, गंगेसारख्या पुण्यनदीच्या तीरावर आपले शरीर पडावे म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल. पण साधू हे नित्यमुक्तच असतात. (१२)
उत्तरायण तें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३॥ उत्तरायणात देह पडला तर उत्तम, दक्षिणायनात पडला तर अधम ह्या संदेहाने सामान्य लोकांच्या मनांत भ्रम उत्पन्न होतो पण साधू हे निःसंदेह झालेले असतात. (१३)
शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवामरण । अंतीं रहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४॥ उत्तरायण असावे, शुक्लपक्ष असावा, घरात दिवा जळत असता दिवसा मरण यावे, त्यातही अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे उत्तम गती मिठ्ये, असे लोकांना वाटत असते. (१४)
इतुकें नलगे योगियासी । तो जितचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यासी । दिधली तेणें ॥ १५॥ योग्यांना या गोष्टींची आवश्यकता नसते. तो पुण्यपुरुष जिवंत असताना मुक्त झालेला असतो. त्याने पापपुण्यांना कधीच तिलांजली दिलेली असते. (१५)
देहाचा अंत बरा झाला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६॥ अज्ञानी लोक ज्याच्या देहाचा अंत बरा झाला असेल जो सुखात असता मेला असेल, तो धन्य झाला असे म्हणतात. (१६)
जनांचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७॥ काही अज्ञानी लोकांची तर अशी विपरीत समजूत असते की, अंतकाळी भगवंताचे दर्शन होते, याप्रकारे कल्पना जे करतात, ते आपला घात करून घेतात. (१७)
जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८॥ जिवंत असताना त्यांनी मनुष्यजन्माचे सार्थक केलेले नसते. सर्व आयुष्य व्यर्थच घालवलेले असते. मुळात धान्य पेरलेलेच नसते, तर ते उगवून येणार तरी कसे ? (१८)
जरी केलें ईश्वरभजन । तरी तो होइजे पावन । जैसें वेव्हारितां धन । राशी माथां लाभे ॥ १९॥ जर ईश्वरभजन केले असेल तरच मनुष्य पावन होतो. जसे जवळ असलेल्या धनाने व्यवहार केला असेल, तरच मुद्दलाबरोबर व्याजही मिळून द्रव्ययस उपलब्ध होते. (१९)
दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना । ऐसें हें वाक्य जनां । ठाउकेंचि आहे ॥ २०॥ दिल्याखेरीज मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही हे वाक्य सर्व लोक जाणतातच. (२०)
न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा । तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१॥ एखाद्या नोकराने सेवा न करताच धन्याला म्हणावे की, ‘ माझा पगार द्या ‘ तर त्याला पगार कसा मिळेल ? त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केली नसेल अंती त्याचे स्वहित कसे साधेल ? (२१)
जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती । असो जे जे ऐसें करिती । ते ते पावती तैसेंचि ॥ २२॥ जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही, तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल ? असो. जे जे जसे करतात त्यांना त्या त्या- प्रमाणे फल प्रास होते. (२२)
एवं न करितां भगवद्भजन । अंतीं न होइजे पावन । जरी आलें बरवें मरण । तरी भक्तिविण अधोगती ॥ २३॥ थोडक्यात म्हणजे जिवंत असताना जर भगवद् भजन केले नसेल तर अंतकाळी पावन होता येत नाही. जरी लोकांच्या समजुतीप्रमाणे बरे मरण आले, तरी भक्ती ! न केल्याने अधोगती प्रास होते. (२३)
म्हणोन साअधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें । शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥ म्हणून जे साधुसंत असतात, त्यांनी जिवंत असतानाच मनुष्यजन्माचे सार्थक केलेले असते. भगवद्भक्ती अथवा ज्ञानप्राप्ती करून शरीराचा सदुपयोग त्यांनी केलेला असतो. त्यामुळे ते धन्य होत. (२४)
जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं । अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥ २५॥ जे जिवंत असतानाच मुक्त झालेले असतात, अशा ज्ञानी जीवमुक्ताचे शरीर वनात पडो अथवा स्मशानात पडो, तरी ते धन्यच असतात. (२५)
साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला । हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ २६॥ साधूचा देह खितपत पडला किंवा कोल्हा- कुत्र्यांनी खाल्ला, तर सामान्य लोकांना त्यांच्या मंदबुद्धीमुळे ते प्रशस्त वाटत नाही. (२६)
अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन । परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७॥ सामान्य लोक त्याचा अंत बरा झाला नाही, या विचाराने दुःखी होतात, पण ते बिचारे अज्ञानी लोक रहस्य जाणत नाहीत. (२७)
जो जन्मलाचि नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ॥ २८॥ पण मुळात जो जन्मलाच नाही, त्याला मृत्यू कसा येईल ? जो ज्ञानी असतो त्याने विवेकाच्या बळावर जन्म-मृत्यूच्या भावनेलाच गिळून यकलेले असते. (२८)
स्वरूपानुसंधानबळें । सगळीच माया नाडळे । तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९॥ त्याने स्वस्वरूपानुसधानाच्या बळाने सर्व मायाच नाहीशी केलेली असते. त्यामुळे ब्रह्मादिकांनाही त्याचा पार लागत नाही. (२९)
तो जित असतांचि मेला । मरणास मारून जियाला । जन्म मृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३०॥ तो जिवंत असतानाच मेलेला असतो आणि मरणाला मारून जगत असतो. त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्म-मृत्यूचे भानच राहिलेले नसते. (३०)
तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा । दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१॥ तो सामान्य लोकांमध्येच वावरतो, तरी तो वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपेक्षा निराळा आहे, हे कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तुरूपच झालेला असतो. त्यामुळे दृश्य पदार्थादी मायिक असल्याने त्याला स्पर्शच करू शकत नाहीत. (३१)
असो ऐसे साधु जन । त्यांचें घडलिया भजन । तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२॥ असो. अशा साधुसंतांचे भजन घडले तर त्यायोगे इतर लोकही पावन होतात. (३२)
