Samas 7
समास 7 - समास सातवा : साधनप्रतिष्ठानिरूपण
समास 7 - दशक ७
समास सातवा : साधनप्रतिष्ठानिरूपण ॥ श्रीराम ॥
वस्तूसि जरी कल्पावें । तरी ते निर्विकल्प स्वभावें । तेथें कल्पनेच्या नावें । शून्याकार ॥ १॥ श्रोते म्हणतात की, आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळात निर्विकल्प आहे. कल्पना जे मन करते ते मनही जर त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर मग तेथे कल्पनेचा शिरकाव कसा होणार ? म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार होतो म्हणजे तिचे अस्तित्वच राहात नाही, असे श्रोता म्हणतो. (१)
तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हाता । ओळखी ठायीं न पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २॥ तरी पण जर आत्मवस्तूची कल्पना करू लागलो, तर काहीच हाती ललत नाही. मनाला वस्तूची ओळखच होत नाही. उलट भ्रम मात्र उत्पन्न होतो. (२)
कांहीं दृष्टीस न दिसे । मनास तेही न भासे । न भासे न दिसे । कैंसें ओळखावें ॥ ३॥ जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही, मनाला भासत नाही, अशा त्या न दिसणाऱ्या, न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावे तरी कसे ? (३)
पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार । कल्पूं जातां अंधकार । भरला वाटे ॥ ४॥ त्याला पाहावयाचा प्रयत्न करावा तर, त्याला कुठलाही आकारच नाही. मनाने अनुमान करायला जावे तर मन शून्याकार होऊन जाते. तरीही अंतश्चधूपुढे त्याची कल्पना करावी म्हटले तर सर्वत्र अंधकार भरला आहे, असेच वाटते. (४)
कल्पूं जातां वाटे काळें । परी ते काळें ना पिंवळें । आरक्त निळें ना ढवळें । वर्णरहित ॥ ५॥ तरीही कल्पना करू लागल्यास ते काळे आहे असे वाटते. पण संत सांगतात की परब्रह्म, काळे नाही, पिवळे नाही, लालही नाही, निळे वा पांढरेही नाही. त्याला कुठलाही रंगच नाही. (५)
जयास वर्णव्यक्ति नसे । भासाहूनि अनारिसें । रूपचि नाहीं कैसें । ओळखावें ॥ ६॥ ज्याला वर्ण नाही, जे अव्यक्त आहे आणि ज्याला रूपही नाही, असे भासाहूनही विलक्षण असलेले ब्रह्म ओळखावे तरी कसे ? (६)
न दिसतां ओळखण । किती धरावी आपण । हें तों श्रमासीच कारण । होत असे ॥ ७॥ जे दिसतही नाही त्याची ओळख आपण कशी आणि किती धरावी ? त्यामुळे श्रम मात्र होतात. (७)
जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त । जो अचिंत्य चिंतनातीत । परमपुरुष ॥ ८॥ जो निर्गुण असून गुणातीत आहे, जो अदृश्य व अव्यक्त आहे आणि अचिंत्य असून चिंतनातीत आहे तोच परम पुरुष होय. (८)
अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १॥ श्लोक अर्थ- अचिंत्य, अव्यक्तरूप, निर्गुण, गुणाला, सगळ्या जगताचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो.
