उपासना

Samas 8

समास 8 - समास आठवा : श्रवणनिरूपण

समास 8 - दशक ७

समास आठवा : श्रवणनिरूपण ॥ श्रीराम ॥

ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १॥ श्रीसमर्थ म्हणतात की, आता परमार्थाचे साधन सांगतो, ते ऐका. च्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्रास होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे. (१)

श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें उद्भवे विरक्ती । श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २॥ श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होते. अंतरात वैराग्य उत्पन्न होते आणि विषयांची आसक्ती नष्ट होते. (२)

श्रवणें घडे चित्तशुद्धी । श्रवणें होय दृढ बुद्धी । श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३॥ श्रवणामुळे चित्तशुद्धी होते. निश्चयात्मक बुद्धी प्रास होते आणि अभिमानाची उपाधी तुटते. (३)

श्रवणें निश्चयो घडे । श्रवणें ममता मोडे । श्रवणें अंतरीं जोडे । समाधान ॥ ४॥ श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो. देहासंबंधी ममता नाहीशी होते आणि अंतर्गत समाधान टिकून राहाते. (४)

श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशयो तुटे । श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥ ५॥ श्रवणाने शंकांचे निरसन होते, संशय नाहीसे होतात आणि मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. (५)

श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥ ६॥ श्रवणाने मनोनिग्रह साधू लागतो, समाधान लाभते आणि देहबुद्धीचे बंधन तुटून जाते. (६)

श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये । श्रवणें नाना अपाय । भस्म होती ॥ ७॥ श्रवणाने मीपण नाश पावते, अहंकार नष्ट होतो, धोका टळतो व नाना प्रकारचे अपाय भस्मसात होतात. (७)

श्रवणें होय कार्यसिद्धि । श्रवणें लागे समाधी । श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८॥ श्रवणाने कार्यसिद्धी होते, समाधी लागते आणि शाश्वत समाधानरूपी सिद्धीची प्राप्ती होते. (८)

सत्संगावरी श्रवण । तेणें कळे निरूपण । श्रवणें होईजे आपण । तदाकार ॥ ९॥ संतांच्या सान्निध्यात अध्यात्मनिरूपणाचे श्रवण घडले की आपण अर्थाशी एकरूप होतो. (९)

श्रवणें प्रबोध वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे । श्रवणें विषयांचे ओढे । तुटोन जाती ॥ १०॥ श्रवणाने ज्ञान वाढते, प्रज्ञा जागत होते आणि मनाची विषयाकडे जी ओढ असते, ती कमी होते. (१०)

श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे । श्रवणें वस्तु निवळे । साधकांसी ॥ ११॥ श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय हे कळते, त्यामुळे ज्ञानाची वृद्धी होते व अखेर साधकाला आत्मवस्तूची प्राप्ती होते. (११)

श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणें मन हें मागे । भगवंतासी ॥ १२॥ श्रवणाने सद्‌बुद्धी उत्पन्न होते, विवेक जागृत होतो आणि मन भगवंताची मागणी करू लागते. (१२)

श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम ओहटे । श्रवणें धोका आटे । एकसरां ॥ १३॥ श्रवणाने कुसंगती सुटते, कामविकार कमी होऊ लागतो आणि त्याचबरोबर धोके कमी होऊ लागतात. (१३)

श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे । श्रवणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४॥ श्रवणाने मोहाचा नाश होतो, प्रतिभा किंवा काव्यष्यी प्रकाशू लागते आणि आत्मवस्तूचे निश्चयात्मक ज्ञान होते. (१४)

श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें आतुडे शांती । श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळपद ॥ १५॥ श्रवणाच्या योगे उत्तम गती मिळते, शांतीचा लाभ होतो आणि वृत्तिरहित परब्रह्माची प्राप्ती होते. (१५)

श्रवणा-ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व कांहीं । भवनदीच्या प्रवाहीं । तरणोपाय श्रवणें ॥ १६॥ श्रवणासारखे सार नाही. श्रवणाने सर्व काही प्रास होते. या भवनदीच्या प्रवाहातून तरून जाण्यास श्रवण हाच उपाय आहे. (१६)

श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वीं सर्वारंभ । श्रवणें होय स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७॥ नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणाने होतो. सर्व विद्या, कला आदींचा आरंभ श्रवणानेच होतो. श्रवणाने आपोआपच सर्व काही घडत असते. (१७)

