Samas 5
समास 5 - समास पाचवा : स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम
समास 5 - दशक ८
समास पाचवा : स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम ॥ श्रीराम ॥
केवळ मूर्ख तें नेणे । म्हणौन घडलें सांगणे । पंचभूतांचीं लक्षणें । विशद करूनि ॥ १ ॥ मूर्ख असतात ते पंचमहाभूतांची लक्षणे जाणत नाहीत म्हणून स्पष्ट करून सांगणे भाग पडले. (१)
पंचभूतांचा कर्दम जाला । आतां न वचे वेगळा केला । परंतु कांहीं येक वेगळाला । करून दाऊं ॥ २ ॥ पंचमहाभूतांचे मिश्रण झालेले आहे. आता त्यांना वेगळे करता येत नाही. परंतु काही एक वेगळे करून दाखवू (२)
पर्वत पाषाण शिळा शिखरें । नाना वर्णें लहान थोरें । खडे गुंडे बहुत प्रकारें । जाणिजे पृथ्वी ॥ ३ ॥ पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नाना रंगांचे लहान मोठे खडे गुंडे इत्यादी ही पृथ्वी जाणावी. (३)
नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां । वाळुकें वाळु अनेका । मिळोन पृथ्वी ॥ ४ ॥ नाना रंगांची माती, नाना ठिकाणची वाळवंटे अनेक प्रकारची वाळू सर्व मिळून पृथ्वीच आहे. (४)
पुरें पट्टणें मनोहरें । नाना मंदिरें दामोदरें । नाना देवाळयें शिखरें । मिळोन पृथ्वी ॥ ५ ॥ नाना नगरे, मनोहर पणे, नाना मंदिरे व रब्रखचित मंदिरे म्हणजे दामोदरे, नाना देवालये व त्यांची शिखरे सर्व मिळून पृथ्वीच आहे. (५)
सप्त द्वीपावती पृथ्वी । काये म्हणोनि सांगावी । नव खंडे मिळोन जाणावी । वसुंधरा ॥ ६ ॥ सक्षद्वीपे असलेली नऊ खडे मिळून सर्व वसुंधरा म्हणजे ही पृथ्वीच आहे. (६)
नाना देव नाना नृपती । नाना भाषा नाना रिती । लक्ष चौयासी उत्पत्ती । मिळोन पृथ्वी ॥ ७ ॥ नाना देव, नाना राजे, नाना भाषा, नाना रीती, चौऱ्यांशी लक्ष योनी सर्व मिळून पृथ्वीच आहे. (७)
नाना उद्वसें जें वनें । नाना तरुवरांचीं बनें । गिरीकंदरें नाना स्थानें । मिळोन पृथ्वी ॥ ८ ॥ उद्द्धस्त झालेली अनेक वने, तसेच व्यवस्थितपणे लावलेल्या अनेक बागा, गिरिकंदरे इत्यादी नाना स्थाने मिळून पृथ्वीच आहे. (८)
नाना रचना केली देवीं । जे जे निर्मिली मानवी । सकळ मिळोन पृथ्वी । जाणिजें श्रोतीं ॥ ९ ॥ देवांनी केलेली सर्व बहुविध रचना व मानवाने जी विविध निर्मिती केली आहे ती सर्व पृथ्वीच आहे. (९)
नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्नें जे अनेक । नाना काष्ठवृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥ सुवर्णादी अनेक धातू अनेक प्रकारची रखे व अनेक काष्ठ- वृक्षादी सर्व मिळून पृथ्वीच आहे. (१०)
आतां असो हें बहुवस । जडांश आणी कठिणांश । सकळ पृथ्वी हा विश्वास । मानिला पाहिजे ॥ ११ ॥ आता हे किती म्हणून सांगावे ? ज्या ज्या वस्तूमध्ये जडांश आणि कठिणांश आहे ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. (११)
बोलिलें पृथ्वीचे रूप । आतां सांगिजेल आप । श्रोतीं वोळखावें रूप । सावध होऊनी ॥ १२ ॥ प्रथम पृथ्वीचे रूपाबद्दल सांगितले. आता आपाचे रूपाबद्दल सांगतो, ते श्रोत्यांनी सावध होऊन जाणून घ्यावे व ओळखावे. (१२)
वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जें नीर । मेघ आणी सप्त सागर । मिळोन आप ॥ १३ ॥ विहिरी, आड सरोवरे, अनेक नद्यांचे पाणी, मेघ आणि सागर हे सर्व मिळून आप होय. (१३)
॥ श्लोकार्ध – क्षारक्षीरसुरासर्पिर्दधि इक्षुर्जलं तथा ॥ अर्थ-खारट पाणी, दूध, मध, तूप, दही, उसाचा रस व गोड पाणी असे सात समुद्र आहेत.
