Samas 3
समास 3 - समास तिसरा : चतुर्दशब्रह्मनिरूपण
समास 3 - दशक ७
समास तिसरा : चतुर्दशब्रह्मनिरूपण॥ श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान ।
जेणें होये समाधान । साधकांचें ॥ १॥
रत्नें साधाया कारणें । मृत्तिका लागे एकवटणें ।
चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २॥
पदार्थेंविण संकेत । द्वैतावेगळा दृष्टांत ।
पूर्वपक्षेंविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३॥
आधीं मिथ्या उभारावें । मग तें ओळखोन सांडावें ।
पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४॥
म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सिद्धांत ।
येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५॥
पहिलें तें शब्दब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरं ब्रह्म ।
तिसरें खंब्रह्म । बोलिली श्रुती ॥ ६॥
चौथें जाण सर्वब्रह्म । पांचवें चैतन्यब्रह्म ।
सहावें सत्ताब्रह्म । साक्षिब्रह्म सातवें ॥ ७॥
आठवें सगुणब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म ।
दहावें वाच्यब्रह्म । जाणावें पैं ॥ ८॥
अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें ।
तदाकार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्य ॥ ९॥
ऐशीं हीं चौदा ब्रह्में । यांचीं निरूपिलीं नामें ।
आतां स्वरूपांचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १०॥
अनुभवेंविण भ्रम । या नां शब्दब्रह्म ।
आतां ओमित्येकाक्षरं ब्रह्म । तें एकाक्षर ॥ ११॥
खं शब्दें आकाशब्रह्म । महदाकाश व्यापक ब्रह्म ।
आतां बोलिजेल सूक्ष्म ब्रह्म । सर्वब्रह्म ॥ १२॥
पंचभूतांचें कुवाडें । जें जें तत्त्व दृष्टीस पडे ।
तें तें ब्रह्मचि रोकडें । बोलिजेत आहे ॥ १३॥
या नांव सर्वब्रह्म । श्रुतिआश्रयाचें वर्म ।
आतां चैतन्यब्रह्म । बोलिजेल ॥ १४॥
पंचभूतादि मायेतें । चैतन्यचि चेतवितें ।
म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्यब्रह्म बोलिजे ॥ १५॥
चैतन्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रह्म तत्त्वतां ।
तये सत्तेस जाणता । या नांव साक्षिब्रह्म ॥ १६॥
साक्षित्व जयापासूनी । तेंहीं आकळिलें गुणीं ।
सगुणब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७॥
जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुणब्रह्म तत्त्वतां ।
वाच्यब्रह्म तेंही आतां । बोलिजेल ॥ १८॥
जे वाचें बोलतां आलें | तें वाच्यब्रह्म बोलिलें ॥
अनुभवासि कथिलें | नवचे सर्वथा ॥ १९ ॥
या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म ।
परंतु याचेंही वर्म । बोलवेना ॥ २०॥
ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद ।
अनिर्वाच्य संवाद । तुटोनि गेला ॥ २१॥
ऐशीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें ।
साधकें पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२॥
ब्रह्म जाणावें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।
चौदा ब्रह्मांचा सिद्धांत । होईल आतां ॥ २३॥
शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेंविण मायिक ।
शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥ २४॥
जेथें क्षर ना अक्षर । तेथें कैंचें ओमित्येकाक्षर ।
शाश्वताचा विचार । तेथें न दिसे ॥ २५॥
खंब्रह्म ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान ।
शाश्वताचें अधिष्ठान । तेथें न दिसे ॥ २६॥
सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत ।
प्रळय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥ २७॥
ब्रह्मप्रळय मांडेल जेथें । भूतान्वय कैंचा तेथें ।
म्हणोनियां सर्वब्रह्मातें । नाश आहे ॥ २८॥
अचळासी आणी चळण । निर्गुणास लावितां गुण ।
आकारास विचक्षण । मानीतना ॥ २९॥
जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत ।
सर्वब्रह्म हे मात । घडे केंवीं ॥ ३०॥
असो आतां हें बहुत । सर्वब्रह्म नाशवंत ।
वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥ ३१॥
आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें ।
तेथें चैतन्याच्या नांवें । नाश आला ॥ ३२॥
परिवारेंविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्त्वतां ।
पदार्थेंविण साक्षता । तेही मिथ्या ॥ ३३॥
सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये ।
सगुणब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४॥
निर्गुण ऐसें जें नांव । त्या नांवास कैंचा ठाव ।
गुणेंवीण गौरव । येईल कैंचें ॥ ३५॥
माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ ।
कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥ ३६॥
ग्रामो नास्ति कुतः सीमा । जन्मेंविण जीवात्मा ।
अद्वैतासी उपमा । द्वैताची असे ॥ ३७॥
मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता ।
अविद्येविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८॥
सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वही गुणांचिये पाशीं ।
ठायींचें निर्गुण त्यासीं । गुण कैंचें ॥ ३९॥
ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत ।
तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसीं ॥ ४०॥
निर्गुण ब्रह्मासी संकेतें । नामें ठेविलीं बहुतें ।
तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१॥
आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाच भाव ।
तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२॥
अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें ।
तया संकेतास उणें । निवृत्तीनें आणिलें ॥ ४३॥
अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती ।
निरुपाधि विश्रांती । योगियांची ॥ ४४॥
वस्तु जे कां निरुपाधी । तेचि सहज समाधी ।
जेणें तुटे आधिव्याधी । भवदुःखाची ॥ ४५॥
जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत ।
सिद्धांत आणि वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६॥
असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम ।
अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७॥
आपुलेनि अनुभवें । कल्पनेसि मोडावें ।
मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८॥
निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें ।
मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९॥
कल्पनेचें एक बरें । मोहरितांच मोहरे ।
स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५०॥
निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेचि नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१॥
पदार्था ऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हातीं धरूनि द्यावें ।
असो हें अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥ ५२॥
पुढें कथेच्या अन्वयें । केलाचि करूं निश्चये ।
जेणें अनुभवास ये । केवळ ब्रह्म ॥ ५३॥
हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