उपासना

Samas 4

समास 4 - समास चौथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरूपण

समास 4 - दशक ८

समास चौथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरूपण

॥ श्रीराम ॥

मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ ।

वृत्ति करावी निवळ । निमिष्य येक ॥ १ ॥

ब्रह्मीं मूळमाया जाली । तिच्या पोटा माया आली ।

मग ते गुणा प्रसवली । म्हणौनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥

पुढें तिजपासाव कोण । सत्वरजतमोगुण ।

तमोगुणापासून निर्माण । जाली पंचभूतें ॥ ३ ॥

ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्वें विस्तारलीं ।

एवं तमोगुणापासून जालीं । पंचमाहांभूतें ॥ ४ ॥

मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं ।

ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली मागां ॥ ५ ॥

आणिक येक येके भूतीं । पंचभूतें असती ।

ते हि आतां कैसी स्थिती । प्रांजळ करूं ॥ ६ ॥

सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पंचभूतिक ।

श्रोतीं विमळ विवेक । केला पाहिजे ॥ ७ ॥

आधीं भूतें तीं जाणावीं । रूपें कैसीं वोळखावी ।

मग तें शोधून पाहावीं । सूक्ष्मदृष्टीं ॥ ८ ॥

वोळखी नाही अंतरी । ते वोळखावी कोणेपरी । म्हणोनि भूतांची वोळखी चतुरीं । नावेक परिसावी ॥ ९ ॥

जें जें जड आणी कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण । मृद आणी वोलेपण । तितुकें आप ॥ १० ॥

जें जें उष्ण आणी सतेज । तें तें जाणावें पैं तेज । आतां वायोहि सहज । निरोपिजेल ॥ ११ ॥

चैतन्य आणी चंचळ । तो हा वायोचि केवळ । सून्य आकाश निश्चळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥

ऐसीं पंचमाहांभूतें । वोळखी धरावी संकेतें । आतां येकीं पांच भूतें । सावध ऐका ॥ १३ ॥

जें त्रिगुणाहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार । यालागीं अति तत्पर । होऊन ऐका ॥ १४ ॥

सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी । तेचि आधीं निरोपावी । येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥

आकाश म्हणजे अवकाश सून्य । सून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे जडत्व जाण । तेचि पृथ्वी ॥ १६ ॥

आकाश स्वयें आहे मृद । तेंचि आप स्वतसिद्ध । आतां तेज तेंहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥

अज्ञानें भासला भास । तोचि तेजाचा प्रकाश । आतां वायो सावकाश । साकल्य सांगों ॥ १८ ॥ अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो, ते तेजतत्त्व होय. तेथे आता वायुतत्त्व कसे आहे, ते नीट सांगतो. (१८)

वायु आकाश नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध । तथापी आकाशीं जो निरोध । तोचि वायो ॥ १९ ॥ वायू आणि आकाश यांत भेद नाही. आकाशाइतकाच तो स्तब्ध असतो. तथापि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबंध असतो, तो वायू जाणावा. (१९)

आकाशीं आकाश मिसळलें । हें तों नलगे किं बोलिलें । येणें प्रकारें निरोपिलें । आकाश् पंचभूत ॥ २० ॥ आकाशात आकाशतत्त्व मिसळलेलेच आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. या प्रकारे आकाश या महाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत, हे स्पष्ट करून सांगितले आहे. (२०)

वायोमध्यें पंचभूतें । तेंहि ऐका येकचित्तें । बोलिजेती ते समस्तें । येथान्वयें ॥ २१ ॥ आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहेत तेही ऐकावे ती अनुक्रमाने सांगितली जातील, ती एकचित्ताने ऐका. (२१)

हळु फूल तरी जड । हळु वारा तरी निबिड । वायो लागतां कडाड । मोडती झाडें ॥ २२ ॥ फूल हलके असले, तरी त्याला थोडेतरी वजन असते. वास हख्यारवाहात असला तरी वायु-तत्त्व घनदाटच असते. वल्यानेकडाडूअसा आवाज होऊन झाडे मोडून पडतात. (२२)

तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कहिंच न घडे । तोल तोचि तये जडे । पृथ्वीचा अंश ॥ २३ ॥ वजनाशिवाय झाड मोडले, असे कधीच घडत नाही. म्हणजे वायूला वजन आहे. वजन तोल हाच वायूच्या ठिकाणी असलेला पृथ्वी तत्त्वाचा अंश होय. (२३)