क्षारसमुद्र दिसताहे । सकळ जन दृष्टीस पाहे । जेथें लवण होताहे । तोचि क्षारसिंधु ॥ १४ ॥ खास समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे. ज्यातून मीठ निर्माण होते तो क्षारसिंधू होय. (१४)
येक दुधाचा सागर । त्या नाव क्षीरसागर । देवें दिधला निरंतर । उपमन्यासी ॥ १५ ॥ एक दुधाचा सागर आहे. त्याचे नाव क्षीरसागर आहे. तो देवाने उपमजूला निरंतर देऊन टाकला आहे. (१५)
येक समुद्र मद्याचा । येक जाणावा घृताचा । येक निखळ दह्याचा । समुद्र असे ॥ १६ ॥ एक मद्याचा समुद्र आहे. एक तुपाचा समुद्र आहे. तर केवळ दह्याचा एक समुद्र आहे. (१६)
येक उसाच्या रसाचा । येक तो शुद्ध जळाचा । ऐसा सातां समुद्राचा । वेढा पृथ्वीयेसी ॥ १७ ॥ एक उसाच्या रसाचा समुद्र आहे तर एक केवळ शुद्ध पाण्याचा आहे. अशा सात समुद्रांचा पृथ्वीला वेढा आहे. (१७)
एवं भूमंडळीचें जळ । नाना स्थळींचें सकळ । मिळोन अवघें केवळ । आप जाणावें ॥ १८ ॥ याप्रमाणे सर्व भूमंडळातील जळ एवढेच नव्हे तर इतर अनेकठिकाणांचे सर्व जल ते सर्व मिळून आप जाणावे. (१८)
पृथ्वीगर्भीं कितीयेक । पृथ्वीतळीं आवर्णोदक । तिहीं लोकींचें उदक । मिळोन आप ॥ १९ ॥ पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील सर्व जलांश एवढेच नव्हे, तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून आप जाणावे. (१९)
नाना वल्ली बहुवस । नाना तरुवरांचे रस । मधु पारा अमृत विष । मिळोन आप ॥ २० ॥ नाना प्रकारच्या वेली, नाना तरुवरांचे रस, मध, पारा, अमृत, विष सर्व मिळून आपच आहे. (२०)
नाना रस स्नेहादिक । याहि वेगळे अनेक । जगावेगळे अवश्यक । आप बोलिजे ॥ २१ ॥ नाना रस, तेलादी, याखेरीज अनेक वेगळे रस, जल व त्याशिवायही जे मृदु शीतल, ओले आहे ते ते सर्व आप समजावे. (२१)
सारद्र आणी सीतळ । जळासारिखें पातळ । शुक्लीत शोणीत मूत्र लाळ । आप बोलिजे ॥ २२ ॥ ओले आणि शीतल, तसेच जळासारखे पातळ असे जे रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी तेही आपच समजावे. (२२)
आप संकेतें जाणावें । पातळ बोलें वोळखावें । मृद सीतळ स्वभावें । आप बोलिजे ॥ २३ ॥ जे जे पातळ, ओले, मृदू आणि शीतल स्वभावाचे असेल, ते आपण संकेताने आप म्हणून ओळखावे. (२३)
जाला आपाचा संकेत । पातळ मृद गुळगुळित । स्वेद श्लेष्मा अश्रु समस्त । आप जाणावें ॥ २४ ॥ पातळ, मृदू आणि गुळगुळीत ही जलाची खूण आहे. म्हणून घाम, कफ, पडसे व असू आदी सर्व आप समजावे. (२४)
तेज ऐका सावधपणें । चंद्र सूर्य तारांगणें । दिव्य देह सतेजपणें । तेज बोलिजे ॥ २५ ॥ आता तेजाविषयी सावधपणे ऐका. चंद्र, सूर्य, तारांगणे, तसेच तेजोमय दिव्यदेह हे तेज जाणावे. (२५)
वन्ही मेघीं विद्युल्यता । वन्ही सृष्टी संव्हारिता । वन्ही सागरा जाळिता । वडवानळु ॥ २६ ॥ अग्नी, मेघात जी विद्युल्लता चमकते ते तेजतत्त्व होय. तसेच सर्व वृष्टीचा संहार करणारा प्रलयाग्नी आणि सागराला जाळणास वडवानल, (२६)
वन्ही शंकराचे नेत्रींचा । वन्ही काळाचे क्षुधेचा । वन्ही परीघ भूगोळाचा । तेज बोलिजे ॥ २७ ॥ तसेच शंकराच्या नेत्रांतील अग्नी, सर्वांना भक्षण करणारा जो काळ त्याची भूक असणारा अग्नी आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील अग्नी हे सर्व तेजतत्त्व होय. (२७)
