Samas 1
समास 1 - समास पहिला : देवदर्शन
समास 1 - दशक ८
समास पहिला : देवदर्शन
॥ श्रीराम ॥
श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध ।
गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥
नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा ।
अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥
नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें अपारें ।
सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥
ऐसीं तीर्थें सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारी ।
फिरों जातां जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥ ४ ॥
नाना तपें नाना दानें । नाना योग नाना साधनें ।
हें सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५ ॥
पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा ।
तेणें देव ठाईं पाडावा । हें सर्वमत ॥ ६ ॥
पावावया भगवंतातें । नाना पंथ नाना मतें ।
तया देवाचें स्वरूप तें । कैसे आहें ॥ ७ ॥
बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गनना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठाईं पडेना ॥ ८ ॥
बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना ।
तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करूनि ॥ ९ ॥
बहु देव बहु भक्त । इच्ह्या जाले आसक्त ।
बहु ऋषी बहु मत । वेगळालें ॥ १० ॥
बहु निवडितां निवडेना । येक निश्चय घडेना ।
शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठाईं ॥ ११ ॥
बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध ।
ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥ १२ ॥
सहस्त्रामधें कोणी येक । पाहे देवाचा विवेक ।
परी त्या देवाचें कौतुक । ठाईं न पडे ॥ १३ ॥
ठाईं न पडे कैसें म्हणतां । तेथें लागली अहंता ।
देव राहिला परता । अहंतागुणें ॥ १४ ॥
आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें ।
तो देव कोण्या गुणें । ठाईं पडे ॥ १५ ॥
देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें ।
तेंचि बोलणें स्वभावें । बोलिजेल ॥ १६ ॥
जेणें केले चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार ।
सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥ १७ ॥
तेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृतकळा ।
तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥
ज्याची मर्यादा सागरा । जेणें स्थापिलें फणिवरा ।
जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयासि लक्ष जीवयोनी ।
जेणें निर्मिले लोक तिनी । तया नाव देव ॥ २० ॥
ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार ।
तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसीं ॥ २१ ॥
देव्हाराचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव ।
तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥ २२ ॥
ठाईं ठाईं देव असती । तेहिं केली नाहीं क्षिती ।
चंद्र सूर्य तारा जीमूती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥
सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव ।
ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥ २४ ॥
येथें आशंका उठिली । ते पुढिलीये समासीं फीटली ।
आतां वृत्ती सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥
पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं जें भकास ।
तये निर्मळीं वायोस । जन्म जाला ॥ २६ ॥
वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥
उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली ।
ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव ॥ २८ ॥
देवें निर्मिली हे क्षिती । तीचे पोटीं पाषाण होती ।
तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥
जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपुर्वीं होता ।
मग हे तयाची सत्ता । निर्माण जाली ॥ ३० ॥
कुल्लाळ पात्रापुर्वीं आहे । पात्रें कांहीं कुल्लाळ नव्हे ।
तैसा देव पूर्वींच आहे । पाषाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥
मृत्तिकेचें शैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले ।
कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥
तथापि होईल पंचभूतिक । निर्गुण नव्हे कांहीं येक ।
कार्याकारणाचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥
अवघी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टीहूनि पर्ता ।
तेथें संशयाची वार्ता । काढूंचि नये ॥ ३४ ॥
खांसूत्रींची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली ।
तोचि बाहुली हे बोली । घडे केवी ॥ ३५ ॥
छायामंडपीची सेना । सृष्टिसारिखीच रचना ।
सूत्रें चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६ ॥
तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव ।
जेणें केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥
जें जें जया करणें पडे । तें तें तो हें कैसें घडे ।
म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥
सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें ।
परी तो गोपुर कर्ता नव्हे । निश्चयेसीं ॥ ३९ ॥
तैसें जग निर्मिलें जेणें । तो वेगळा पूर्णपणें ।
येक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥
एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा ।
तो सर्वांमधें परी निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥
म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासी अलिप्त आत्मारामु ।
अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥४२ ॥
मायोपाधी जगडंबर । आहे सर्वहि साचार ।
ऐसा हा विपरीत विचार । कोठेंचि नाहीं ॥ ४३ ॥
म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वांपर जो परमात्मा ।
अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥
तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव ।
ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥
पदार्थवस्तु नासिवंत । हें तों अनुभवास येत ।
याकारणें भगवंत । पदार्थावेगळा ॥ ४६ ॥
देव विमळ आणी अचळ । शास्त्रें बोलती सकळ ।
तया निश्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥
देव आला देव गेला । देव उपजला देव मेला ।
ऐसें बोलतां दुरिताला । काय उणें ॥ ४८ ॥
जन्म मरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा ।
देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥
उपजणें आणी मरणें । येणें जाणें दुःख भोगणें ।
हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
अंतःकरण पंचप्राण । बहुतत्वीं पिंडज्ञान ।
यां सर्वांस आहे चळण । म्हणोनि देव नव्हेती ॥ ५१ ॥
येवं कल्पनेरहित । तया नाव भगवंत ।
देवपणाची मात । तेथें नाहीं ॥ ५२ ॥
तव शिष्यें आक्षेपिलें । तरी कैसें ब्रह्मांड केलें ।
कर्तेपण कारण पडिलें । कार्यामधें ॥ ५३ ॥
द्रष्टेपणें द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायांसीं ।
कर्तेपणे निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण ।
देव सगुण किं निर्गुण । मह निरोपावा ॥ ५५ ॥
येक म्हणती त्या ब्रह्मातें । इच्ह्यामात्रें सृष्टिकर्ते ।
सृष्टिकर्ते त्यापर्तें । कोण आहे ॥ ५६ ॥
आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठून जाली ।
ते हे आतां निरोपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥
ऐसें ऐकोनि वचन । वक्ता म्हणे सावधान ।
पुढिले समासीं निरूपण । सांगिजेल ॥ ५८ ॥
ब्रह्मीं माया कैसी जाली । पुढें असे निरोपिली ।
श्रोतीं वृत्ति सावध केली । पाहिजे आतां ॥५९ ॥
पुढें हेंचि निरूपण । विशद केलें श्रवण ।
जेणें होय समाधान । साधकांचें ॥ ६० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देवदर्शननाम समास पहिला ॥ १ ॥