प्रवृत्ति अथवा निवृत्ति । श्रवणेंविण न घडे प्राप्ती । हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८॥ प्रपंच असो वा परमार्थ, श्रवणाशिवाय काहीच प्रास होत नाही, या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रत्यक्ष येतच असतो. (१८)

ऐकिल्याविण कळेना । हें ठाउकें आहे जनां । त्याकारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९॥ कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही, हे सर्व लोकांना माहीतच आहे. त्यामुळे कशासाठीही जे प्रयत्न केले जातात त्यांच्या मुळाशी श्रवण असते. आधी श्रवण घडते मग प्रयत्न केले जातात. (१९)

जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं । म्हणोनिया दुजें कांहीं । साम्यता न घडे ॥ २०॥ ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलेच नसते, त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो, म्हणून श्रवणासारखे त्याच्याशी साधर्ण्य असणारे दुसरे काहीच नाही. (२०)

बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंविण तत्त्वता । कार्य न चले ॥ २१॥ अनेक साधनांसंबंधी विचार केला असता श्रवणासारखे सर्वोकृष्ट साधन दुसरे नाही हे कळून येते. खरोखरच श्रवणाशिवाय कुठलेही कार्य घडूच शकत नाही. (२१)

न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२॥ जसा सूर्य उगवला नाही, तर सर्वत्र अंधाराचेच साम्राज्य असते. तसाच प्रकार श्रवणाचा जाणावा. (२२)

कैशी नवविधा भक्ती । कैशी चतुर्विधा मुक्ती । कैशी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न कळे ॥ २३॥ नवविधा भक्ती कशी करावी, चतुर्विध मुक्ती कुठल्या आहेत, सहजस्थिती कशाला म्हणतात, हे सर्व श्रवणाशिवाय कळत नाही. (२३)

न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण । न कळे कैसें उपासन । विधियुक्त ॥ २४॥ षडूविध कर्माचरण म्हणजेच खान, संध्या, जप, होम, पठण-पाठण, देवतार्चन व वैश्वदेव कसे करावे, पुरश्चरण म्हणजे काय, तसेच विधियुक्त उपासना कशी करावी वगैरे सर्व गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाहीत. (२४)

नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना साधनें । नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५॥ नाना व्रते, नाना दाने, नाना तपे, नाना साधने, नाना प्रकारचे योग, नाना तीर्थाने यांचे ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही. (२५)

नाना विद्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन । नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥ २६॥ नाना विद्या, पिढ्यान, नाना तत्त्वांचे शोधन, नाना कल, ब्रह्मज्ञान यांपैकी काहीही श्रवणाशिवाय कळत नाही. (२६)

अठरा भार वनस्पती । एक्या जळें प्रबळती । एक्या रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७॥ ज्याप्रमाणे अठसभार वनस्पतींची वाढ एका जलमुळेच होते, सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होते. (२७)

सकळ जीवांस एक पृथ्वी । सकळ जीवांस एक रवी । सकळ जीवांस वर्तवी । एक वायु ॥ २८॥ सर्व जीवांना आश्रय एकाच पृथ्वीचा असतो, सर्वांना प्रकाश देणारा सूर्यही एकच असतो आणि सर्व प्राण्यांचे चलनवलन करविणारा वायूही एकच असतो. (२८)

सकळ जीवांस एक पैस । जयास बोलिजे आकाश । सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं ॥ २९॥ सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो व सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. (२९)

तैसें सकळ जीवांस मिळोन । सार एकचि साधन । तें हें जाण श्रवण । प्राणिमात्रांसीं ॥ ३०॥ त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असे एकच साधन म्हणजे श्रवण हेच सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करणारे आहे. (३०)

नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । सर्वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥३१॥ पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य मते आहेत पण सर्वोपयोगी असे श्रवणासारखे दुसरे साधनच नाही. (३१)

श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्षु होती । मुमुक्षूचे साधक अती । नेमेंसिं चालती ॥ ३२॥ श्रवणाने उपरती होते व बद्ध असतात ते मुमुक्षू होतात. मुमुक्षू असतात ते अत्यंत नेमनिष्ठ साधक बनतात. (३२)

साधकांचे होति सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोध । हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३॥ जे साधक असतात, त्यांच्याठिकाणी प्रबोध बाणतो म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ते सिद्ध होतात. हे तर सर्व लोकांत प्रसिद्धच आहे. (३३)