अचिंत्य तें चिंतावें । अव्यक्तास आठवावें । निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९॥ जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे, जे अव्यक्त आहे त्याचे रूप कसे आठवावे आणि जे गुणरहित आहे त्याला ओळखावे तरी कसे ? (९)
जें दृष्टीसचि न पडे । जें मनासही नातुडे । तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १०॥ जे डोळ्यांनी दिसत नाही, ज्याच्यापर्यंत मनाची धाव पोहोचू शकत नाही, त्या निर्गुणाला पाहणे कसे बरे शक्य होईल ? (१०)
असंगाचा संग धरणें । निरवलंबीं वास करणें । निःशब्दासी अनुवादणें । कोणेपरी ॥ ११॥ असंगाशी संगती कशी करायची ? आधायशिवायच आकाशात अधांतरी कसे राहावे ? ज्याच्यापर्यंत शब्द पोहोचू शकत नाही, त्याचे वर्णन कसे करावे ? (११)
अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां । अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२॥ अचिंत्याचे चिंतन करायचा प्रयत्न केला किंवा निर्विकल्पाची कल्पना करू लागलो आणि अद्वैताचे ध्यान धरावे म्हटले तर द्वैताचाच जोर होतो. (१२)
आतां ध्यानचि सांडावें । अनुसंधान तें मोडावें । तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३॥ आता असे होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचे ध्यानच करणे सोडून द्यावे. अनुसंधानही सोडून द्यावे म्हटले तर परत महासंशय उत्पन्न होतात. (१३)
द्वैताच्या भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी । तेणें समाधाना उरी । कदा असेचिना ॥ १४॥ ध्यान वा अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिले तर आत्मवस्तु कशी प्रास होणार ? आणि अंतःकरणात शाश्वत समाधान तरी कसे लाभणार ?(१४)
सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे । नित्यानित्यविचारें घडे । समाधान ॥ १५॥ आता येधून पुढे वक्ता उत्तर देत आहे की, आपण मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मवस्तूचे ध्यान वा अनुसंधान करण्याची सवय लावली की कालांतराने त्या अभ्यासाच्या योगाने व नित्यानित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन समाधान लाभते. (१५)
वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी करितां कांहींच नुमजे । शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६॥ आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते म्हणून ते चिंतन करणे जर सोडून दिले, तर मग काहीच कळणार नाही आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन संदेहात पडेल (१६)
म्हणोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सारावा । अहंभाव ओसरावा । परी तो ओसरेना ॥ १७॥ म्हणून नित्यानित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूस सारावा व अहंभावाचा त्याग करावा तर तो अहंभाव काही केल्या ओसरत नाही. (१७)
परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत । तेथें हेतु आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८॥ अद्वैत परब्रह्माचे चिंतन करू जावे, तर तेथे द्वैत उत्पन्न होते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टान्ताने केलेले मनन काहीच कामास येत नाही. (१८)
तें आठवितां विसरिजे । कां तें विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९॥ परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडला पाहिजे अथवा स्वतःला विसरून त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मास जाणले असता जाणारा मी शिल्लक उरता कामा नये. (१९)
त्यास न भेटतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी । ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २०॥ मीपणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही आणि ‘ मी भेट घेतो ‘ असा जो ‘ मी ‘ पणा तो सोडून दिला की अचानक भेटघडते. अशी ही फारनवलाईची गोष्ट आहे ! तिचे वर्णन शब्दात करताच येत नाही. तेथे मौनच पडते. (२०)
तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना । लागला संबंध तुटेना । निरंतर ॥ २१॥ त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावे तर ते साध्य होत नाही, पण वास्तविक पाहता ते सदैव प्रासच आहे. त्यास सोडावे म्हटले तरी ते सुटत नाही. आपण सोडूही शकत नाही. एखादा संबंध पाठीस लागला की तो जसा सुटता सुटत नाही, तसे परब्रह्म निरंतर आपल्या बरोबरच राहते. (२१)
तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दुराशे । न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥ ते सदा आपल्या सन्निध असते, पण द्वैतभावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावते. पण ते जरी दृष्टीस पडले नाही तरी सर्वत्र तेच प्रकाशत असते. (२२)
जेथें अपाय तेथें उपाय । आणि उपाय तोचि अपाय । हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३॥ त्याला पाहण्याचा उपाय करू जावे, तर कर्तेपणाच्या पडद्यामुळे ते दिसत नाही म्हणजेच अपाय होतो. हे अपाय करणारे कर्तेपण सुटले तर मात्र तोच खस उपाय होऊन ते सर्वत्र प्रकाशू लागते. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसे काय उलगडणार ? (२३)
तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे । तें वृत्तिविण पाविजे । निवृत्तिपद ॥ २४॥ ज्यावेळी आपणास वाटते की मला ते उमजले, मी त्याला जाणले त्यावेळी खरे तर आपण काहीच जाणलेले नसते आणि ज्यावेळी खरे ते उमजते तेव्हा जाणून घेणाराच कुणी वेगळा तेथे नसतो. त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असते. वृत्ती ही ज्यावेळी लय पावते, तेव्हा निवृत्तिपदाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते. (२४)
तें ध्यानीं धरितां नये । चिंतनीं चिंतावें तें काये । मनामध्यें न समाये । परब्रह्म तें ॥ २५॥ परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही व ते मनात मावत नाही. (२५)
त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें निर्मळ निश्चळ । विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंचि असे ॥ २६॥ त्याला जलाची उपमा देता येत नाही. कारण ते निर्मळ, निश्चल असते आणि प्रलयकाळी सर्व विश्व, दृश्यवृष्टी जलमय झाली, तरी ते जसेच्या तसे कोरडेच असते. (२६)
नव्हे प्रकाशासारिखें । अथवा नव्हे काळोखें । आतां तें कासयासारिखें । सांगावें हो ॥ २७॥ ते उजेडासारखेही नाही अथवा ते काळोखासारखेही नाही तर आता ते कशासारखे म्हणून सांगावे हो ! (२७)
ऐसें ब्रह्म निरंजन । कदा नव्हे दृश्यमान । लावावें तें अनुसंधान । कोणे परी ॥ २८॥ ते निरंजन (निर्मल) ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होतच नाही, मग जे दिसत नाही, तेथे अनुसंधान कशाप्रकारे लावावे ? (२८)
अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां । नेणे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९॥ अनुसंधान लावण्याचा प्रयत्न केला की नाहीच असे वाटून वृत्ती शून्याकार होते आणि मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. (२९)
लटिकेंचि काय पहावें । कोठें जाऊन रहावें । अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३०॥ जे नाही ते उगीच पाहण्याचा खोल आव कशाला आणावा ? ते निश्चित कोठे आहे हे माहीत नाही तर त्याला शोधण्यासाठी कोठे जाऊन राहावे ? म्हणून परब्रह्म हे आपले सत्य स्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली. (३०)
अभावचि म्हणों सत्य । तरी वेद शास्त्रें कैसें मिथ्य । आणि व्यासादिकांचें कृत्य । वाउगें नव्हे ॥ ३१॥ परब्रह्म आपले सत्य स्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्रालाही मिथ्या म्हणावे लागेल आणि व्यासादिकांचे कार्य हेही व्यर्थच म्हणावे लागेल. (३१)
म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । बहुत ज्ञानाचे उपाय । बहुतीं निर्मिलीं तें काय । मिथ्या म्हणावें ॥ ३२॥ म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचे ज्ञान व्हावे म्हणून जे अनेक उपाय सांगितले आहेत त्यांनाही मिथ्या म्हणावे काय ? (३२)
अद्वैतज्ञानाचा उपदेश । गुरुगीता तो महेश । सांगतां होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३॥ अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीस केला, तीच गुरुगीता होय. (३३)
अवधूत गीता केली । गोरक्षास निरूपिली । ते अवधूतगीता बोलिली । ज्ञानमार्ग ॥ ३४॥ अवधूतांनी अवधूतगीता गोरखनाथास सांगितली व तिच्याद्वारे ज्ञानोपदेश केला. (३४)
विष्णु होऊन राजहंस । विधीस केला उपदेश । ते हंसगीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५॥ विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवास जो उपदेश केला तो हंसगीता नावाने प्रसिद्ध आहे. (३५)
ब्रह्मा नारदातें उपदेशित । चतुःश्लोकी भागवत । पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६॥ ब्रह्मदेवाने नारदास चार श्लोकांत जो ज्ञानोपदेश केला, त्यास चतुःश्लोकी भागवत म्हणतात. त्याचाच व्यासांनी पुढे खूप विस्तार केला. (३६)
वासिष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी । कृष्ण सांगे अर्जुनासी । सप्तश्लोकी गीता ॥ ३७॥ वसिष्ठ ऋषींनी रघुनाथास जो उपदेश केला, तो योगवासिष्ठ म्हणून ओळखला जातो, तर कृष्णांनी अर्जुनाला सातश्लोकी गीता सांगितली. (३७)
ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले बहुतीं । अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८॥ अशा किती ग्रंथांची नावे घ्यावीत ? अनेक ऋषींनी अनेक ग्रंथांत ज्या अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला, ते आदि- अंती सत्यच आहे. (३८)
म्हणोन मिथ्या आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन । प्रज्ञेरहित ते जन । तयांस हें कळेना ॥ ३९॥ म्हणून आत्मज्ञान हे मिथ्या आहे असे जे म्हणतात, ते पतन पावतात. पण मंद बुद्धीच्या लोकांना हेकळत नाही. (३९)
जेथें शेषाची प्रज्ञा मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली । जाणपणें न वचे वदली । स्वरूपस्थिती ॥ ४०॥ स्वरूपस्थितीचे वर्णन करताना शेषाची बुद्धीली काम करीनाशी झाली. सुतींनाही ते जमले नाही, म्हणून त्यांनी मौन धारण केले. ‘मी जाणतो ‘ या अभिमानाने स्वरूपस्थिती सांगितली जाणे अशक्यच आहे. (४०)
आपणास नुमजे बरवें । म्हणोनि मिथ्या कैसें करावें । नातरी सुदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१॥ आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसे म्हणावे ? सद्गुरुमुखाने श्रवण करून मनन, निदिध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. (४१)
