उपासना

Samas 8

समास 8 - समास आठवा : आत्मदर्शननाम

समास 8 - दशक ८

समास आठवा : आत्मदर्शननाम

॥ श्रीराम ॥

मागां जाले निरूपण । परमात्मा तो तूंचि जाण । तया परमात्मयाचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १ ॥ मागील समासात परमात्मा तो तूचि जाण असे निरूपण केले गेले. आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहे. (१)

जन्म नाही मृत्यु नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥ परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध आणि मोक्ष दोन्हीही नाही. (२)

परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार । पर्मात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥ परमात्मा निर्गुण, निराकार अनंत, अपार, नित्य व निरंतर असा आहे, ज्यात बदल होत नाही, जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा होय. (३)

परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं येक । परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥ परमात्मा हा सर्वव्यापक असून अनेकांना तो एकटच व्यापून असतो. परमात्म्यासंबंधीचा विवेक हा अतर्क्य आहे. (४)

ऐसी परमात्मयाची स्थिती । बोलताती वेद श्रुती । परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाही ॥ ५ ॥ वेद व धुती याप्रकारे परमात्मस्वरूपाचे वर्णन करतात; पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते यात जराही संशय नाही. (५)

तये भक्तीचें लक्षण । भक्ती नवविधा भजन । नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाले ॥ ६ ॥ ती भक्ती म्हणजेच भजन नऊ प्रकारचे आहे. या नवविधाभक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले. (६)

तया नवविधामध्यें सार । आत्मनिवेदन थोर । तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥ त्या नवविधाभक्तीत आत्मानिवेदन सर्वांत श्रेष्ठ असून सर्वांचे जणू सार आहे. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. (७)

आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें । आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥ आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले आहे की नाही, ते जाणून घ्यावे. (८)

महत्पूजेचा अंतीं । देवास मस्तक वाहाती । तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची ॥ ९ ॥ महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारासारखी अत्यंत निकटची भक्ती आहे. (९)

आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती । तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ॥ १० ॥ याप्रमाणे स्वतःस समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात. त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. (१०)

आपणांस कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें । किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ त्यावर श्रोत्याने विचारले की, आपण स्वतःस कसे निवेदावे ? कोठेजाऊन पडावे अथवा देवापुढे आपलेमस्तक तोडून घ्यावे ? काय करावे ते काहीच कळत नाही. (११)

ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें । श्रोतां सावधान होणें । येकाग्र चित्तें ॥ १२ ॥ हे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता म्हणाला की, आता श्रोत्यांनी सावध होऊन चित्त एकाग्र करावे. (१२)

आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥ आत्मनिवेदन कशास म्हणावे त्याचे लक्षण सांगतात. आधी मी कोण याचा शोध घ्यावा व नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे. (१३)

देवभक्ताचें शोधन । करितां होतें आत्मनिवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ याप्रमाणे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते. देव शाश्वत आहे हे भक्तास कळून येते. (१४)

देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता । देवभक्तविभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥ देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप तक्ता येते. मग देव- भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहात नाही. (१५)

विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त । अयुक्त नाहीं बोलणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥ विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात. बंधन नाही म्हणूनच मुक्त म्हणतात, हे बोलणे अयुक्त नाही. कारण याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे. (१६)

देवाभक्ताचें पाहातां मूळ । होये भेदाचें निर्मूळ । येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ देव व भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्यावर भेद समूळ नाहीसा होतो. सर्व दृश्याच्या पलीकडे एक परमात्माच आहे हे कळून येते. (१७)

तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं । देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥ १८ ॥ त्याच्याशी ऐक्य झाले की दुजेपणा म्हणजेच द्वैत उरतच नाही. देव- भक्त असा अडसर वहातच नाही. (१८)

आत्मनिवेदनाचे अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती । तये नाव सायोज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥ याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्तांचे ऐक्य होऊन जी अभेदभक्ती घडते, तिचेच नाव सायुज्यमुक्ती होय हे सत्य जाणून घ्यावे. (१९)

जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरूपणें बोधला । मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥ जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्रास झालेला असतो. त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो वेगळा होऊच शकत नाही. (२०)

नदीं मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोहो सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥ नदी एकदा सागराला मिळाली, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करतां येईल ? लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने एकदा सोने झाले की त्याचा काळसरपणा परतून येत नाही. (२१)

