Samas 4
समास 4 - समास चौथा : विमलब्रह्मनिरूपण
समास 4 - दशक ७
समास चौथा : विमलब्रह्मनिरूपण॥ श्रीराम ॥
ब्रह्म नभाहूनि निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ ।
अरूप आणि विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १॥
एकवीस स्वर्गें सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ ।
ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २॥
अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें ।
तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३॥
जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐशी वदे लोकवाणी ।
तेणेंविण रिता प्राणी । एकही नाहीं ॥ ४॥
जळचरां जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ ।
तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रासी ॥ ५॥
जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां न ये ।
म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६॥
आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्त्वतां ।
तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७॥
परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगडिलें ।
अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८॥
तयामध्येंचि असिजे । परी तयासी नेणिजे ।
उपजे भास नुपजे । परब्रह्म तें ॥ ९॥
आकाशामध्यें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ ।
परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १०॥
नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी ।
तैसें दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारूप ॥ ११॥
मिथ्याचि परी आभासे । निद्रितांसी स्वप्न जैसें ।
जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२॥
तैसें आपुलेनि अनुभवें । ज्ञानें जागृतीस यावें ।
मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३॥
आतां असो हें कुवाडें । जें ब्रह्मांडापैलीकडे ।
तेंचि आतां निवाडें । उमजोन दावूं ॥ १४॥
ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थमात्रासि व्यापून ठेलें ।
सर्वांमध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५॥
ब्रह्मामध्यें सृष्टी भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म असे ।
अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६॥
अंशमात्रें सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी ।
सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । माईल कैसें ॥ १७॥
अमृतीमध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास ।
म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो ॥ १८॥
ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें ।
सर्वांत परी संचलें । संचलेपणें ॥ १९॥
पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत ।
पंकीं आकाशीं अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥
ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे ।
परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१॥
खंब्रह्म ऐशी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती ।
म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२॥
काळिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ ।
शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३॥
म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन ।
आढळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४॥
शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणां ।
परंतु ते स्थिरावेना । वायूच ऐसी ॥ २५॥
असो ऐशी माया मायिक । शाश्वत तें ब्रह्म एक ।
पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६॥
पृथ्वीसि भेदूनि आहे । परी तें ब्रह्म कठिण नव्हे ।
दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७॥
पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ ।
अनळाहूनि कोमळ । वायु जाणावा ॥ २८॥
वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण ।
गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९॥
वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें ।
उपमेरहित संचलें । कठिण ना मृदु ॥ ३०॥
पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे ।
जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१॥
तेजीं असे परी जळेना । पवनीं असे तरी चळेना ।
गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२॥
शरीरीं अवघें व्यापलें । परी तें नाहीं आढळलें ।
जवळीच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३॥
सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें पाहणें घडे ।
बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४॥
तयांमध्येंचि आपण । आपणां सबाह्य तें जाण ।
दृश्या वेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५॥
कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें ।
जैसें न दिसें आपुलें । आपणासि धन ॥ ३६॥
जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे ।
अनुभवे हें कुवाडें । उकलावें ॥ ३७॥
मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस ।
पृथ्वीविण भकाश । एकरूप ॥ ३८॥
जें जें रूप आणि नाम । तो तो नाथिलाचि भ्रम ।
नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९॥
नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर ।
तैसें दावी वोडंबर । मायादेवी ॥ ४०॥
ऐशी माया अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत ।
सर्वांठायीं सदोदित । भरलें असे ॥ ४१॥
पोथी वाचूं जातां पाहे । मातृकामध्यें भरलें आहे ।
नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२॥
श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां ।
मना सबाह्य तत्त्वतां । परब्रह्म तें ॥ ४३॥
चरणीं चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं ।
करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४॥
असो इंद्रियसमुदाव । तयामध्यें वर्ते सर्व ।
जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५॥
जें जवळीच असे । पांहों जातां न दिसे ।
न दिसोन वसे । कांहीं एक ॥ ४६॥
जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें ।
आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७॥
ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे ।
अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८॥
जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया ।
ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९॥
साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण ।
जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५०॥
जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंही नुरे ।
विज्ञानवृत्ति मुरे । परब्रह्मीं ॥ ५१॥
ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत ।
योगिजना एकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२॥
हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके विमलब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