उपासना

Samas 6

समास 6 - समास सहावा : बद्धमुक्त निरूपण

समास 6 - दशक ७

समास सहावा : बद्धमुक्त निरूपण ॥ श्रीराम ॥

अद्वैतब्रह्म निरूपिलें । जें कल्पनेरहित संचलें । क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १॥

परी म्यां तदाकार व्हावें । ब्रह्मचि होऊन असावें । पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २॥

कल्पनारहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख । म्हणोनि तेंचि एक । होऊन असावें ॥ ३॥

ब्रह्मचि होइजे श्रवणें । पुन्हां वृत्तिवरी लागे येणें । ऐसें सदा येणें जाणें । चुकेना कीं ॥ ४॥

मनें अंतरिक्षीं जावें । क्षणएक ब्रह्मचि व्हावें । पुन्हां तेथून कोसळावें । वृत्तिवरी मागुती ॥ ५॥

प्रत्यावृत्ति सैरावैरा । किती करूं येरज़ारा । पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६॥

उपदेशकाळीं तदाकार । होतां पडे हें शरीर । अथवा नेणें आपपर । ऐसें झालें पाहिजे ॥ ७॥

ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें । ब्रह्म होऊन संसार करणें । हेंही विपरीत दिसे ॥ ८॥

जो स्वयें ब्रह्मचि झाला । तो मागुता कैसा आला । ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९॥

ब्रह्मचि होऊन जावें । कां तें संसारीच असावें । दोहींकडे भरंगळावें । किती म्हणोनि ॥ १०॥

निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे । मागुता काम क्रोध खवळे । ब्रह्मरूपासी ॥ ११॥

ऐसा कैसा ब्रह्म झाला । दोहींकडे अंतरला । वोडगस्तपणेंचि गेला । संसार त्याचा ॥ १२॥

घेतां ब्रह्मसुखाची गोडी । संसारिक मागें वोढी । संसार करितां आवडी । ब्रह्मीं उपजे मागुती ॥ १३॥

ब्रह्मसुख नेलें संसारें । संसार गेला ज्ञानद्वारें । दोहीं अपुरीं पुरें । एकही नाहीं ॥ १४॥

याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित । काय करणें निश्चितार्थ । एकही नाहीं ॥ १५॥

ऐसा श्रोता करी विनंती । आतां रहावें कोणे रीतीं । म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६॥

आतां याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षण एक आतां ॥ १७॥

ब्रह्मचि होऊन जे पडले । तेचि मुक्तिपदास गेले । येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८॥

श्रोता विनंती करी पुढती । शुक मुक्तो वामदेवो वा हे श्रुती । दोघेचि मुक्त आदिअंतीं । बोलत असे ॥ १९॥

वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव । वेदवचनीं अभाव । कैसा धरावा ॥ २०॥

ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें । दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१॥

वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृष्टीवरी । ऐसें बोलतां उरी । कोणास आहे ॥ २२॥

बहु ऋषि बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी । झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३॥

प्रर्‍हादनारदपराशरपुंडरीक- व्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् । रुक्मांगदार्जुनवसिष्ठविभीषणादीन् पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १॥ श्लोक अर्थ १ – प्रह्लाद, नारद, पुंडरीक, व्यास, अंबरीष, शुक, शौनक,भीष्म, दाल्भ्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, बिभीषण या पुण्यवान परम भावतांचे मी स्मरण करतो.

कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रो । अथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २॥ श्लोक अर्थ २ – कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन –

यांहीवेगळे थोर थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । आदिकरून दिगंबर । विदेहादिक ॥ २४॥

शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच बुडाले । या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५॥

तरी वेद कैसा बोलिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला । ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर ॥ २६॥

वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष । साधु आणि व्युत्पन्न दक्ष । त्यांस हें न माने ॥ २७॥

तथापि हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें । वेदाचेनि उद्धरिलें । न वचे कोणा ॥ २८॥

वेदाअंगीं सामर्थ्य नसे । तरी या वेदासि कोण पुसे । म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे । जन उद्धरावया ॥ २९॥

वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी । म्हणोनि वेदीं सामर्थ्यासी । काय उणें ॥ ३०॥

वेद शास्त्र पुराण । भाग्यें झालिया श्रवण । तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१॥

श्लोक अथवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपाद । श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२॥

वेद शास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या आयणी । अगाध महिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३॥

एकाक्षर होतां श्रवण । तात्काळचि होइजे पावन । ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४॥

दोहींवेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे । असो हें जाणिजे चतुरें । येरां गाथागोवी ॥ ३५॥

वेद शास्त्रें पुराणें । कैशीं होती अप्रमाणें । दोघावांचूनि तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६॥

म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक मुक्त झाला । शुक तोही अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७॥

शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण । परी तो नव्हता अचेतन । ब्रह्माकार ॥ ३८॥

अचेतन ब्रह्माकार । असता शुक योगीश्वर । तरी सारासार विचार । बोलणें न घडे ॥ ३९॥

जो ब्रह्माकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला । शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४०॥

निरूपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार । धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१॥

क्षण एक ब्रह्मचि व्हावें । क्षण एक दृश्य धांडोळावें । नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वासी ॥ ४२॥

असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण । तया अंगीं बद्धपण । लावूं नये कीं ॥ ४३॥

म्हणोनि बोलतां चालतां । निचेष्टित पडिलें नसतां । मुक्ति लाभे सायुज्यता । सद्‌गुरुबोधें ॥ ४४॥

येक मुक्त एक नित्यमुक्त । एक जाणावे जीवन्मुक्त । येक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५॥

सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त । दोहीवेगळे नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ॥ ४६॥

स्वरूपबोधें स्तब्धता । ते जाणावी तटस्थता । तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७॥

येथें अनुभवासीच कारण । येर सर्व निष्कारण । तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८॥

कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला । तेणें शब्दें जाजावला । हें तों घडेना ॥ ४९॥

स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह । बद्ध मुक्त ऐसा भाव । विदेहाचकडे ॥ ५०॥

देहबुद्धी धरून चिंतीं । मुक्त ब्रह्मादिक नव्हेती । तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१॥

मुक्तपण हेंचि बद्ध । मुक्त बद्ध हें अबद्ध । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२॥

मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा । देहबुद्धीची अर्गळा । स्वरूपीं न संटे ॥ ५३॥

मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला । मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४॥

जयास बांधावें तें वाव । तेथें कैंचा मुक्तभाव । पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५॥

बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न मे वस्तुतः । गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १॥

श्लोक अर्थ- बद्ध, मुक्त हे वर्णन गुणांच्या क्षेत्रात येते, आत्मावरच्या दृष्टीने ते योग्य नाही. गुणांचे मूळ माया आहे आणि ती तर खरी नाही. म्हणून आत्य्याला बंधनही नाही आणि मोक्षही नाही.

तत्त्वज्ञाता परमशुद्ध । तयासि नाहीं मुक्त बद्ध । मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६॥

जेथें नाम रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे । मुक्त बद्ध हें विसरे । विसरपणेंशीं ॥ ५७॥

बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न । बाधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८॥

एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम । मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९॥

असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां । ते कल्पना तरी तत्त्वतां । साच आहे ॥ ६०॥

म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ । स्वप्न मिथ्या तात्काळ । जागृतीस होय ॥ ६१॥

स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं आला । कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२॥

म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान । शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३॥

बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह । साधु सदा निःसंदेह । देहातीत वस्तु ॥ ६४॥

आतां असो हें पुढती । पुढें रहावें कोणें रीतीं । तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम समास सहावा ॥ ६॥

20px