मिथ्या तेंचि सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें । संदेहसागरीं बुडालें । अकस्मात मन ॥ ४२॥ ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले. ही पांचभौतिक वृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते, म्हणून ती सत्य वाटत होती, ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला व ते एकाएकी संशयसमुद्रात बुडाले. (४२)
मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे । तेणें गुणें संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३॥ मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तु तर मन जे जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतात. (४३)
तरी तो पंथचि मोडावा । मग परमात्मा जोडावा । समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४॥ म्हणून मीपणाचा मार्गच सोडून द्यावा व साधूंच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थप्रासी करून घ्यावी. (४४)
मीपण शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना । मीपण सोडितां सुटेना । कांहीं केल्या ॥ ४५॥ मीपण हे शस्त्राने तुटत नाही. त्याला फोडावे म्हटले तर ते फुटत नाही. त्याला सोडून झटकून यकावे म्हटले तरी ते काही केल्या सुटत नाही. (४५)
मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे । मीपणें शक्ति गळे । वैराग्याची ॥ ४६॥ मीपण असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते. मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. (४६)
मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे । मीपणें सकळही उडे । यश कीर्ति प्रताप ॥ ४७॥ एवढेच काय, मीपणामुळे प्रपंचसुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर साफच बुडतो. मीपणामुळे माणसाचे यश, कीर्ती, प्रताप सर्व नष्ट होते. (४७)
मीपणें मैत्री तुटे । मीपणें प्रीति आटे । मीपणें लिगटे । अभिमान अंगीं ॥ ४८॥ मीपणाने मैत्री तुटते. प्रीतीला ओहोटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिकटून बसतो. (४८)
मीपणें विकल्प उठे । मीपणें कलह सुटे । मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९॥ मीपणाने मनात संशय निर्माण होतो, मीपणाने कलह मोकळा सुटतो म्हणजे सर्वांशी भांडण होऊ लागते आणि देह-तादाल्याचा श्रम उत्पन्न होतो व ऐक्य भंग पावते. (४९)
मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे । म्हणून मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५०॥ मीपणा कुणालाच सहन होत नाही. मग भगवंताला कसा सहन होईल ? म्हणून जो मीपणा सोडून निरभिमान वृत्तीने सहतो, तोच समाधानी असतो. (५०)
मीपण कैसे । त्यागावें । ब्रह्म कैसें अनुभवावें । समाधान कैसें पावावें । निःसंगपणें ॥ ५१॥ यावर श्रोता प्रश्न करीत आहे की, मीपणाचा त्याग कसा करावा ? ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा ? व कोणत्या प्रकारे समाधान प्रास करून घ्यावे ? (५१)
मीपण जाणोनि त्यागावे । ब्रह्म होऊन अनुभवावे । समाधान ते पावावे । निःसंगपणे ॥ ५२॥ तो म्हणतो की, मीपण ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा. तसेच निःसंग होऊन समाधान मिळवावे. (५२)
आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन । करूं जाणे तोचि धन्य । समाधानी ॥ ५३॥ याखेरीजही एक प्रकारचे समाधान आहे. जो कर्तृत्वाहंकासवाचून साधन करण्याची कुशलता प्रास करतो, असा जो समाधानी तो खरोखरच धन्य जाणावा. (५३)
मी ब्रह्मचि झालों स्वतां । साधन करील कोण आतां । ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४॥ जर मी आता ब्रह्मच झालो आहे, तर आता साधना कोण करील ? असे जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून यकते. (५४)
ब्रह्मीं कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे । तयेसी शोधूनि पाहे । तोचि साधु ॥ ५५॥ ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजेच द्वैत टिकू शकत नाही. असे असता तेथेच कल्पनेचा शिरकाव झाला तर जो खरोखरच साधू असतो, तो कल्पनेचे मूळ शोधून काढून तिचा समूळ नाश करतो. (५५)
निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें । मीपणास त्यागावें । येणें रीतीं ॥ ५६॥ समर्थ सांगतात की, निर्विकल्पाची कल्पना आपण करावी पण कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये. याप्रमाणे वेगळे न राहता परब्रह्मवस्तूशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच घडतो. (५६)
ब्रह्मविद्येच्या लपणीं । कांहींच न व्हावें असोनी । दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणें ॥ ५७॥ या ब्रह्मविद्येतीलरहस्य हे आहे की, ज्यास तिची प्राप्ती होते, तो देहात असून नसल्यासारखाच होतो. हे कसे होते ते जो दक्ष म्हणजे सावधही असतो, तोच खगेखरजाणतो. (५७)
जयास आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें । येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें ॥ ५८॥ निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते, तेव्हा कल्पनाच शिल्लक उरत नाही. (५८)
पदींहून चळों नये । करावे साधनउपाये । तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची ॥ ५९॥ याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की, आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये. साधन करीतच राहावे म्हणजे त्यायोगे ते करूनही त्यापासून अत्सि कसे वहावे, ते कळून येते. (५९)
