उपासना

Samas 9

समास ९ - समास नववा : श्रवणनिरूपण

समास ९ - दशक ७

समास नववा : श्रवणनिरूपण ॥ श्रीराम ॥

आतां श्रवण कैसें करावें । तेंही सांगिजेल स्वभावें । श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १॥ श्रीसमर्थ म्हणतात की, आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो. श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून अवधान द्यावे. (१)

एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें झालें समाधान मोडे । केला निश्चयो विघडे । अकस्मात ॥ २॥ एखाद्याचे वस्तूत्व असे असते की, ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते. अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो. (२)

तें वक्तृत्व त्यागावें । जें मायिक स्वभावें । तेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३॥ जे वस्तूत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते व स्वाभाविकपणे मायिक असते ते ऐकूच नये. (३)

एक्या ग्रंथें निश्चयो केला । तो दुजयानें उडविला । तेणें संशयचि वाढला । जन्मवरी ॥ ४॥ एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मासंबंधी निश्चय झाला होता. तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडवून लावला. त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला. (४)

जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती । अद्वैतग्रंथ परमार्थीं । श्रवण करावे ॥ ५॥ जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात, मनातील शंकांचे निरसन होते ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावेत. (५)

जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी । प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६॥ ज्याने परमार्थाची वाट धरली आहे, जो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत. तेच त्याला आवडतात. (६)

जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक । तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७॥ ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्रास व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. (७)

जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत । तेणें क्षोभलें उठे चित्त । तया श्रोतयांचें ॥ ८॥ ज्याला अद्वैतमत रुचत असेल त्या श्रोत्यापुढे द्वैताचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त क्षोभते. (८)

आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे । नाहीं तरी कंटाळे । मानस ऐकतां ॥ ९॥ ज्याला ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळाले की श्रोत्याच्या अंतःकरणात सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करायची वेळ आली की, त्याचे मन कंयळते. (९)

ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी । तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १०॥ ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाट्ये. तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले, तर त्याला ते प्रशस्त वाटत नाही. (१०)

प्रीतीचें लक्षण ऐसें । अंतरीं उठे अनायासें । पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ॥ ११॥ पाणी उताराकडे सहज धावते, तसे ज्याचे ज्याच्यावर ‘ स्वाभाविक प्रेम असते, त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते. त्याचे मन तिकडे आपोआप धावते. (११)

तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर । तेथें पाहिजे सारासार- । विचारणा ते ॥ १२॥ त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल त्यास ज्यात सारासार विवेकासंबंधी विवेचन असते तेच ग्रंथ आवडतात. दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. (१२)

जेथें कुळदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती । इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३॥ ज्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी. तेथे इतर देवांची स्तुती असलेले ग्रंथ कामास येत , नाहीत. (१३)

घेतां अनंताच्या व्रता । तेथें नलगे भगवद्गीता । साधुजनांसि वार्ता । फळाशेचि नाहीं ॥ १४॥ जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्‌गीता सांगून काय उपयोग ? ज्यांना फलाशा नसते त्या साधूंनाच भगवद्‌गीतेचे महत्त्व कळणार (१४)

वीरकंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५॥ वीरककण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार ? वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जी वस्तू जेथे योग्य असते, तेथेच ती शोभून दिसते. (१५)

नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य झालीं । विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६॥ अनेक देव-देवतांची स्तुतिस्तोत्रे गाणारी अनेक माहाक्ये आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे तेथे त्या देवतेचे गुणवर्णन करणात ग्रंथ वंद्य ठरतो. याठलट केले तर ते अयोग्य ठरते. (१६)

मल्हारीमाहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी । काशीमाहात्म्य व्यंकटेशीं । शोभा न पावे ॥ १७॥ जसे मल्हारी माहात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका माहात्म्य काशीला नेले आणि काशी माहात्म्य व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही. (१७)

ऐसें सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड । तैसी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८॥ असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळच सांगता येईल पण जेथले तेथेच गोड असते. त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथांचे महत्त्व वाटते. (१८)

योगियांपुढे राहाण । परीक्षावंतापुढें पाषाण । पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९॥ समजा, एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्यापुढे दगड आणून ठेवला किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले, तर ते शोभून दिसत नाही. (१९)

वेदज्ञापुढें जती । निस्पृहापुढें फळश्रुति । ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राच्ची ॥ २०॥ वेदज्ञ माणसापुढे संन्यासी, निःस्मृहांपुढे सकाम ग्रंथांची फलश्रुती किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभत नाही. (२०)

ब्रह्मचर्यापुढें नाचणी । रासक्रीडा निरूपणीं । राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१॥ ब्रह्मचल्यपुढे नर्तकी, अध्यात्मग्रंथांचे निरूपण चालले असता तेथे रासक्रीडेचे वर्णन अथवा गजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसत नाही. (२१)

तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारी टीपडें । तेणें त्याचें कैसें घडे । समाधान । २२॥ तसे जो अंतर्निष्ठ आहे, त्याच्यापुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तर त्याने त्याचे समाधान कसे होईल ? (२२)

रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा । संन्याशास वोवसा । उच्छिष्टचांडाळीचा ॥ २३॥ एखाद्या रंकाला च्या वस्तूची आशा असते, त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नव्हे. तसेच अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उच्छिष्ट चांडाळीच्या मंत्राचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. (२३)

कर्मनिष्ठा वशीकरण । पंचाक्षरीया निरूपण । तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४॥ जो कर्मनिष्ठ आहे त्याच्यापुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो त्याच्यापुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. (२४)

तैसे पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान । ग्रंथ वाचितां समाधान । होणार नाहीं ॥ २५॥ त्याप्रमाणे जे परमार्थाची आवड असणारेलोक आहेत, त्यांच्यापुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही, असे ग्रंथ वाचले असता त्यांना समाधान होणार नाही. (२५)

आतां असो हें बोलणें । जयास स्वहित करणें । तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६॥ असो. आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला स्वहित साधून घ्यावयाचे असेल, त्याने नेहमी अद्वैत ग्रंथांचाच अभ्यास करावा. (२६)

आत्मज्ञानी एकचित्त । तेणें पाहणें अद्वैत । एकांत स्थळीं निवांत । समाधान ॥ २७॥ जो आत्मज्ञानाचा इच्छक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथांचे वाचन, मनन आदी करावे, म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्रास होईल. (२७)

बहुत प्रकारें पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता । परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८॥ याप्रमाणे अनेक दृष्टींनी विचार केला असता, अद्वैतासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरा नाही, असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तारून नेणारी ती जणू नावच आहे. (२८)

इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । परमार्थासी ॥ २९॥ इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत, ज्यात हास्यविनोद वगैरे आहेत, तसेच रुंगासदी नवरसांनी जे परिपूर्ण आहेत ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. (२९)

जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे । भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३०॥ च्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतःकरणात पश्चात्ताप होतो व भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते, त्याला ग्रंथ म्हणावे. (३०)

जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे । नातरी एकसरी वोळे । मन भगवंतीं ॥ ३१॥ जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो, अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते अथवा मन एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते. (३१)

जेणें होय उपरती । अवगुण अवघे पालटती । जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२॥ ज्याच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकते त्याला ग्रंथ म्हणावे. (३२)

जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे । जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३३॥ च्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्ट्य उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषयवासना नष्ट होते, तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. (३३)

जेणें ग्रंथ परत्र साधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान । जेणें होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ॥ ३४॥ ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो, त्यास ग्रंथ म्हणतात. (३४)

ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फळश्रुती । जेथें नुपजे विरक्ती भक्ति । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५॥ तसे ग्रंथ अनेक असतात, त्यात अनेक विधिविधाने सांगून ल्यतींचे वर्णनही केले असते. पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती वा भक्ती उत्पन्न होत नाही, तो ग्रंथच नव्हे. (३५)

मोक्षेंविण फळश्रुती । ते दुराशेची पोथी । ऐकतां ऐकतां पुढती । दुराशाच वाढे ॥ ३६॥ ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात, त्या पोथ्या म्हणजे दुगशेच्याच पोथ्या समजाव्यात. जसजसे त्यांचे श्रवण घडत जाते, तसतशी मनात दुशशाच वाढू लागते. (३६)

श्रवणीं लोभ उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । बैसलीं दुराशेचीं भूतें । तयां अधोगती ॥ ३७॥ च्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो तेथे सारासारविवेक कसा उत्पन्न होणार ? ते ग्रंथ ऐकून दुसशेची धुते मानगुटीवर बसतात व त्यामुळे अधोगती मात्र होते. (३७)

ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती । तयां जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८॥ फलश्रुती ऐकून या जन्मी नाहीतर पुढील जन्मी तरी हे फळ मिळेल असे जे म्हणतात, त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. (३८)

नाना फळें पक्षी खाती । तेणेंचि तयां होय तृप्ती । परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९॥ निरनिराळे पक्षी असतात, ते नाना प्रकारची फळे खातात व त्यामुळे त्यांची तृप्ती होते, पण एक चकोर पक्षी असा आहे की, तो इतर कशाची आशाच करीत नाही. त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. (३९)

तैसें संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास । परी जे भगवंताचे अंश । ते भगवंत इच्छिती ॥ ४०॥ त्याप्रमाणे संसारी माणसे संसाराचीच सोय पाहतात, तो सुखाचा कसा होईल, याचीच त्यांना उत्कंठा असते, पण जे भगवंताचे अंश म्हणजेच भक्त असतात, ते भगवंताचीच इच्छा धरतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल, हाच एक ध्यास त्यांना लागलेला असतो. (४०)

ज्ञानियास पाहिजे ज्ञन । भजकास पाहिजे भजन । साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१॥ ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. (४१)

परमार्थ्यास पाहिजे परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मनापासूनी ॥ ४२॥ ज्यास परमार्थाची आवड असते, म्हणजेच जो परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता असते, तर जो कंजूष मनुष्य असेल, त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. (४२)

योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग । रोगियास पाहिजे रोग- । हरती मात्रा ॥ ४३॥ योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असते. (४३)

कवीस पाहिजे प्रबंध । तार्किकास पाहिजे तर्कवाद । भाविकास संवाद । गोड वाटे ॥ ४४॥ जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात, तार्किक माणसास तर्कवाद करावयास हवा असतो. भाविकांना भगवतू चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. (४४)

पंडितास पाहिजे व्युत्पत्ती । विद्वानास अध्ययनप्रीती । कलावंतास आवडती । नाना कळा ॥ ४५॥ पंडित लोकांना स्तुत्यत्तीची गोडी असते, विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते, तर कलावंतांना नाना कला आवडतात. (४५)

हरिदासांस आवडे कीर्तन । शुचिर्भूतांस संध्यास्नान । कर्मनिष्ठांस विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६॥ हरिदासांना कीर्तन आवडते. धार्मिक लोकांना संध्याखान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. (४६)

प्रेमळास पाहिजे करुणा । दक्षता पाहिजे विचक्षणा । चातुर्य पाहे शहाणा । आदरेंसीं ॥ ४७॥ प्रेमळ लोकांना करुणा हवी असते, विचारवंतांना दक्षता हवी असते तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. (४७)

भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीत पाहे तालज्ञान । रागज्ञानी तानमान । मूर्च्छना पाहे ॥ ४८॥ भक्ताला मूर्तिध्यान आवडते. संगीतज्ञ असेल तो तालज्ञानाकडे लक्ष देतो, तर सगज्ञानी असेल तो तानमान, मूर्छना आदीकडे लक्ष देतो. (४८)

योगाभ्यासी पिंडज्ञान । तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञान । नाडीज्ञानी मात्राज्ञान । पाहतसे ॥ ४९॥ योगाभ्यासी पिंडज्ञानाचा विचार करतात, तत्त्वज्ञ तत्त्वज्ञानासंबंधी विचार करतात, तर नाडीज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. (४९)

कामिक पाहे कोकशास्त्र । चेटकी पाहे चेटकीमंत्र । यंत्री पाहे नाना यंत्र । आदरेंसी ॥ ५०॥ जो कामी मनुष्य असेल, तो कामशास्त्र पाहतो. जो चेटूक करणारा असेल तो चेटकमंत्राकडे लक्ष देतो, तर यंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. (५०)

टवाळासि आवडे विनोद । उन्मतास नाना छंद । तामसास प्रमाद । गोड वाटे ॥ ५१॥ टवाळखोर लोकांना विनोद आवडतो. उन्मत्त असेल तो नाना छंद करतो, तर तामस माणसाला अमर्याद मस्तीच गोड वाटते. (५१)

मूर्ख होय नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी । पापी पाहे पापबुद्धी । लावून अंगीं ॥ ५२॥ मूर्ख असेल तो नादावर लुव्य होतो, जो निंदक असतो तो लोकांचे उणे काढण्याची संधी शोधत असतो व पापी असेल तो अंगी पापबुद्धी लावून घेत असतो. (५२)

एकां पाहिजे रसाळ । एकां पाहिजे पाल्हाळ । एकां पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३॥ एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पाल्हाळ पाहिजे असतो तर कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. (५३)

आगमी पाहे आगम । शूर पाहे संग्राम । एक पाहती नाना धर्म । इच्छेसारिखे ॥ ५४॥ तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात. शूर असतात त्यांना युद्ध हवे असते तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्मांचा अभ्यास करतात. (५४)

मुक्त पाहे मुक्तलीला । सर्वज्ञ पाहे सर्वज्ञकळा । ज्योतिषी भविष्य पिंगळा । वर्णूं पाहे ॥ ५५॥ मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते. सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो, तर ज्योतिषी असेल तो पिंगळा पक्ष्याच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. (५५)

ऐसें सांगावें तें किती । आवडीसारिखें ऐकती । नाना पुस्तकें वाचिती । सर्वकाळ ॥ ५६॥ असे किती म्हणून वर्णन करावे ? ज्याला जे आवडते, ते तो श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. (५६)पुस्तक

परी परत्रसाधनेंविण । म्हणों नये तें श्रवण । जेथें नाहीं आत्मज्ञान । तया नांव करमणूक ॥ ५७॥ पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे. ती केवळ करमणूकच होय. (५७)

गोडीविण गोडपण । नाकेंविण सुलक्षण । ज्ञानेंविण निरूपण । बोलोंचि नये ॥ ५८॥ ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे ? ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणता येईल ? तसे ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यास निरूपण म्हणूच नये. (५८)

आतां असो हें बहुत । ऐकावा परमार्थ ग्रंथ । परमार्थग्रंथेंविण व्यर्थ । गाथागोवी ॥ ५९॥ आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की, परमार्थ ग्रंथाचेच श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवायचे इतर ग्रंथ निरुपयोगीच होत. (५९)

म्हणोनि नित्यानित्यविचार । जेथें बोलिला सारासार । तोचि ग्रंथ पैलपार । पाववी विवेकें ॥ ६०॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥

20px