Samas 3
समास 3 - समास तिसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
समास 3 - दशक ८
समास तिसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण॥ श्रीराम ॥
अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई ।
तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥
दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग ।
मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥
कल्पेनिकरितां स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे ।
जळाकरितां गार वसे । निमिष्य येक ॥ ३ ॥
मातीकरितां भिंती जाली । सिन्धुकरितां लहरी आली ।
तिळाकरितां पुतळी । दिसों लागे ॥ ४ ॥
सोन्याकरितां अळंकार । तंतुकरितां जालें चीर ।
कासवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥
तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जालें ।
बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥
पृथ्वीकरितां जालें झाड । झाडाकरितां च्ह्याया वाड ।
धातुकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ॥ ७ ॥
आतां असो हा दृष्टांत । अद्वैतास कैंचें द्वैत ।
द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥
भासाकरितां भास भासे । दृश्याकरितां अदृश्य दिसे ।
अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरोपम ॥ ९ ॥
कल्पेनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत ।
द्वैतावेगळें द्वैत । कैसें जालें ॥ १० ॥
विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी ।
तेणें केली उभवणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥
परमात्मा परमेश्वरु । सर्वकर्ता जो ईश्वरू ।
तयापासूनि विस्तारु । सकळ जाला ॥ १२ ॥
ऐसीं अनंत नामें धरी । अनंत शक्ती निर्माण करी ।
तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥
त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाचि आपण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥
॥ श्लोक ॥ कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ॥
हे उघड बोलतां न ये । मोडों पाहातो उपाये ।
येरवीं हें पाहतां काय । साच आहे ॥ १५ ॥
देवापासून सकळ जालें । हें सर्वांस मानलें ।
परी त्या देवास वोळखिलें । पाहिजे कीं ॥ १६ ॥
सिद्धांचे जें निरूपण । जें साधकांस न मने जाण ।
पक्व नाहीं अंतःकर्ण । म्हणोनियां ॥ १७ ॥
अविद्यागुणें बोलिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव ।
मूळमाया गुणें देव । बोलिजेतो ॥ १८ ॥
म्हणौनि कारण मूळमाया । अनंत शक्ती धरावया ।
तेथीचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥
मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश ।
अनंतनामी जगदीश । तयासीचि बोलिजे ॥ २० ॥
अवघी माया विस्तारली । परी हे निशेष नाथिली ।
ऐसिया वचनाची खोली । विरुळा जाणे ॥ २१ ॥
ऐसें अनुर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे ।
संतसंगेविण नुमजे । कांही केल्यां ॥ २२ ॥
माया तोचि मूळपुरुष । साधकां न मने हें निशेष ।
परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥
नामरूप माये लागलें । तरी हें बोलणें नीटचि जालें ।
येथें श्रोतीं अनुमानिलें । कासयासी ॥ २४ ॥
आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली ।
निराकारीं कैसी जाली । मूळमाया ॥ २५ ॥
दृष्टीबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा जाला खेळ ।
हेंचि आतां अवघें निवळ । करून दाऊं ॥
२६ ॥
आकाश असतां निश्चळ । मधें वायो जाला चंचळ ।
तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥
रूप वायोचें जालें । तेणें आकाश भंगलें ।
ऐसें हें सत्य मानलें । नवचे किं कदा ॥ २८ ॥
तैसी मूळमाया जाली । आणी निर्गुणता संचली ।
येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥
वायु नव्हता पुरातन । तैसी मूळमाया जाण ।
साच म्हणतां पुन्हा लीन । होतसे ॥ ३० ॥
वायो रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहें ।
भासे परी तें न लाहे । रूप तयेचें ॥ ३१ ॥
वायो सत्य म्हणो जातां । परी तो न ये दाखवितां ।
तयाकडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥
तैसी मूळमाया भासे । भासी परी ते न दिसे ।
पुढें विस्तारली असे । माया अविद्या ॥ ३३ ॥
जैसें वायोचेनि योगें । दृश्य उडे गगनमार्गें ।
मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४ ॥
गगनीं आभाळ नाथिलें । अकस्मात उद्भवलें ।
मायेचेनि गुणें जालें । तैसें जग ॥ ३५ ॥
नाथिलेंचि गगन नव्हतें । अकस्मात आलें तेथें ।
तैसें दृश्य जालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥
परी त्या आभाळाकरितां । गगनाची गेली निश्चळता ।
वाटे परी ते तत्वता । तैसीच आहे ॥ ३७ ॥
तैसें मायेकरितां निर्गुण । वाटे जालें सगुण ।
परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८ ॥
आभाळ आले आणि गेलें । तरी गगन तें संचलें ।
तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥
नभ माथा लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे ।
तैसें जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥
ऊर्ध पाहातां आकाश । निळिमा दिसे सावकास ।
परि तो जाणिजे मिथ्याभास । भासलासे ॥ ४१ ॥
आकाश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें ।
वाटे विश्वास कोंडिले । परी तें मोकळेचि असे ॥ ४२ ॥
पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला नसे ।
अलिप्त जाणावे तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥
रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ ।
तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४ ॥
आभाळाकरितां मयंक । वाटे धावतो निशंक ।
परी तें अवघें माईक । आभाळ चळे ॥ ४५ ॥
झळे अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंत्राळ ।
वाटे परी तें निश्चळ । जैसें तैसें ॥ ४६ ॥
तैसें स्वरूप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें ।
ऐसें कल्पनेसि गमलें । परी ते मिथ्या ॥ ४७ ॥
दृष्टिबंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ ।
वस्तु शाश्वत निश्चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥
ऐसी वस्तु निरावेव । माया दाखवी अवेव ।
ईचा ऐसा स्वभाव । नाथिलीच हे ॥ ४९ ॥
माया पाहातां मुळीं नसे । परी हे साचा ऐसी भासे ।
उद्भवे आणि निरसे । आभाळ जैसें ॥ ५० ॥
ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली ।
अहं ऐसी स्फुर्ति जाली । तेचि माया ॥ ५१ ॥
गुणमायेचे पवाडे । निर्गुणीं हें कांहींच न घडे ।
परी हें घडे आणी मोडे । सस्वरूपीं ॥ ५२ ॥
जैसी दृष्टी तरळली । तेणें सेनाच भासली ।
पाहातां आकाशींच जाली । परी ते मिथ्या ॥ ५३ ॥
मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ ।
नानातत्वांचा पाल्हाळ । सांडूनियां ॥ ५४ ॥
तत्वें मुळींच आहेती । वोंकार वायोची गती ।
तेथीचा अर्थ जाणती । दक्ष ज्ञानी ॥ ५५ ॥
मूळमायेचे चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
सूक्ष्म तत्वें तेंचि जाण । जडत्वा पावलीं ॥ ५६ ॥
ऐसीं पंचमाहांभूतें । पूर्वीं होती अवेक्तें ।
पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥
मूळमायेचें लक्षण । तेंचि पंचभूतिक जाण ।
त्याची पाहें वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५८ ॥
आकाश वायोविण । इच्ह्याशब्द करी कोण ।
इच्हाशक्ती तेचि जाण । तेजस्वरूप ॥ ५९ ॥
मृदपण तेचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ ।
ऐसी मूळमाया सकळ । पंचभूतिक जाणावी ॥ ६० ॥
येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी ।
सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पाहातां ॥ ६१ ॥
पुढें जडत्वास आलीं । तरी असतीं कालवलीं ।
ऐसी माया विस्तारली । पंचभूतिक ॥ ६२ ॥
मूळमाया पाहातां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं ।
स्वर्ग्य मृत्य पाताळीं । पांचचि भूतें ॥ ६३ ॥
॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित्सचराचरं ।
सर्वपंचभूतकं राम षष्ठें किंचिन्न दृश्यते ॥
सत्य स्वरूप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती ।
पंचभूतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥
येथें उठिली आशंका । सावध होऊन ऐका ।
पंचभूतें जालीं येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥
मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचि होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली असे ॥ ६६ ॥
ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । संशयास उभें केलें ।
याचें उत्तर दिधलें । पुढिले समासीं ॥ ६७ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मआशंकानाम समास तिसरा ॥ ३ ॥