येथें श्रोते आशंका घेती । तेथें कैचीं झाडें होतीं । झाडें नव्हतीं तरी शक्ती । कठिणरूप आहे ॥ २४ ॥ येथे श्रोत्यांनी शंका घेतली की येथे सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन चालले असता तेथे झाडे कोठून आली ? (ती तर दृश्य वृष्टी व्यक्त झाल्यावर उत्पन्न झाली.) यावर वक्ता म्हणतो झाडे नव्हती तरी वायूच्या ठिकाणी शक्ती तर होतीच ना ? म्हणून वायूची शक्ती हेच त्यातील कठीणपण आहे आणि कठीणपणा हे पृथ्वीतत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे तेथे पृथ्वीचा अंश आहेच. (२४)

वन्हीस्फुलींग लाहान । कांहीं तर्ह्ही असे उष्ण । तैसें सुक्ष्मीं जडपण । सूक्ष्मरूपें ॥ २५ ॥ अग्नीची अगदी लहान ठिणगी लिंगा) असली तरी तेथे अगदी किंचित का होईना उष्णता असतेच. तसे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्मरूपाने जडपणा असतो. (२५)

मृदपण तेंचि आप । भास तेजाचें स्वरूप । वायो तेथें चंचळरूप । सहजचि आहे ॥ २६ ॥ वायूमध्ये जो हळुवारपणा असतो ते आपतत्त्व होय आणि त्यातील प्रकाश हा तेजाचा गुण आहे. शिवाय जेथे वायू तेथे चंचलपणा सहजच असतो. (२६)

सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे अवकाश । पंचभूतांचे अंश । वायोमधें निरोपिले ॥ २७ ॥ सकल भूतांमध्ये आकाश हे अवकाशरूपाने सहजच असते. याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूतांचे अंश कसे आहेत ते स्पष्ट केले. (२७)

आतां तेजाचें लक्षण । भासलेंपण तें कठीण । तेजीं ऐसी वोळखण । पृथ्वीयेची ॥ २८ ॥ आता तेजामध्ये ते कसे आहेत ते सांगतात. प्रकाश हे तेजाचे जे लक्षण आहे, त्यांत जडत्व आहेच तेच मृथ्यी-तत्त्व होय. (२८)

भासला भास वाटे मृद । तेजीं आप तेचि प्रसिद्ध । तेजीं तेज स्वतसिद्ध । सांगणेंचि नलगे ॥ २९ ॥ जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो. ते आपतत्त्व तेजाच्या ठिकाणचे समजावे, तेजांत तेज असते, हे तर प्रसिद्धच आहे. ते सांगण्याची आवश्यकता नाही. (२९)

तेजीं वायो तो चंचळ । तेजीं आकाश निश्चळ । तेजीं पंचभूतें सकळ । निरोपिलीं ॥ ३० ॥ तेजातील चंचलपणा हे वायुतत्त्व आहे तर निश्चलपणा हे आकाशतत्त्व आहे. याप्रमाणे तेजात पंचमहाभूते कशी आहेत, हे स्पष्ट केले आहे. (३०)

आतां आपाचें लक्षण । आप तेंचि जें मृदपण । मृदपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥ आपीं आप सहजचि असे । तेज मृदपणें भासे । वायो स्तब्धपणें दिसे । मृदत्वाआंगी ॥ ३२ ॥ आकाश न लगे सांगावें । तें व्यापकचि स्वभावें । आपीं पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरोपिलीं ॥ ३३ ॥ आप म्हणजे पाणी. आपतत्त्व तेच मृदुपण होय. हलके पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो. जड पाण्यातील जडत्व हेच पृथ्वीतत्त्व आहे. आपांत आपतत्त्व सहजच असते. तेज हे मृदुपणाने भासते. वायू हा मृदुत्याच्या अंगी स्तब्धपणे दिसतो आणि आकाश-तत्त्व त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही. याप्रमाणे आपाच्या ठिकाणी महाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले. (३१ – ३३)