जें जें प्रकाश रूप । तें तें तेजाचें स्वरूप । शोषक उष्णादि आरोप । तेज जाणावे ॥ २८ ॥ जे जे प्रकाशरूप असेल, ते ते तेजाचेच स्वरूप होय. तसेच शोषकता, उष्णता यांचे आरोपही तेज- तत्त्वामुळेच होतात. (२८)
वायो जाणावा चंचळ । चैतन्य चेतवी केवळ । बोलणें चालणें सकळ । वायुमुळें ॥ २९ ॥ आता वायूसंबंधी ऐका. वायू हा चंचल समजावा. चैतन्य वायूमुळे जाणवते. सर्व शरीराच्या हालचाली, बोलणे, चालणे इत्यादी वायूमुळे होतात. (२९)
हाले डोले तितुका पवन । कांहीं न चले पवनेंविण । सृष्टी चाळाया कारण । मूळ तो वायो ॥ ३० ॥ हलणे, डोलणे वगैरे क्रिया वायूमुळेच होतात. वायूशिवाय चलनवलन काही होऊच शकत नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी, क्रिया यांना मूळ वायूच कारणीभूत आहे. (३०)
चळण वळण आणी प्रासारण । निरोध आणी अकोचन । सकळ जाणावा पवन , चंचळरूपी ॥ ३१ ॥ चलनवलन, प्रसरण आणि आकुंचन व निरोध यामागे चंचल असे वायुतत्त्वच असते हे जाणून घ्यावे. (३१)
प्राण अपान आणी व्यान । चौथा उदान आणी समान । नाग कुर्म कर्कश जाण । देवदत्त धनंजये ॥ ३२ ॥ आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण व नाग, कूर्म, कृकल देवदत्त व धनंजय हे पाच उपप्राण हे वायुतत्त्व होय. (३२)
जितुकें कांहीं होतें चळण । तितुकें वायोचें लक्षण । च्ंद्र सूर्य तारांगण । वायोचि धर्ता ॥ ३३ ॥ जितके काही चलन म्हणजे हालचाल होते ती वायुतत्त्वामुळेच होते. चंद्र, सूर्य, तारांगण यांना वायूच धारण करतो. (३३)
आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणी निश्चळ । अवकाशरूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ यानंतर आकाशाचे वर्णन करीत आहेत. आकाश हे पोकळ निर्मळ आणि निश्चल असून सर्व अवकाश हे आकाशच आहे, हे जाणून घ्यावे. (३४)
आकाश सकळांस व्यापक । आकाश अनेकीं येक । आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचे ॥ ३५ ॥ सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापले आहे. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे आणि पृथ्वी, आप, तेज व वायू या इतर चार भूतांचे कार्य आकाशात चालते. (३५)
आकाशा ऐसें नाहीं सार । आकाश सकळांहून थोर । पाहातां आकाशाचा विचार । स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥ आकाशासारखे सार नाही. सर्वांहून आकाश श्रेष्ठ आहे. आकाशाचा विचार करू लागले की, स्वरूपाशी त्याचे साध्य आहे असे वाटू लागते. (३६)
तव शिष्यें केला आक्षेप । दोहीचें सारखेंचि रूप । तरी आकाशचि स्वरूप । कां म्हणो नये ॥ ३७ ॥ असे म्हणताच शिष्याने आक्षेप घेतला की, आकाशाचे आणि स्वरूपाचे रूप जर सारखेच आहे, तर आकाशच स्वरूप आहे असे का म्हणू नये ? (३७)
आकाश स्वरुपा कोण भेद । पाहातां दिसेती अभेद । आकाश वस्तुच स्वतसिद्ध । कां न म्हणावी ॥ ३८ ॥ आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे ? वर-वरपाहता दोन्हीत भेद नाही, असेच वाटते. मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तु म्हणजेच परब्रह्म असे का म्हणू नये ? (३८)
वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निश्चळ । तैसेंचि आकाश केवळ । वस्तुसारिखें ॥ ३९ ॥ आत्मवस्तु अचळ अढळ निर्मळ व निश्चल असते. आकाशही केवळ वस्तूसारखेच आहे. (३९)
ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण पुरातन । आकाशाआंगी सप्त गुण । शास्त्रीं निरोपिलें ॥ ४० ॥ हे ऐकून वक्ता बोलू लागला की, वस्तू ही पुरातन असून, निर्गुण आहे. तर आकाशाच्या अंगी सात गुण आहेत, असे शास्त्रात सांगितले आहे. (४०)
काम क्रोध शोक मोहो । भय अज्ञान सुन्यत्व पाहो । ऐसा सप्तविध स्वभाव । आकाशाचा ॥ ४१ ॥ काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व असा आकाशाचा सात गुणांनी युक्त असा स्वभाव आहे. (४१)
ऐसें शात्राकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत जालें । स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥ शास्त्रात असे म्हटले आहे म्हणून आकाशाला भूत असे म्हटले जाते. स्वरूप हे निर्विकार असून निरुपम व सर्वत्र व्यापून महिले आहे. (४२)
काचबंदि आणी जळ । सारिखेंच वाटे सकळ । परी येक काच येक जळ । शाहाणे जाणती ॥ ४३ ॥ काचेची जमीन आणि पाणी ही दोन्ही डोळ्यांना सारखीच दिसतात पण शहाणे लोक काच कुठली आणि जळ कोठले, हे अचूक ओळखतात. (४३)
रुवामधें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला । तेणें कपाळमोक्ष जाला । कापुस न करी ॥ ४४ ॥ कापसामध्ये स्फटिक पडला तर लोकांना तो त्याच्यासारखा दिसतो. पण स्फटिक कठीण असल्याने कपाळमोक्ष करू शकतो, कापूस करत नाही. (स्त)
तदुलामधें श्वेत खडे । तंदुलासारिखें वांकुडे । चाऊं जाता दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥ तांदळात पांढरे खडे असतात. ते तांदळाच्या आकारासारखेच वाकडे असतात. म्हणून प्रथमदर्शनी ओळखू येत नाहीत; पण चावायला गेले तर दात पडतो, तेव्हा ते खडे आहेत हे कळते. (४५)
त्रिभागामधें खडा असे । त्रिभागासारिखाच भासे । शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥ चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणांत खडा पडला तर तो त्या मिश्रणासारखाच भासतो. पण शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे हे कळून येते. (४६)
गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड । नागकांडी आणी वेखंड । येक म्हणो नये ॥ ४७ ॥ गूळदगड हा गुळासारखा दिसतो पण तो पूर्णपणे कठीण असतो. नागकांडी आणि वेखंड सारखी दिसतात, पण म्हणून त्यांना एक म्हणू नये. (४७)
सोनें आणी सोनपितळ । येकचि वाटती केवळ । परी पितळेंसी मिळतां ज्वाळ । काळिमा चढे ॥ ४८ ॥ सोने आणि सोनपितळ अगदी एकसारखीच दिसतात. पण पितळ जर अग्नीत टकले तर काळे पडते. (४८)
असो हे हीन दृष्टांत । आकाश म्हणिजे केवळ भूत । तें भूत आणी अनंत । येक कैसे ॥ ४९ ॥ आता हे हीन दृष्टान्त देणे पुरे झाले. आकाश हे एक भूत आहे. ते भूत आणि अनंत असा परमात्मा एक कसे असू शकतील ? (४९)
