Samas 2
समास 2 - समास दुसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
समास 2 - दशक ८
समास दुसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । तें पाहिजे निरोपिलें ।
निरावेवीं कैसें जालें । चराचर ॥ १ ॥
याचें ऐसें प्रतिवचन । ब्रह्म जें कां सनातन ।
तेथें माया मिथ्याभान । विवर्तरूप भावे ॥ २ ॥
आदि येक परब्रह्म । नित्यमुक्त अक्रिय परम ।
तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाली मूळमाया ॥ ३ ॥
॥ श्लोक ॥ आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् ।
तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम् ॥
आशंका ॥ येक ब्रह्मा निराकार । मुक्त अक्रिये निर्विकार ।
तेथें माया वोडंबर । कोठून आली ॥ ४ ॥
ब्रह्म अखंड निर्गुण । तेथें इच्हा धरी कोण ।
निर्गुणीं सगुणेंविण । इच्हा नाहीं ॥ ॥ ५ ॥
मुळीं असेचिना सगुण । म्हणौनि नामें निर्गुण ।
तेथें जालें सगुण । कोणेपरी ॥ ६ ॥
निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें ।
लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥
येक म्हणती निरावेव । करून अकर्ता तो देव ।
त्याची लीळा बापुडे जीव । काये जाणती ॥ ८ ॥
येक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ९ ॥
उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघा लोपिती ।
बळेंचि निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥
मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करून अकर्ता ।
कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥
जें ठाईंचें निर्गुण । तेथें कैचें कर्तेपण ।
तरी हे इच्हा धरी कोण । सृष्टिरचाव्याची ॥ १२ ॥
इच्छा परमेश्वराची । ऐसी युक्ती बहुतेकांची ।
परी त्या निर्गुणास इच्हा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥
तरी हे इतुकें कोणें केलें । किंवा आपणचि जालें ।
देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥
देवेंविण जालें सर्व । मग देवास कैंचा ठाव ।
येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥
देव म्हणे सृष्टिकर्ता । तरी येवं पाहे सगुणता ।
निर्गुणपणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥
देव ठाईंचा निर्गुण । तरी सृष्टिकर्ता कोण ।
कर्तेपणाचें सगुण । नासिवंत ॥ १७ ॥
येथें पडिले विचार । कैसें जालें सचराचर ।
माया म्हणों स्वतंतर तरी हेंहि विपरीत दिसे ॥ १८ ॥
माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली ।
ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥ १९ ॥
देव निर्गुण स्वतसिद्ध । त्यासी मायेसि काये समंध ।
ऐसें बोलतां विरुद्ध । दिसोन आलें ॥ २०
॥
सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्याचि माथां
तरी भक्तांस उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥
देवेंविण नुस्ती माया । कोण नेईल विलया ।
आम्हां भक्तां सांभाळाया । कोणीच नाहीं ॥ २२ ॥
म्हणोनि माया स्वतंतर । ऐसा न घडे कीं विचार ।
मायेस निर्मिता सर्वेश्वर । तो येकचि आहे ॥ २३ ॥
तरी तो कैसा आहे ईश्वर । मायेचा कैसा विचार ।
तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥
श्रोतां व्हावें सावधान । येकाग्र करूनियां मन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ २५ ॥
येके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अनुभव ।
तेहि बोलिजेती सर्व । येथानुक्रमें ॥ २६ ॥
येक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली ।
देवास इच्ह्या नस्ती जाली । तरी हे माया कैंची ॥ २७ ॥
येक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्हा करी कोण ।
माया मिथ्या हे आपण । जालीच नाही ॥ २८ ॥
येक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसी नाहीं म्हणतां कैसें ।
माया हे अनादि असे । शक्ती ईश्वराची ॥ २९ ॥
येक म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे ।
साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥
येक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें ।
भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥
येक म्हणती मिथ्या दिसतें । भयें अज्ञानसन्येपातें ।
साधन औषधही घेईजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥ ३२ ॥
अनंत साधनें बोलिलीं । नाना मतें भांबावलीं ।
तरी माया न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥ ३३ ॥
मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं ।
मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥ ३४ ॥
माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली ।
मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥
जयाचे अंतरीं ज्ञान । नाहीं वोळखिले सज्जन ।
तयास मिथ्याभिमान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥
जेणें जैसा निश्चये केला । तयासी तैसाचि फळला ।
पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥
येक म्हणती माया कैंची । आहे ते सर्व ब्रह्मचि ।
थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥
थिजलें आणी विघुरलें । हें स्वरूपीं नाहीं बोलिलें ।
साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती येक ॥ ३९ ॥
येक म्हणती सर्व ब्रह्म । हें न कळे जयास वर्म ।
तयाचें अंतरींचा भ्रम । गेलाच नाहीं ॥ ४० ॥
येक म्हणती येकचि देव । तेथें कैंचें आणिलें सर्व ।
सर्व ब्रह्म हें अपूर्व । आश्चिर्य वाटे ॥ ४१ ॥
येक म्हणती येकचि खरें । आनुहि नाहीं दुसरें ।
सर्व ब्रह्म येणें प्रकारें । सहजचि जालें ॥ ४२ ॥
सर्व मिथ्या येकसरें । उरलें तेंचि ब्रह्म खरें ।
ऐसीं वाक्यें शास्त्राधारें । बोलती येक ॥ ४३ ॥
आळंकार आणी सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण ।
आटाआटी वेर्थ सीण । म्हणती येक ॥ ४४ ॥
हीन उपमा येकदेसी । कैसी साहेल वस्तूसी ।
वर्णवेक्ती अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥
सुवर्णीं दृष्टी घालितां । मुळीच आहे वेक्तता ।
आळंकार सोनें पाहतां सोनेंचि असे ॥ ४६ ॥
मुळीं सोनेंचि हें वेक्त । जड येकदेसी पीत ।
पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवीं घडे ॥ ४७ ॥
दृष्टांत तितुका येकदेसी । देणें घडे कळायासी ।
सिंधु आणी लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥
उत्तम मधेम कनिष्ठ । येका दृष्टांतें कळे पष्ट ।
येका दृष्टांतें नष्ट । संदेह वाढे ॥ ४९ ॥
कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चळाची सरी ।
साचा ऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥
वोडंबरी हे कल्पना । नाना भास दाखवी जना ।
येरवी हे जाणा । ब्रह्मचि असे ॥ ५१ ॥
ऐसा वाद येकमेकां । लागतां राहिली आशंका ।
तेचि आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥ ५२ ॥
माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रह्मीं कैसी जाली ।
म्हणावी ते निर्गुणें केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥
मिथ्या शब्दीं कांहींच नाहीं । तेथें केलें कोणें काई ।
करणें निर्गुणाचा ठाईं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥
कर्ता ठांईचा अरूप । केलें तेंहि मिथ्यारूप ।
तथापी फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मआशंकानिरूपण समास दुसरा ॥ २ ॥