सद्गुरूचा जो अंकित साधक । तेणें केलाच करावा विवेक । विवेक केलिया तर्क । फुटे निरूपणीं ॥ ३३॥ जो साधक सद्गुरूच्या अंकित असेल त्याने पुन्हापुन्हा सारासारविवेक करावा. अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्यावेळी नवीन विचार स्कृरू लागतात. (३३)
हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें । तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४॥ श्रीसमर्थ म्हणतात की, जे खरे साधक आहेत, त्यांना अगत्याने हेच सांगावयाचे आहे की, अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधुसंतांच्याप्रमाणे तुमच्या ठिकाणीही निःसंदेह असे समाधान जरूर बाणेल (३४)
जो संतांसी शरण गेला । तो संतचि होऊन ठेला । इतर जनां उपयोगा आला । कृपाळुपणें ॥ ३५॥ जो संतांना शरण जातो, तो स्वतः संतच होतो आणि कृपाळूपणे इतर सामान्य जनांच्या उपयोगी पडतो. (३५)
ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान । सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥ ३६॥ असा संतांचा महिमा आहे ! संतसमागमानेच आत्मज्ञान होते. म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ असे दुसरे साधनच नाही. (३६)
गुरुभजनाचेनि आधारें । निरूपणाचेनि विचारें । क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७॥ गुरूभजनाच्या आधाराने, अध्यात्मनिरूपणातील विचाराने श्रवण-मनन, करून ते आत्मसात करावेत आणि आचरणही अत्यंत शुद्ध असावे. म्हणजे निश्चितपणे परमपदाची प्राप्ती होते. (३७)
परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरूचें भजन । सद्गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८॥ सद्गुरूचे भजन हे परमार्थाचे जन्मस्थान आहे. आणि सद्गुरुभजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले असता, आत्मानुभव प्रास होऊन अकस्मात शाश्वत समाधान बाणते. (३८)
देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें । भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरूचें ॥ ३९॥ देह मिथ्या आहे हे जाणून घेऊन जीवाने त्याचे सार्थक करावे आणि भावाने सद्गुरूचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावे. (३९)
शरणागताची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसें बाळका वाढवी माता । नाना यत्नेंमकरूनी ॥ ४०॥ आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढविते, त्याप्रमाणे सद्यरू हे मातेप्रमाणेच शरण आलेल्या भक्तांची सर्व चिंता वाहतात. त्यांच्यासारखा दाता अन्य कुणी नसतो. (४०)
म्हणोनि सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य । सद्गुरुवीण समाधान । आणिक नाहीं ॥ ४१॥ म्हणूनच ज्याला सद्गुरूचे भजन घडते, तो शिष्य धन्यच होय. सद्गुरूशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. (४१)
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । येथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२॥ शब्दांत जे काही सांगता येण्यासारखे होते ते सांगण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केला आहे. आता ग्रंथाचा शेवट आला आहे म्हणून परत एकदा सद्गुरुभजनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे. (४२)
सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं । जयांस न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३॥ खरोखर सद्गुरुभजनासारखे मोक्षदायक दुसरे काहीही नाही. ज्याला हे म्हणणे पटत नसेल, त्याने ‘गुरुगीता पाहावी. (४३)
तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें । याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४॥ तेथे सदाशिवाने पार्वतीला सद्गुरुचरण सेवावे हेच उत्तम प्रकारे निरोपिले आहे म्हणून सद्भावाने सद्गुरुचरणच सेवावे. (४४)
जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक । तयास सांपडे एक । निश्चयो ज्ञानाचा ॥ ४५॥ या ग्रंथात जे विचार मांडलेले आहेत त्यांचे जो साधक मनन करील, त्याचा आत्मज्ञानासंबंधी निश्चय होईल. (४५)
ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत । सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६॥ ज्या ग्रंथांत अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेले असेल तो ग्रंथ प्राकृत, मराठीतला म्हणून कमी प्रतीचा मामू नये. कारण त्याचा अर्थ खरोखर वेदांतपरच असतो. (४६)
प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहतां मिळे । आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७॥ वेदान्त अनायासे मराठीत सुलभरीत्या प्रास होईल. शिवाय अनेक वेदानपर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदान्त प्रतिपादिला, तोच या ग्रंथातही असल्याने त्याच्या श्रवणाने अंतःकरणात समाधान प्रास होईल. (४७)
तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचा उपाय । मूर्खासि हें कळे काय । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८॥ ज्यांत आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले असतात त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नये. पण माकडाला नारळाचे मूल्य-काय कळणार ? त्याप्रमाणे मूर्खाला या ग्रंथाचे महत्त्व काय कळणार आहे ? (४८)
आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें । शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९॥ असो. आता हे बोलणे पुरे ज्याने-त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे, या ग्रंथांतील ज्ञान ग्रहण करावे. बंद शिंपीतील मोती प्रत्यक्ष दिसत नाही, पण म्हणून तो कमी प्रतीचा आहे असे म्हणू नये. (४९)
जेथें नेति नेति म्हणती श्रुती । तेथें न चले भाषाव्युत्पत्ती । परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥ ५०॥ ज्या परब्रह्माचे वर्णन श्रुतींनाही नेति नेति म्हणून करावे लागते, तेथे भाषेतील स्तुत्यनता, विद्वत्ता उपयोगी पडत नाही. ते परब्रह्म आदी अंती अनिर्वाच्य, शब्दांत न सांगता येण्यासारखेच असते. (५०)
हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥
॥ दशक सातवा समाप्त ॥