Samas 1
समास 1 - समास पहिला : आशंकानाम
समास 1 - दशक ९
समास पहिला : आशंकानाम
॥ श्रीराम ॥
निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये ।
निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥
निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं ।
निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥
निरामय म्हणिजे काये । निराभास म्हणिजे काये ।
निरावेव म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ३ ॥
निरामय म्हणिजे जळमये नाहीं । निराभास म्हणिजे भासचि नाहीं ।
निरावेव म्हणिजे अवेव नाहीं । परब्रह्मासी ॥ ४ ॥
निःप्रपंच म्हणिजे काये । निःकळंक म्हणिजे काये ।
निरोपाधी म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ५ ॥
निःप्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं । निःकळंक म्हणिजे कळंक नाहीं ।
निरोपाधी म्हणिजे उपाधी नाहीं । परब्रह्मासी ॥ ६ ॥
निरोपम्य म्हणिजे काये । निरालंब म्हणिजे काये ।
निरापेक्षा म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ७ ॥
निरोपम्य म्हणिजे उपमा नाहीं । निरालंब म्हणिजे अवलंबन नाहीं ।
निरापेक्षा म्हणिजे अपेक्षा नाहीं । परब्रह्मासी ॥ ८ ॥
निरंजन म्हणिजे काये । निरंतर म्हणिजे काये ।
निर्गुण म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ९ ॥
निरंजन म्हणिजे जनचि नाहीं । निरंतर म्हणिजे अंतर नाहीं ।
निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १० ॥
निःसंग म्हणिजे काये । निर्मळ म्हणिजे काये ।
निश्चळ म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ११ ॥
निःसंग म्हणिजे संगचि नाहीं । निर्मळ म्हणिजे मळचि नाहीं ।
निश्चळ म्हणिजे चळण नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥
निशब्द म्हणिजे काये । निर्दोष म्हणिजे काये ।
निवृत्ती म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १३ ॥
निशब्द म्हणिजे शब्दचि नाही । निर्दोष म्हणिजे दोषचि नाही ।
निवृत्ति म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥
निःकाम म्हणिजे काये । निर्लेप म्हणिजे काये ।
निःकर्म म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १५
निःकाम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे लेपचि नाहीं ।
निःकर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६
अनाम्य म्हणिजे काये । अजन्मा म्हणिजे काये ।
अप्रत्यक्ष म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १७ ॥
अनाम्य म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि नाहीं ।
अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥
अगणित म्हणिजे काये । अकर्तव्य म्हणिजे काये ।
अक्षै म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १९ ॥
अगणित म्हणिजे गणित नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्यता नाहीं ।
अक्षै म्हणिजे क्षयचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥
अरूप म्हणिजे काये । अलक्ष म्हणिजे काये ।
अनंत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २१ ॥
अरूप म्हणिजे रूपचि नाहीं । अलक्ष म्हणिजे लक्षत नाहीं ।
अनंत म्हणिजे अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥
अपार म्हणिजे काये । अढळ म्हणिजे काये ।
अतर्क्य म्हणिजे काये । मज निरूपावें ॥ २३ ॥
अपार म्हणिजे पारचि नाहीं । अढळ म्हणिजे ढळचि नाहीं ।
अतर्क्ये म्हणिजे तर्कत नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥
अद्वैत म्हणिजे काये । अदृश्य म्हणिजे काये ।
अच्युत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २५ ॥
अच्हेद म्हणिजे काये । अदाह्य म्हणिजे काये ।
अक्लेद म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २७ ॥
अच्छेद म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे जळेना ।
अक्लेद म्हणिजे कालवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥
परब्रह्म म्हणिजे सकळांपरतें । तयास पाहातां आपणचि तें ।
हें कळे अनुभवमतें । सद्गुपरु केलियां ॥ २९ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आशंकानाम समास पहिला ॥