ठायींचे खळ चांडाळ । तेचि होती पुण्यशीळ । ऐसा गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४॥ अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात, असा हा श्रवणाचा शीध फलदायी गुण आहे. (३४)

जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पुण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५॥ जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो, तोच श्रवणाने पुण्याच्या होतो. असा हा श्रवणाचा अगाध महिमा आहे. त्याचे यथार्थ वर्णन करताच येत नाही. (३५)

तीर्थव्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती । तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्रचीत श्रवणें ॥ ३६॥ तीर्थयात्रा, व्रते वगैरेंची फलश्रुती भविष्यकाळात फल देणारी असते पण श्रवणाचे तसे नाही, त्याचे फळ हातोहात मिल्ले. ही अनुभवाची गोष्ट आहे. (३६)

नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधी । तैशी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७॥ नाना रोग, नाना व्याधी असल्या तरी काही रामबाण औषधे अशी असतात की त्या रोगांचा व्याधींचा तत्काळ नाश होतो. श्रवणाची कार्यसिद्धीसुद्धा अशीच तत्काळ फल देणारी आहे हे अनुभवी लोक जाणतात. (३७)

श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे । मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥ ३८॥ श्रवणातील विचारांचे नीट आकलन झाले तरच तत्काळ भाग्य उदयास येते आणि मुख्य परमात्माच स्वानुभवाच्या योगे प्रास होतो. (३८)

या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान । निदिध्यासें समाधान । होत असे ॥ ३९॥ श्रवणाचा विचार कळणे, सावधपणे अर्थ समजून घेणे, त्याचे वारंवार चिंतन करणे यास मनन म्हणतात. त्याचेच सतत अनुसंधान ठेवणे यास निदिध्यास म्हणतात व त्यायोगेच समाधान लाभते. (३९)

बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे । अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४०॥ वक्ता जे बोलतो, त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान मिळते व सतत अनुसंधान करण्याने अकस्मात अंतरात निश्चयात्मक स्व-स्वरूपानुभव येऊन निःसंदेहता प्रास होते. (४०)

संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणें होय निर्मूळ । पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१॥ संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो. तो संदेह श्रवणाने मुळासकट नष्ट होतो आणि त्यामुळे पुढे अगदी सहजच प्रांजळ समाधान लाभते. (४१)

जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान । मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं ॥ ४२॥ जेथे श्रवण, मनन नसते तेथे समाधान कसे टिकून राहणार ?’ मी मुक्त झालो ‘ या अभिमानामुळे श्रवण, मनन केले नाही, तर मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो बद्ध होतो. (४२)

मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध । श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३॥ मुमुक्षू असो, साधक असो वा सिद्ध असो, श्रवण, मननाशिवाय तो अबद्धच जाणावा. श्रवण, मननानेच चित्तवृत्ती शुद्ध होते. (४३)

जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विलक्षण । तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४॥ ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचे श्रवण होत नसेल ते विपरीत जाणून साधकाने तेथे खरोखर एक क्षणभरही थांबू नये. (४४)

जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ । मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय ॥ ४५॥ जेथे श्रवणरूपी स्वार्थ साधला जात नाही तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार ? पूर्वी जे काही साधन केले असेल तेही श्रवणाशिवाय व्यर्थ होते. (४५)

तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें । नित्य नेमें तरावें । संसारसागरीं ॥ ४६॥ म्हणून नित्यनेमाने श्रवणरूपी साधन मनापासून करीत वहावे म्हणजे सहजपणे ससारसागस्तून तरून जाता येते. (४६)

सेविलेंचि सेवावें अन्न । घेतलेंचि घ्यावें जीवन । तैसें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ४७॥ ज्याप्रमाणे वारंवार अन्नसेवन करावेच लागते, किंवा पाणी वरचेवर ध्यावेच लागते, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थास अत्यंत आवश्यक असल्याने श्रवण-मनन सोडूच नये. (४७)

श्रवणाचा अनादर । आळस करी जो नर । त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८॥ जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वहितास मुकतो. (४८)

आळसाचें संरक्षण । परमार्थाची बुडवण । याकारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे ॥ ४९॥ त्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते. म्हणून असे होऊ नये, यासाठी श्रवण केलेच पाहिजे. (४९)

आतां श्रवण कैसें करावें । कोण्या ग्रंथास पाहावें । पुढिलिये समासीं आघवें । सांगिजेल ॥ ५०॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८॥

20px