तैसा भगवंतीं मिळाला । तो नवचे वेगळा केला । देव भक्त आपण जाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥ त्याप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भक्त देवच होतो, तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही. (२२)

देव भक्त दोनी येक । ज्यासी कळला विवेक । साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥ देव भक्तदोन्हीएकच आहेत, हाविवेकच्यात्य कळतो तो साधुजनांनाही मोक्षदायक ठरतो, हे जाणून घ्यावे. (२३)

आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें । तेणें त्यांचें ऐश्वर्य बाणे । तत्काळ आंगीं ॥ २४ ॥ आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहवे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तात्काळ बाणते. (२४)

देहचि होऊन राहिजे । तेणें देहदुःख साहिजे । देहातीत होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥ ‘ मी देह ‘ असे मानून देहच होऊन राहिले की, देहदुःख भोगावे लागतेच. देहातीत झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. (२५)

देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें । ऐश्वर्याची लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥ यावर श्रोता विचारतो आहे की, देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती, हे सर्व आपण सांगावे. (२६)

ऐसें श्रोतां आक्षेपिलें । याचे उत्तर काये बोलिलें । तेंचि आतां निरोपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥ श्रोत्यांनी असे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर काय दिले गेले, तेच आता वर्णन करून सांगितले जाईल. तरी सावध होऊन ऐका. (२७)

देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रह्म पाहें । देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥ देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. (२८)

ज्याची बुद्धी होये ऐसी । वेद वर्णिती तयासी । शोधितां नाना शास्त्रांसी । न पडे ठांई ॥ २९ ॥ ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्रास होत नाही. (२९)

ऐश्वर्य ऐसें तत्वता । बाणें देहबुद्धि सोडितां देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥ देहबुद्धी सोडली की, अशा प्रकारचे ऐश्वर्य प्रास होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. (३०)

याकारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण । मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥ म्हणून साधूंचे वचन कधी खोटे मानू नये. त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. (३१)

साधुवचन तें कैसें । काये धरावें विश्वासें । येक वेळ स्वामी ऐसें । मज निरोपावें ॥ ३२ ॥ यावर श्रोता विचारतो की, साधु-वचन ते कोठले ? त्यावर विश्वास का ठेवाव ? स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजावून द्यावे. (३२)

सोहं आत्मा स्वानंदघन । अजन्मा तो तूंचि जाण । हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥ सोऽह म्हणजेच स्वानदघन आत्मा तोच मी आहे. तो अजन्मा असून तो तूच आहेस, हे जाणावे. हेच साधूचे वचन अंतरात सुदृढ धरावे. (३३)

महावाक्याचें अंतर । तुंचि ब्रह्म निरंतर । ऐसिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥ महावाक्याचे मर्म जे ‘ तूच निरंतर ब्रह्म आहेस ‘ या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. (३४)

देहासि होईल अंत । मग मी पावेन अनंत । ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥ देहाचा अंत होईल आणि मग मला अनंताची प्राप्ती होईल असे हे भ्रमिष्टपणाचे बोलणे कधी मानूच नये. (३५)

येक मुर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं । मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥ काही मूर्ख लोक असे म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हांला ब्रह्मप्रासी होईल तोपर्यंत होणार नाही. (३६)

मायेसी होईल कल्पांत । अथवा देहासी येईल अंत । तेव्हां पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥ कल्पांताच्यावेळी माया नाहीशी होईल तेव्हा अथवा या देहाचा अंत होईल, तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्रास होईल. (३७)

हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान । समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥ हे बोलणे बिनबुडाचे आहे. याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काही वेगळेच असते. (३८)

शैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥ सैन्य सर्वच्या सर्व मरून जावे व मग आपल्याला ‘० मिळावे अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच ट करावे, हे अधिक बरे पण हे कळत नाही. (३९)

माया असोनिच नाहीं । देह असतांच विदेही । ऐसें समाधान कांहीं । वोळखावें ॥ ४० ॥ त्याप्रमाणेच माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे यात जे समाधान आहे, ते जाणून घेतले पाहिजे. (४०)

राज्यपद हातासी आलें । मग परिवारें काय केलें । परिवारा देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥ एकदा सज्यपद हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे ? परिवारामुळे राज्य गेले असे तर घडूच शकत नाही. (४१)