राजा राजपदीं असतां । उगीच चाले सर्व सत्ता । साध्यचि होऊन तत्त्वतां । साधन करावें ॥ ६०॥ राजा आपल्या राजपदी आरूढ झालेला असतो. तो स्वतः काहीच करीत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. तसे आपण ब्रह्मरूप होऊन वहावे आणि कर्तृत्वाहंकारन धरता साधन करीत वहावे. (६०)
साधन आलें देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा । ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे ॥ ६१॥ साधन ही क्रिया आहे. ती देहाच्या द्वारेच घडत असते आणि आपण तर सर्वथा देह नाहीच. त्यामुळेच साधन करूनही आत्मज्ञानी हा सहजच अकर्ताच राहतो. (६१)
देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत असतां स्वभावें । देह कैंचा ॥ ६२॥ साधन त्यागावे, असा संकल्प देहबुद्धीशिवाय उडू शकत नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत तर मग देहाचा संबंध येतोच कुठे ? (६२)
ना तें साधन ना तें देह । आपण आपला निःसंदेह । देहींच असोन विदेह । स्थिति ऐशी ॥ ६३॥ देहाकडून होणारे साधन किंवा देह हे आपल्याशी संबंधित नाही असा निःसंदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत. देहात असून विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. (६३)
साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता । आळस प्रबळे तत्त्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४॥ साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणास ब्रह्मज्ञान झाले आहे, असे वाटून त्यानिमित्ताने आळस मात्र वाढू लागतो. (६४)
परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे । मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥ ६५॥ परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागत होतो, ध्यानाच्या मिषाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत या कल्पनेमुळे स्वच्छदपणाने तो विषयभोग सेवन करू लागतो व दोषी होतो. (६५)
निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद पडे । उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६॥ निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते, संवादाच्या मिषाने वितंडवाद घालू लागतो आणि उपाधीच्यायोगे अभिमान अंगी जडतो. (६६)
तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७॥ याप्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिषाने अंतरात आळस प्रवेशला की, मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखे साधन कशासाठी करू ? असे तो म्हणू लागतो. (६७)
किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् । आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १॥ श्लोक अर्थ-महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते, त्याचप्रमाणे आत्माही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कोठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू ?
वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिरविलें । स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८॥ या वचनासारखी वचने तो आपले वागण्याचे समर्थन करण्यास आधार म्हणून देतो. जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे त्याप्रमाणे तो आपला नाश आपणच करून घेत असतो. (६८)
तैसा उपायाचा अपाय । विपरीतपणें स्वहित जाय । साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९॥ अशा उपायानेच जो स्वतःस अपाय करून घेतो, तो या विपरीत आचरणाने स्वहितास मुकतो. साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्याने तो वास्तविक बद्ध होतो. (६९)
साधन करितांच सिद्धपण । हातींचें जाईल निघोन । तेणेंगुणें साधन । करूंच नावडे ॥ ७०॥ त्याला वाटत असते की, आपण सिद्ध असून जर साधन केले तर सिद्धपण हातातून निघून जाईल या विचाराने त्याला साधन करावेसेच वाटत नाही; ते आवडत नाहीसे होते. (७०)
लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक । साधन करिती ब्रह्मादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१॥ त्याला वाटते की आपण साधना करीत राहिलो, तर लोक आपल्याला साधकच समजतील सिद्ध मानणार नाहीत. याचीच त्याला फार लाज वाटत असते; पण ब्रह्मादिकही साधन करीतच असतात हे त्याला कळत नाही. (७१)
आतां असो हे अविद्या । अभ्याससारिणी विद्या । अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रह्म ॥ ७२॥ हा सर्व अविद्येचा प्रभाव होय. सदविद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते आणि आद्य असे जे पूर्ण ब्रह्म त्याची प्राप्ती अभ्यासानेच होते. (७२)
अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचें साधन । बोलिलें पाहिजे ॥ ७३॥ यावर श्रोत्याने प्रश्न विचारल की, परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा ते आपण सांगावे. (७३)
याचें उत्तर श्रोतयासी । दिधलें पुढियलें समासीं । निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४॥ याचे उत्तर पुढील समासात दिले जाईल. त्यात परमार्थाच्या साधनाचे निरूपण केले जाईल. (७४)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