Samas 6
समास 6 - समास सहावा : दुश्चीतनिरूपण
समास 6 - दशक ८
समास सहावा : दुश्चीतनिरूपण ॥ श्रीराम ॥
श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी । मोक्ष लाभे कितां दिवसीं । हें मज निरोपावें ॥ १ ॥ श्रोता वक्याला विनंती करीत आहे की, आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा. किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो, हेही मला समजावून सांगा. (१)
धरितां साधूची संगती । कितां दिवसां होते मुक्ती । हा निश्चय कृपामुर्ती । मज दिनास करावा ॥ २ ॥ हे कृपामूर्ती सास्ती संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्रास होते त्यासंबंधी निश्चित मत मज-दीनाला सांगा. (२)
मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्वासतां निरूपणीं । दुश्चितपणीं हानी । होतसे ॥ ३ ॥ यावरवक्यानेउत्तरदिलेकी, दृढविश्वास असेलतरनिरूपण श्रवण करताक्षणीच तात्काळ मुक्ती लाभते, पण दुश्चितपणे, भांबावलेपणाने श्रवण केले, तर मात्र हानी होते. (३)
सुचितपणें दुश्चीत । मन होतें अकस्मात । त्यास करावें निवांत । कोणे परीं ॥ ४ ॥ यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की, सुचितपणे म्हणजे एकाग्रमनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दुश्चित होते. म्हणजे भांबावून जाते. तरी परत त्याला शांत कसे करावे, हे सांगा. (४)
मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडीं । सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥ यावर वक्ता उत्तर देत आहे की, मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढतोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे व काळ सार्थकी लावावा. (५)
अर्थ प्रमेय ग्रंथांतरीं । शोधून घ्यावें अभ्यांतरीं । दुश्चीतपण आलें तरी । पुन्हां श्रवण करावें ॥ ६ ॥ अर्थ व सारभूत सिद्धान्त नीट समजून ध्यावे व ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे. मध्येच मन अस्वस्थ झाले, तरी श्रवण सोडू नये. पुन्हापुन्हा श्रवण करीत असावे. (६)
अर्थांतर पाहिल्यावीण । उगेंचि करी जो श्रवण । तो श्रोता नव्हे पाषण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥ अर्थ नीट समजून न घेता, जो उगीचच श्रवण करतो, तो श्रोता नसून मनुष्यवेषातील पाषाणच होय. (७)
येथें श्रोते मानितील सीण । आम्हांस केलें पाषाण । तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥ ८ ॥ आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की, आपल्याला पाषाण ठरवले, तर आता पाषाणाचे लक्षण ऐका. (८)
वांकुडा तिकडा फोडिला । पाषाण घडून नीट केला । दुसरे वेळेसी पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥ वाकडातिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला, तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की, च्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो, त्याच स्थितीत तो जसाच्या तसाच असतो. (९)
टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुन्हा लागे ॥ १० ॥ दगडाची खपली यकीने तोडली की, ती परत दगडाला चिकटत नाही. पण मनुष्याचे तसे नाही. त्याची कुबुद्धी झाडली, तरी ती पुन्हा येऊन त्याला चिकटते. (१०)
सांगतां अवगुण गेला । पुन्हा मागुतां जडला । याकरणें माहांभला । पाषाणगोटा ॥ ११ ॥ मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणांचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतात. म्हणून त्याच्यापेक्षा पाषाणगोय खूपच चांगला असे म्हणावे लागते. (११)
ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहून उणा । पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥ च्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही, तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल. त्याच्यापेक्षा पाषाण कोटीगुणांनी बस असे म्हणावे लागेल. (१२)
कोटिगुणें कैसा पाषाण । त्याचेंहि ऐका लक्षण । श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥ पाषाणाला कोटीगुणांनी बरा असे का म्हटले, त्याचेही कारण सांगतो. ते श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करावे. (१३)
माणीक मोतीं प्रवाळ । पाचि वैडुर्य वज्रनीळ । गोमेदमणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥ माणिक, मोती, पोवळे, पाचू वैडूर्य, वजनीळ तसेच गोमेदमणी व परिस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात. (१४)
याहि वेगळे बहुत । सूर्यकांत सोमकांत । नाना मोहरे सप्रचित । औषधाकारणें ॥ १५ ॥ याखेरीज इतरही अनेकसूर्यकांत, सोमकांत (चंद्रकांत), नाना औषधी मणी, जे औषधाकरितां अनुभवसिद्ध आहेत ते, याप्रमाणे हे सर्वही पाषाणच आहेत. (१५)
याहि वेगळे पाषाण भले । नाना तिर्थीं जे लागले । वापी कूप सेखीं जाले । हरिहरमुर्ती ॥ १६ ॥ याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना ती र्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, घाट मदिरे दीपमाळा वगैरेंसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तीसाठी वापरले जातात. (१६)