आतां पृथ्वीचें लक्षण । कठीण पृथ्वी आपण । कठिणत्वीं मृदपण । तेंचि आप ॥ ३४ ॥ कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश । कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायो ॥ ३५ ॥ आता मृथ्वीतत्त्वात ती कशी आहेत ते पाहू कठीणपणा हा तर मृथ्यीतत्त्वाचा गुण आहे. त्या कठीणपणात मृदुता हे आप-तत्त्व होय. कठीणपणाचा जो भास, तो तेजाचा प्रकाश म्हणजे गुण होय. कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबंध तो वायू होय. (३४- ३५)

आकश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक । आकाशींच कांहीं येक । भास भासे ॥ ३६ ॥ आकाशतत्त्व तर सगळ्यांत व्यापून आहे, हा विचार तर प्रगटच आहे. आकाशाच्या ठिकाणी कुठलाही भास भासत असतो. (३६)

आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना । आकाश परतें होयेना । तिळमात्र ॥ ३७ ॥ आकाशाला तोडावे म्हटले तर तुटत नाही, फोडावे म्हटले तर ते फुटत नाही. त्याला बाजूला सासवे म्हटले तर ते तिळमात्र सरकत नाही. (३७)

असो आतां पृथ्वीअंत । दाविला भूतांचा संकेत । येक भूतीं पंचभूत । तेंहि निरोपिलें ॥ ३८ ॥ असो. याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचे संकेताने वर्णन केले. तसेच एकेका भूतात पंचमहाभूते कशी आहेत, याचेही निरूपण केले. (३८)

परी हें आहाच पाहातां नातुडे । बळेंचि पोटीं संदेह पडे । भ्रांतिरूपें अहंता चढे । अकस्मात ॥ ३९ ॥ पण वरवर पाहिले असता हे कळत नाही आणि त्यामुळे बळेच मनात संशय उत्पन्न होतो आणि त्यामुळे भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढतो. (३९)

सूक्ष्मदृष्टीनें पाहातां । वायोचि वाटे तत्वता । सूक्ष्म वायो शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥ सूक्ष्म दृष्टीने विचार केला की सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे असे वाटते. पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागले की, पंचमहाभूते दिसून येतात. (४०)

एवं पंचभूतिक पवन । तेचि मूळमाया जाण । माया आणी सूक्ष्म त्रिगुण । तेहि पंचभूतिक ॥ ४१ ॥ थोडक्यात पंचमहाभूतांसह वायू म्हणजेच मूळमाया होय. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेहीपंचभौतिकच आहेत. (४१)

भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे । पंचभूतिक जाणिजे । अष्टधा प्रकृति ॥ ४२ ॥ पंचमहाभूतांत त्रिगुण मिळविले म्हणजे त्यांना अष्टधा म्हणतात. म्हणून अष्टधा प्रकृती ही पांचभौतिकच आहे. (४२)

शोधून पाहिल्यावीण । संदेह धरणें मूर्खपण । याची पाहावी वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥ कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे हा मूर्खपणा आहे. सूक्ष्म दृष्टीने विचार करून सर्वांची माहिती करून घ्यावी. (४३)

गुणापासूनि भूतें । पावलीं पष्ट दशेतें । जडत्वा येऊन समस्तें । तत्वें जालीं ॥ ४४ ॥ मूळमायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात. जडत्वास येऊन समस्त तत्त्वें प्रगट होतात. (४४)

पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्वरचना । बोलिली असे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥ यानंतर जी तत्त्वविवंचना, पिंड ब्रह्मांडातील तत्त्वरचना वगैरे सांगितली जाते, ती लोकांना माहीतच आहे. (४५)

हा भूतकर्दम बोलिला । सूक्ष्म संकेतें दाविला । ब्रह्मगोळ उभारला । तत्पूर्वीं ॥ ४६ ॥ याप्रमाणे पंचमहाभूतांचे मिश्रण कसे झाले हे बुद्धिगम्य तर्काने दाखविले आहे. हे सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचे आहे. (४६)

या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी । जैं जाली नव्हती सृष्टी । मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥ या सर्व गोष्टी, ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वी जेव्हा दृश्य वृष्टी झाली नव्हती, तेव्हाच्या आहेत. सूक्ष्म दृष्टीने विचार करून मूळ्यायेचे स्वरूप जाणून घ्यावे. (४७)