वस्तुसी वर्णचि नसे । आकाश शामवर्ण असे । दोहींस साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥ आत्मवस्तूला रंगच नाही. आकाश शामवर्णी निळ्या रंगाचे आहे. मग विचारवंत त्या दोन्हींत साम्य आहे, असे कसे म्हणतील ? (५०)
श्रोते म्हणती कैंचें रूप । आकाश ठांईचे अरूप । आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥ श्रोते म्हणू लागले की, आकाशाला कसले आले आहे रूप ? ते ठायीच अरूपच आहे, म्हणून वस्तू आणि आकाश यांत भेद नाही. (५१)
चहूं भूतांस नाश आहे । आकाश कैसें नासताहे । आकाशास न साहे । वर्ण वेक्ती विकार ॥ ५२ ॥ इतर चार भूते नाश पावतात, पण आकाश कुठे नाश पावते ? शिवाय त्याच्या ठिकाणी रंग व दृश्यच हे विकारही नाहीत. (५२)
आकाश अचळ दिसतें । त्याचें काये नासों पाहातें । पाहातां आमुचेनि मतें । आकाश शाश्वत ॥ ५३ ॥ आकाश अचळ आहे. शिवाय ते नाश पावते, असे आपण म्हणता. पण त्याचे काय नाश पावते, हे आम्हांला कळत नाही. आमच्या मते तर आकाश शाश्वत आहे. (५३)
ऐसे ऐकोन वचन । वक्ता बोले प्रतिवचन । ऐक आतां लक्षण । आकाशाचें ॥ ५४ ॥ हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की, आता याचे उत्तर ऐका. मी तुला आकाशाचे लक्षण सांगतो. (५४)
आकाश तमापासून जालें । म्हणोन काम क्रोधें वेष्टिलें । अज्ञान सुन्यत्व बोलिलें । नाम तयाचें ॥ ५५ ॥ आकाश हे तमोगुणापासून झाले. (कारणाचे गुण कार्यात येतात) म्हणून ते कामक्रोधादींनी वेढलेले आहे. शून्यत्वरूपी अज्ञान असे त्याला म्हणतात. (५५)
अज्ञानें कामक्रोधादिक । मोहो भये आणी शोक । हा अज्ञानाचा विवेक । आकाशागुणें ॥ ५६ ॥ अज्ञानामुळेच काम, क्रोध, शोक, मोह, भय इत्यादी त्याच्या ठिकाणी असतात. शून्यत्व म्हणजे अज्ञान ते आकाशाच्या ठिकाणी आहे. म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व असते. (५६)
नास्तिक नकारवचन । तें सुन्याचें लक्षण । तयास म्हणती ह्रुदयसुन्य । अज्ञान प्राणी ॥ ५७ ॥ नास्तिकता व नकार वचन म्हणजेच ‘ काही नाही ‘ हेच शून्यत्व. हे शून्याचे लक्षण आहे म्हणूनच ज्याच्या ठिकाणी दया-माया नसते, त्या प्राण्याला हृदयशून्य म्हटले जाते. तसेच ज्याच्या हृदयात शून्य म्हणजेच अज्ञान आहे, तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो. (५७)
आकाश स्तब्धपणें सुन्य । सुन्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे कठिण । रूप तयाचें ॥ ५८ ॥ आकाशाची स्तब्धता हीच त्याची शून्यता. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे काठिण्य हे आकाशाचे रूप आहे. (५८)
कठिण सुन्य विकारवंत । तयास कैसें म्हणावें संत । मनास वाटे हें तद्वत । आहाच दृष्टीं ॥ ५९ ॥ कठीण, शून्य आणि विकारवंत आकाशाला सतूस्वरूप कसे म्हणावे ? वरवर पाहिले असता ते स्वस्वरूपासारखे मनास वाटते. (५९)
अज्ञान कालवलें आकाशीं । तया कर्दमा ज्ञान नासी । म्हणोनिया आकाशासी । नाश आहे ॥ ६० ॥ आकाशात अज्ञान मिसळलेले असते. त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते म्हणून आकाशाला नाश आहे. (६०)
तैसें आकाश आणी स्वरूप । पाहातां वाटती येकरूप । परी दोहींमधें विक्षेप । सुन्यत्वाचा ॥ ६१ ॥ म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एकरूप वाटतात, पण दोहोंमधील शून्यत्वात फरक आहे. (६१)
