Samas 10
समास 10 - समास दहावा : स्थितिनिरूपण
समास 10 - दशक ९
समास दहावा : स्थितिनिरूपण॥ श्रीराम ॥
देउळामधें जगन्नायेक । आणी देवळावरी बैसला काक ।
परी तो देवाहुन अधिक । म्हणों नये कीं ॥ १ ॥
सभा बैसली राजद्वारीं । आणी मर्कट गेलें स्तंभावरी ।
परी तें सभेहून श्रेष्ठ चतुरीं । कैसे मानावें ॥ २ ॥
ब्रह्मण स्नान करून गेले । आणी बक तैसेचि बैसले ।
परी ते ब्रह्मणपरीस भले । कैसे मानावे ॥ ३ ॥
ब्रह्मणामधें कोणी नेमस्त । कोणी जाले अव्यावेस्त ।
आणी स्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥
ब्राह्मण लक्षमुद्रा नेणें । मार्जर लक्षविषईं शाहाणें ।
परी ब्रह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥ ५ ॥
ब्रह्मण पाहे भेदाभेद । मक्षिका सर्वांस अभेद ।
परी तीस जाला ज्ञानबोध । हें तों न घडे कीं ॥ ६ ॥
उंच वस्त्रें नीच ल्याला । आणी समर्थ उघडाच बैसला ।
परी तो आहे परिक्षिला । परीक्षवंतीं ॥ ७ ॥
बाह्याकार केला अधिक । परी तो अवघा लोकिक ।
येथें पाहिजे मुख्य येक । अंतरनिष्ठा ॥ ८ ॥
लोकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाला ।
मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥
देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पित्रलोक ।
भूतांस भजतां भूतलोक । पाविजेतो ॥ १० ॥
जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकासी जावें ।
निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥
निर्गुणाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य ।
अनन्य होतां होईजे धन्य । निश्चयेंसीं ॥ १२ ॥
सकळ केलियाचें सार्थक । देव वोळखावा येक ।
आपण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥
देव पाहातां निराकार । आपला तो माईक विचार ।
सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥ १४ ॥
आतां अनुमान तो काई । वस्तु आहे वस्तुचा ठाईं ।
देहभाव कांहींच नाहीं । धांडोळितां ॥ १५ ॥
सिद्धास आणी साधन । हा तों अवघाच अनुमान ।
मुक्तास आणी बंधन । आडळेना ॥ १६ ॥
साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें ।
आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७ ॥
कुल्लाळ पावला राजपदवी । आतां रासभें कासया राखावी ।
कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥
तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनांचा उपाव ।
साध्य जालियां कैंचा ठाव । साधनांसी ॥ १९ ॥
साधनें काये साधावें । नेमें काये फळ घ्यावें ।
आपण वस्तु भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥
देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा ।
परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥
उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेतां कांहींच नसे ।
तत्वें तत्व निरसे । पुढें निखळ आत्मा ॥ २२ ॥
आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें ।
माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥
ऐसें अवघेंचि आहे । आणी आपण हि कोणीयेक आहे ।
हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥
शोधूं जाणें सकळांसी। परी पाहों नेणे आपणासी ।
ऐक ज्ञानी येकदेसी । वृत्तिरूपें ॥ २५ ॥
तें वृत्तिरूप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें ।
प्रकृतिनिरासें अवघेंचि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥
उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण ।
ऐसी हे परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥
फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक ।
फ्ळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे ॥ २८ ॥
रंक होता राजा जाला । वरें पाहातां प्रत्यय आला ।
रंकपणाचा गल्बला । रंकीं करावा ॥ २९ ॥
वेद शास्त्रें पुराणें । नाना साधनें निरूपणें ।
सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥
तें ब्रह्मरूप आपणचि आंगें । सारासारविचारप्रसंगें ।
करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
रंक राजआज्ञासि भ्यालें । तेंचि पुढें राजा जालें ।
मग तें भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥
वेदें वेदाज्ञेनें चालावें सच्च्हास्त्रें शास्त्र अभ्यासावें ।
तीर्थें तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥
अमृतें सेवावें अमृत । अनंतें पाहावा अनंत ।
भगवंतें लक्षावा भगवंत । कोणा प्रकारें ॥ ३४ ॥
संत असंत त्यागावे । निर्गुणें निर्गुणासी भंगावें ।
स्वरूपें स्वरूपीं रंगावें । कोण्या प्रकारें ॥ ३५ ॥
अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन ।
निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥
साध्य करावें साधनासी । ध्येयें धरावें ध्यानासी ।
उन्मनें आवरावें मनासी । कोण्या प्रकारें ॥ ३७ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्थितिनिरूपणनाम समास दहावा ॥
॥ दशक नववा समाप्त ॥