प्राप्त जालियां आत्मज्ञान । तैसें दृश्य देहभान । दृष्टीं पडतां समाधान । जाणार नाही ॥ ४२ ॥ एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगत्. दृष्टीस दिसत असले, देहाचे भानही राहात असले, तरी प्रास झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. (४२)

मार्गीं मूळी सर्पाकार । देखतां भये आलें थोर । कळतां तेथील विचार । मग मारणें काये ॥ ४३ ॥ मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली त्यामुळे सर्प आहे, असे वाटून खूप भीतीही वाटली, पण मग कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मारायचे कुणाला आणि कशासाठी ? (४३)

तैसी माया भयानक । विचार पाहातां माईक । मग तयेचा धाक । कायसा धरावा ॥ ४४ ॥ त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती; पण विचार केल्यावर ती मायिक आहे, मिथ्या आहे हे कळून आले. मग आता तिचा धाक कशाला धरायचा ? (४४)

देखतां मृगजळाचे पूर । म्हणे कैसा पावों पैलपार । कळतां तेथीचा विचार । सांकडें कैंचें ॥ ४५ ॥ मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की, याच्या पैल्लीरास आपण कसे जाऊ शकू, पण ज्यावेळी कळ्ये की तेथे जल नाहीच मग संकट कसले ?(४५)

देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक । जागृती आलीयां साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥ भयानक स्वप्न दिसले आणि स्वप्नात खूप भीती वाटली. नंतरजागृती आल्यावरसाशंककशाला व्हावे ?(४६)

तथापी माया कल्पनेसी दिसे । आपण कल्पनेतीत असे । तेथें उद्वेग काईसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय ? (४७)

अंतीं मतीं तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती । तुझा अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि जाली ॥ ४८ ॥ सर्व सांगतात की ‘ अंती मती तेचि गती ‘ मग तुझा अंत होईल तेव्हा म्हणजे तुझ्या ‘ मी ‘ पणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. (४८)

चौंदेहाचा अंत । आणी जन्म मुळाचा प्रांत । अंतांप्रांतासी अलिप्त । तो तुं आत्मा ॥ ४९ ॥ चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय व उत्पत्ती जेथे होतात, तो मूळ्यायेचा प्रांत अथवा या सर्व दृश्य पदार्थांची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होतात त्या मूळ्यायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो, ते आत्मस्वरूप तूच असल्याने, मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस (४९)

जयासी ऐसी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती । गती आणी अवगती । वेगळाचि तो ॥ ५० ॥ ज्याची बुद्धी याप्रकारे दृढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्यगती प्रास होते. म्हणजे तो आत्य्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्‌गती व अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोहोचतो (५०)

मति खुंटली वेदांची । तेथें गती आणी अवगती कैंची । आत्मशास्त्रगुरुप्रचिती । ऐक्यता आली ॥ ५१ ॥ च्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मतीही कुंठित होते तेथे गती अथवा अवगती कशी असू शकेल ? अशा साधकाला आत्मप्रचीती, शास्त्रप्रचीती व गुरुप्रचीती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. (५१)

जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्मप्रचिती । प्राणी पावला उत्तमगती । सद्गुफरुबोधें ॥ ५२ ॥ मी जीव आहे ‘ ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्मवस्तूची आत्मप्रचीती त्याला प्राप्त होते. अशा रीतीने सद्‌गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्रास होते. (५२)

सद्गुीरुबोध जेव्हां जाला । चौंदेहांस अंत आला । तेणें निजध्यास लागला । सस्वरूपीं ॥ ५३ ॥ सद्‌गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहांचा नाश होतो. म्हणजे या चारी देहांपैकी एकही मी नाही हे ज्ञान होते व स्वस्वरूपाचा निदिध्यास लागतो. (५३)

तेणें निजध्यासें प्राणी । धेयंचि जाला निर्वाणीं । सायोज्यमुक्तीचा धनी । होऊन बैसला ॥ ५४ ॥ त्या निदिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूपच होतो आणि सायुज्यमुक्तीचा धनी होऊन बसतो. (५४)

दृश्य पदार्थ वोसरतां । आवघा आत्माचि तत्वता । नेहटून विचारें पहातां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥ दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्याच खरोखर व्यास आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्य मुळी नाहीच हे कळून येते. (५५)