आहाच पाहातां कल्पेनिसी । सारिखेंच वाटे निश्चयेंसीं । परी आकाश स्वरूपासी । भेद नाही ॥ ६२ ॥ वरवर पाहाता कल्पनेला दोन्ही सारखेच वाटते, पण (विचार केला असता कल्ले की) आकाशात आणि स्वरूपात निश्चितच भेद आहे. (६२)
उन्मनी आणी सुषुप्ति अवस्ता । सारिखेच वाटे तत्वता । परी विवंचून पाहों जातां । भेद आहे ॥ ६३ ॥ ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुमुखी अवस्था वरवर पाहिले असता सारख्या वाटतात, पण विश्लेषण करून सखोल विचार केला असता कळून येते की, त्या दोन्ही अवस्थांमध्ये भेद आहे. (सुपुप्तीमध्ये अज्ञान बीजरूपाने शिल्लक असते. उन्मनीत अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन स्वस्वरूपाशी पूर्ण तादात्म्य झालेले असते. हा फार मोठा फरक आहे.) (६३)
खोटें खयासारिखें भाविती । परी परीक्षवंत निवडिती । कां कुरंगें देखोन भुलती । मृगजळासी ॥ ६४ ॥ सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात पण पारखी असतात त्यांना ख्याखोट्याची पारख असल्याने ते खरेच निवडून घेतात. मृगजळाला पाहून हरणे जशी मुक्यात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते. (६४)
आतां असो हा दृष्टांत । बोलिला कळाया संकेत । म्हणौनि भूत आणी अनंत । येक नव्हेती ॥ ६५ ॥ आता हे सर्व गहू दे. संकेत कळावा म्हणून हा दृष्टान्त दिला आहे. म्हणून आकाश हे भूत आणि अनंत अशी परब्रह्म वस्तू एक नव्हेत. (६५)
आकाश वेगळेपणें पाहावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें । वस्तुचें पाहाणें स्वभावें । ऐसे असे ॥ ६६ ॥ आकाश हे वेगळेपणाने पाहाता येते ! वस्तूला पाहणे म्हणजे स्वरूपी स्वरूपच होणे अशा प्रकारचे असते. तेथे वस्तू आणि ती पाहणारा असे द्वैत उरतच नाही. (६६)
येथें आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली । भिन्नपणें नवचे अनुभवली । स्वरूपस्थिती ॥ ६७ ॥ येथे आता शंका नाहीशी झाली व त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. स्वरूपस्थिती ही कधीही भिन्नपणे अनुभवता येत नाही. (६७)
आकाश अनुभवा येतें । स्वरूप अनुभवापरतें । म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥ ६८ ॥ आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो पण स्वरूप हे अनुभवणाऱ्याच्या पलीकडले आहे. म्हणून स्वरूप आणि आकाश यांत साम्य असू शकत नाही. (६८)
दुग्धासारिखा जळांश । निवडुं जाणती राजहंस । तैसें स्वरूप आणी आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥ मिसळले दूध आणि पाणी हे दोन्ही एकरूप वाटले तरी राजहंस वेगळे करू शकतात, त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यांतील भेद संतच जाणतात. (६९)
सकळ माया गथागोवी । संतसंगें हें उगवावी । पाविजे मोक्षाची पदवी । सत्समागमें ॥ ७० ॥ ही सर्व मायेची गुंतागुंत आहे. संतसमागम केला असता हे सर्व कोडे उलगडते. म्हणून संतसमागम करून मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यावी. (७०)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम समास पांचवा ॥ ५ ॥