सप्तकंचुक प्रचंड । जालें नव्हतें ब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड । ऐलिकडे ॥ ४८ ॥ पंचमहाभूते, अहंकार आणि महत्- तत्त्व ही ब्रह्मांडाची आवरणे आहेत असे मानतात. या स आवरणांसह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना, तसेच माया व अविद्या माया यांचे कार्य या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. (४८)

ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलिकडिल विचार । पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलिकडे ॥ ४९ ॥ ब्रह्मा, विष्णू महेश्वरतसेच पृथ्वी, मेरुपर्वत, सागर यांची रचना वगैरे सर्व अलीकडील गोष्टी आहेत. (४९)

नाना लोक नाना स्थानें । चन्द्र सूर्य तारांगणें । सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥ ५० ॥ अनेक लोक, अनेक स्थाने, चंद्र, सूर्य, तारांगणे, सात द्वीपे, चौदा भुवने या सर्वांची उत्पत्ती अलीकडील आहे. (५०)

शेष कूर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गें अष्ट दिग्पाळ । तेतिस कोटि देव सकळ । ऐलिकडे ॥ ५१ ॥ शेष, कूर्म, स पाताळ एकवीस स्वर्ग, अष्टदिग्पाल तेहतीस कोटी देव हे सर्व अलीकडील आहे. (५१)

बारा आदित्य । अक्रा रुद्र । नव नाग सप्त ऋषेश्वर । नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥ ५२ ॥ बास आदित्य, अकरा रुद्र, नवनाग, ससर्षी, नाना देवांचे अवतार या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. (५२)

मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पति । आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥ ५३ ॥ मेघ, मनू चक्रवर्ती राजे, व इतर नाना जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगावा ? म्हणून आता हे सांगणे पुरे (५३)

सकळ विस्ताराचें मूळ । ते मूळ मायाच केवळ । मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४ ॥ या सर्व विस्ताराचे मूळ केवळ मूळमायाच आहे. ती मूळमाया पंचभौतिक कशी आहे, याचे सविस्तर वर्णन मागे केले आहे. (५४)

सूक्ष्मभूतें जे बोलिलीं । तेचि पुढें जडत्वा आलीं । ते सकळहि बोलिलीं । पुढिले समासीं ॥ ५५ ॥ प्रथम ज्या सूक्ष्म पंच भूतांचे वर्णन केले आहे, तीच पुढे जडत्वास कशी आली, ते सर्व वर्णन पुढील समासात सांगितले जाईल. (५५)

पंचभूतें पृथकाकारें । पुढें निरोपिलीं विस्तारें । वोळखीकारणें अत्यादरें । श्रोतीं श्रवण करावीं ॥ ५६ ॥ पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचे स्वतंत्र, सविस्तर वर्णन पुढे केले आहे. त्याची ओळख पटवी, म्हणून श्रोत्यांनी अत्यंत आदराने ते श्रवण करावे. (५६)

पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणें कळे हा प्रांजळ । दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७ ॥ हा ब्रह्मांडगोल पंचभौतिक कसा आहे हे स्पष्टपणे कळले म्हणजे दृश्य वृष्टीची आसक्ती सुटून आत्मवस्तूची प्राप्ती होईल. (५७)

माहाद्वार वोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें । तैसें दृश्य हे। सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥ प्रथम महाद्वार ओलांडावे तेव्हा देवदर्शन होते. त्याप्रमाणे ह्या दृश्य वृष्टीचे रूप जाणून घेऊन तिचा त्याग करावा. (५८)

म्हणोनि दृश्याचा पोटीं । आहे पंचभूतांची दाटी । येकपणें पडिली मिठी । दृश्य पंचभूतां ॥ ५९ ॥ या दृश्य वृष्टीच्या पोटी पंचमहाभूतांचीच गर्दी झालेली आहे. दृश्य आणि पंचमहाभूते यांची एकपणे मिठी पडली आहे म्हणजे दोन्ही एकरूपच आहेत. सर्व दृश्य हे पंचभौतिकच आहे. (५९)

एवं पंचभूतांचेंचि दृश्य । सृष्टी रचली सावकास । श्रोतीं करून अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥ थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतांपासून यथावकाश सर्व दृश्य वृष्टीची रचना झाली आहे. श्रोत्यांनी सावकाशपणे श्रवण करावे. (६०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मपंचभूतेंनिरूपणनाम समास चवथा ॥ ४ ॥

20px