याचा पाहातं विचार । पाषाणा ऐसें नाहीं सार । मनुष्य तें काये पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥ त्या सर्वांचा विचार केला की, पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही. त्याच्यापुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचा काय पाड ? (१७)
तरी तो ऐसा नव्हे तो पाषाण। जो अपवित्र निःकारण । तयासातिखा देह जाण । दुश्चीत अभक्तांचा ॥ १८ ॥ पण जो पाषाण वरीलप्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो; त्याच्यासारखाच दुश्चित व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. (१८)
आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चीतपणें । दुश्चीतपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥ आता हेबोलणे पुरेझाले थोडक्यात म्हणजे दुश्चितपणाने आपला घात होतो. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच, धड ना परमार्थ अशी स्थिती होते. (१९)
दुश्चीतपणें कार्य नासे । दुश्चीतपणें चिंता वसे । दुश्चीतपणें स्मरण नसे । क्षण येक पाहातां ॥ २० ॥ दुश्चितपणाने कार्य बिघडते, मनात चिंता उत्पन्न होते, पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. (२०)
दुश्चीतपणें शत्रुजिणें । दुश्चीतपणें जन्ममरणें । दुश्चीतपणाचेनि गुणें । हानी होय ॥ २१ ॥ त्या अवगुणांमुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो, जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होत नाही, सर्व प्रकारे अत्यंत नुकसान होत असते. (२१)
दुश्चीतपणें नव्हे साधन । दुश्चीतपणें न घडे भजन । दुश्चीतपणें नव्हे ज्ञान । साधकांसी ॥ २२ ॥ दुश्चित्तपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही, की भगवंताचे भजन होत नाही अथवा ज्ञानही प्रास होऊ शकत नाही. (२२)
दुश्चीतपणें नये निश्चयो । दुश्चीतपणें न घडे जयो । दुश्चीतपणें होये क्षयो । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥ दुश्चित्तपणामुळेकुठल्याही गोष्टीसंबंधी निश्चय होत नाही, कुठल्याही गोष्टीत जय, यश मिळत नाही, आपल्या हिताची सर्वप्रकारे हानी होते. (२३)
दुश्चीतपणें न घडे श्रवण । दुश्चीतपणें न घडे विवरण । दुश्चीतपणें निरूपण । हातींचे जाये ॥ २४ ॥ दुश्चित्तपणामुळे नीट श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही, त्यामुळे अध्यात्म-निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो, तो हातचा जातो. (२४)
दुश्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे । चंचळ चक्रीं पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥ चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरे तर असून नसल्यासारखाच असतो. कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करीत असते. (२५)
वेडें पिशाच्य निरंतर । अंध मुके आणी बधिर । तैसा जाणावा संसार । दुश्चीत प्राणियांचा ॥ २६ ॥ एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतरपिशाच्च लागलेल्या माणसाचा किंवा अंध, मूकबधिर माणसाचा संसार जसा असतो, तसाच दुश्चित्त प्राण्याचाही संसार धड नसतो. (२६)
सावध असोन उमजेना । श्रवण असोन ऐकेना । ज्ञान असोन कळेना । सारासारविचार ॥ २७ ॥ तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही, कान असून त्याला जणू ऐकू येत नाही आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. (२७)
ऐसा जो दुश्चीत आळसी । परलोक कैंचा त्यासी । जयाचे जिवीं अहर्निशीं । आळस वसे ॥ २८ ॥ याप्रकारे जो दुश्चित आणि आळशी असतो आणि ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो, त्याला परलोक कसा प्रास होणार ? (२८)
दुश्चीतपणापासुनि सुटला । तरी तो सवेंच आळस आला । आळसाहातीं प्राणीयांला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥ जर एखादा माणूस दुश्चितपणातून सुटला, तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला, की त्याला उसंतच मिळत नाही. (२९)
आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार । आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्यां ॥ ३० ॥ आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतरही होऊ शकत नाही. (३०)
आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हें निरूपण । आळसें परमार्थाची खूण । मळिण जाली ॥ ३१ ॥ आळसामुळे श्रवण, निरूपण इत्यादी काहीच घडत नाही. त्यामुळे परमार्थही होत नाही. (३१)
आळसें नित्यनेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला । आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥ आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो, अभ्यास बंदच पडतो आणि आळसाने आळस अमर्याद वाढतो. (३२)
आळसें गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ ॥ आळसाने निश्चय टिकून राहात नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते, एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. (३३)
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुंद्धि निश्चयाची ॥ ३४ ॥ आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली आणि आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. (३४)
दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ ॥ दुश्चित्तपणाने प्रथम आळस वाढतो, आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. (३५)
निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ ॥ निद्रा, आळस आणि दुश्चित्तपणा ही मूर्खाची लक्षणे. या तीन अवगुणांमुळे अध्यात्मनिरूपण उमजतच नाही. (३६)
हें तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥ ही तीनही लक्षणे जेथे असतात, तेथे विवेक कसा उत्पन्न होणार ? अज्ञानी माणसाला आळस व निद्रा यांतच सुख वाटते. याहून अधिक सुख कशात असेल, असे त्याला वाटतच नाही. (३७)
क्षुधां लागतांच जेविला । जेऊन उठतां आळस आला । आळस येतां निजेला । सावकास ॥ ३८ ॥ भूक लागल्याबरोबर जेवावे. जेवून उठताच आळस येतो. आळस आला की आरामात झोपून जावे, हेच त्याला बरे वाटते. (३८)
निजोन उठतांच दुश्चीत । कदा नाहीं सावचित । तेथें कैचें आत्महित । निरूपणीं ॥ ३९ ॥ निजून उठल्यावरही तो कधी सावचित्त नसतोच. दुश्चित्तपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार ? (३९)
मर्कटापासीं दिल्हें रत्न । पिशाच्याहातीं निधान । दुश्चीतापुढें निरूपण । तयापरी होये ॥ ४० ॥ माकडाच्या हाती रत द्यावे किंवा पिशाच्चाच्या हाती खजिना सोपवावा, त्याप्रमाणे दुश्चित्त असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म-निरूपण करणे होय. (४०)
आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती । कितां दिवसाइं होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥ ४१ ॥ असो. आता हा ऊहापोह पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनांच्या संगतीने किती दिवसांत मुक्ती होते, ही मूळ शंका आहे. (४१)
ऐका याचें प्रत्योत्तर । कथेंसि व्हावें निरोत्तर । संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥ या शंकेचे उत्तर आता ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. संतसंगाचा विचार असा आहे. (४२)
लोहो परियेसी लागला । थेंबुटा सागरीं मिळाला । गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥ ४३ ॥ लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंडाचे सोने होते, थेबुटा सागरात मिळाला की कव्हणी एकरूप होतो किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की कव्हणी ती गंगाच बनते. (४३)
सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष । इतरांस तें अलक्ष । लक्षिलें नवचे ॥ ४४ ॥ त्याप्रमाणे जो सावध निग्रही व जागरूक असतो, त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष्म अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. (४४)
येथें शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां नलगे वेळे । अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥ येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात, त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो. (४५)
प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण । अनन्य भावार्थेंविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥ जे प्रज्ञावंत आणि अनन्यही असतात, त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही. ती निरुपयोगी ठरते. (४६)
प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु ना कळे । प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥ प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही आणि विश्वास नसेल तर सद्वस्तु कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. (४७)
देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती । सत्संगें सद्गती । विलंबचि नाही ॥ ४८ ॥ देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते. सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते. विलंब लागत नाही. (४८)
सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥ जो शिष्य सावध, निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो, त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. (४९)
इतर भाविक साबडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥ इतर भोळेभाबडे भाविक लोक असतात, त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीमुळे विवेकदृष्टी तत्काळ जागत होते. (५०)
परी तें साधन मोडुं नये । निरूपणाचा उपाये । निरूपणें लागे सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥ पण निरूपणाचा उपाय करीत असताही साधन कधी सोडू नये. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो. (५१)
आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरूपाची दशा । त्याचे प्राप्तीचा भर्वसा । सत्संगें केवी ॥ ५२ ॥ आता मोक्ष कसा आहे, स्वरूपदशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते, (५२)
ऐसें निरूपण प्रांजळ । पुढें बोलिलें असे सकळ । श्रोतीं होऊनियां निश्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥ याचे स्पष्ट व स्वच्छ निरूपण पुढे सर्व सागितलेजाईल तरी श्रोत्यांनी निश्चलहोऊन शांतचित्ताने अवधान द्यावे. (५३)
अवगुण त्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें । श्रोतीं कोप न धरणें । ऐसिया वचनाचा ॥ ५४ ॥ श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून न्यायनिहुरपणे बोलावे लागते. तरी अशा बोलण्याचा गग श्रोत्यांनी धरू नये. (५४)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दुश्चीतनिरूपणनाम समास सहावा ॥