मिथ्या मिथ्यत्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें । श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या नाव मोक्ष ॥ ५६ ॥ मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळ्ये असेही नाही. तर तसा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली. श्रोत्यांनी हे जाणले पाहिजे की, यालाच मोक्ष असे म्हणतात. (५६)

सद्गुारुवचन हृदईं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी । श्रवण मनन केलेंचि करी । अत्यादरें ॥ ५७ ॥ जो सद्‌गुरूचे वचन हृदयात दृढ धारण करतो, तोच मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्‌गुरूंच्या वचनाचे श्रवण-मनन करीतच राहतो. (५७)

जेथें आटती दोन्ही पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष । या नाव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥ जेथे अज्ञान हा पूर्वपक्ष व ज्ञान उत्तरपक्ष हे दोन्ही नाहीसे होतात, जेथे लक्ष्य अथवा अल्यही काही उरलेले नसते, असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे, हाच मोक्ष म्हणून जाणावा. (५८)

जेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे । केवळ ज्ञेप्तिमात्र उरे । सूक्ष्म ब्रह्म ॥ ५९ ॥ जेथे ध्यान, धारणा आदी निपुस नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढे ज्ञक्षिरूपाने म्हणजे जाणीवरूपाने उरते, त्यास मोक्ष म्हणावे. (५९)

भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन सुटलें । अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासुनी ॥ ६० ॥ मग संसाररूपी मृगजळ आटून जाते, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते. जो वास्तविक अजन्माच आहे, तो मिथ्या जन्मदुखापासून मुक्त होतो. (६०)

निःसंगाची संगव्याधी । विदेहाची देहबुद्धी । विवेकें तोडिली उपाधी । निःप्रपंचाची ॥ ६१ ॥ जो निःसंगच आहे त्याला श्रांतीने संगरूपी रोग जडला होता, तो रोग नष्टहोतो. जो विदेही असून स्वतःस देही मानत होता त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे, त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीशी होते. (६१)

अद्वैताचें तोडिलें द्वैत । येकांतास दिला एकांत । अनंतास दिला अंत । अनंताचा ॥ ६२ ॥ जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले, जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनन्तपणाचाही अंत झाला. ‘ मी अनंत ‘ ही जाणीवही उरली नाही. (६२)

जागृतीस चेवविलें । चेईयास सावध केलें । निजबोधास प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥ जागृतीलाच जागे केले जागृत असलेल्याला सावध केले, निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. (६३)

अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्तीचें घर । संयोगास निरंतर । योग केला । ६४ ॥ जो कधी मरू शकतच नाही, त्याला अमर केले. मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा कधी वियोग होऊ शकतच नाही, त्याचा निरंतर योग घडवून आणला. (६४)

निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक जालें । बहुतां दिवसां भेटलें । आपणासि आपण ॥ ६५ ॥ ‘ मी निर्गुण ‘ अशी जाणीवही राहिली नाही; म्हणजे निर्गुणालही गुपरहित केले आत्मज्ञान झाले तरच मनुष्यजन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. (६५)

तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा । भूतपंचकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६६ ॥ द्वैताचा पडदा तुटून गेला, अद्वैताने भेदास नाहीसे केले, पंचमहाभूतांनी झडपलेहोते, ती भूतबाधानाहीशीझाली. (६६)

जालें साधनाचें फळ । निश्चळास केलें निश्चळ । निर्मळाचा गेला मळ । विवबळें ॥ ६७ ॥ विवेकामुळे साधन सफल झाले, निश्चळ परब्रह्मास निश्चल केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ निघून गेला. (६७)

होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त जालें । आपण देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥ जवळ असूनही ज्याची चुकामूक झाली होती, ते ज्याचे त्यास प्रास झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्मदुःख नाहीसे झाले. (६८)

दुष्टस्वप्नें जाजावला । ब्रह्मण नीच याती पावला । आपणांसी आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥ एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की, आपण नीच जातीत जन्मलो आहोत. त्यामुळेतो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळ्ये की, ते स्वप्न होते. आपण जसे होतो तसेच आहोत म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. (६९)

ऐसें जयास जालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥ या प्रकारेज्याला आत्मज्ञान झालेले आहे, त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे ते ऐकावे. (७०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मदर्शननाम समास आठवा ॥ ८ ॥

20px