Samas 2
समास 2 - समास दुसरा : ब्रह्मनिरूपण
समास 2 - दशक ९
समास दुसरा : ब्रह्मनिरूपण॥ श्रीराम ॥
जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांतीं नासे ।
स्वरूप तें असतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥
जें सकळांमधें सार । मिथ्या नव्हे तें साचार ।
जें कां नित्य निरंतर । संचले असे ॥ २ ॥
तें भगवंताचें निजरूप । त्यासि बोलिजे स्वरूप ।
याहि वेगळे अमूप । नामें तयाचीं ॥ ३ ॥
त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत ।
परी तें स्वरूप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥
दृश्यसबाह्य संचलें । परी तें विश्वास चोरले ।
जवळिच नाहीसें जालें । असतचि कैसें ॥ ५ ॥
ऐसा ऐकोनियां देव । उठे दृष्टीचा भाव ।
पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि आवघें ॥ ६ ॥
दृष्टीचा विषयो दृश्य । तोचि जालिया सादृश्य ।
तेणें दृष्टी पावे संतोष । परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥
दृष्टीस दिसे तें नासे । येतद्विषईं श्रुति असे ।
म्हणौन जें दृष्टीस दिसे । तें स्वरूप नव्हे ॥ ८ ॥
स्वरूप तें निराभास । आणी दृश्य भासलें साभास ।
भासास बोलिलें नास । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥
आणी पाहातां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे ।
स्वानुभवें पाहातां दिसे । तें दृश्यासबाह्य ॥ १० ॥
जें निराभास निर्गुण । त्याची काये सांगावी खूण ।
परी तें स्वरूप जाण । सन्निधचि असें ॥ ११ ॥
जैसा आकाशीं भासला भास । आणी सकळांमध्यें आकाश ।
तैसा जाणिजे जगदीश । सबाह्य अभ्यांतरीं ॥ १२ ॥
उदकामधें परी भिजेना । पृथ्वीमधें परी झिजेना ।
वन्हीमधें परी सिजेना । स्वरूप देवाचें ॥ १३ ॥
तें रेंद्यामधें परी बुडेना । तें वायोमधें परी उडेना ।
सुवर्णीं असे परी घडेना । सुवर्णासारिखें ॥ १४ ॥
ऐसें जें संचलें सर्वदा । परी ते आकळेना कदा ।
अभेदामाजीं वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥
तिच्या स्वरूपाची खूण । सांगों कांहीं वोळखण ।
अहंतेचें निरूपण । सावध ऐका ॥ १६ ॥
जे स्वरूपाकडे पावे । अनुभवासवें झेंपावे ।
अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी ॥ १७ ॥
म्हणे आतां मीच स्वरूप । तेंचि अहंतेचें रूप ।
निराकारीं आपे ंआप । वेगळी पडे ॥ १८ ॥
स्वयें मीच आहे ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम ।
ऐसियें सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहातां दिसे ॥ १९ ॥
कल्पना आकळी हेत । वस्तु कल्पनातीत ।
म्हणौन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥
अन्वये आणि वीतरेक । हा शब्द कोणीयेक ।
निशब्दाच अंतरविवेक । शोधिला पाहिजे ॥ २१ ॥
आधीं घेईजे वाच्यंश । मग वोळखिजे लक्ष्यांश ।
लक्ष्यांशीं पाहातां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥
सर्वब्रह्म आणी विमळब्रह्म । हा वाच्यांशाचा अनुक्रम ।
शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नसे ॥ २३ ॥
सर्व विमळ दोनी पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष ।
लक्ष्यांशी लावीता लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥
हें लक्ष्यांशें अनुभवणें । येथें नाहीं वाच्यांश बोलणे ।
मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैंचा ॥ २५ ॥
परा पश्यंती मधेमां वैखरी । जेथें वोसरती च्यारी ।
तेथें शब्द कळाकुंसरी । कोण काज ॥ २६ ॥
शब्द बोलतां सवेंच नासे । तेथें शाश्वतता कोठें असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । बरें पाहा । २७ ॥
शब्द प्रत्यक्ष नासिवंत । म्हणोन घडे पक्षपात ।
सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८ ॥
ऐक अनुभवाचें लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्य जाण ।
ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे॥ २९ ॥
अनन्य म्हणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें ।
संगभंगें असतचि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥
आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि निःसंगाचें लक्षण ।
हें वाच्यांशें बोलिले जाण । कळावया कारणें ॥ ३१ ॥
येरवीं लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडे कैसें ।
वाक्य विवरणें अपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥
करावें तत्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण ।
पाहावें आपणास आपण । म्हणिजे कळे ॥ ३३ ॥
हें न बोलतांच विवरिजे । विवरोन विरोन राहिजे ।
मग अबोलणेंचि साजे । माहापुरुषीं ॥ ३४ ॥
शब्दचि निशब्द होती । श्रुति नेति नेति नेति म्हणती ।
हें तों आलें आत्मप्रचिती । प्रत्यक्ष आतां ॥ ३५ ॥
प्रचित आलियां अनुमान । हा तों प्रत्यक्ष दुराभिमान ।
तरी आतां मी अज्ञान । मज कांहींच न कळे ॥ ३६ ॥
मी लटिका माझें बोलणें लटिकें । मी लटिका माझें चालणें लटिकें ।
मी माझें अवघेंचि लटिकें । काल्पनिक ॥ ३७ ॥
मज मुळींच नाहीं ठाव । माझे बोलणें अवघेंचि वाव ।
हा प्रकृतीचा स्वभाव । प्रकृती लटिकी ॥ ३८ ॥
प्रकृती आणी पुरुष । यां दोहींस जेथें निरास ।
तें मीपण विशेष । हें केवि घडे ॥ ३९ ॥
जेथें सर्व हि अशेष जालें । तेथें विशेष कैंचे आलें ।
मी मौनी म्हणतां भंगलें । मौन्य जैसें ॥ ४० ॥
आतां मौन्य न भंगावें । करून कांहींच न करावें ।
असोन निशेष नसावें । विवेकबळें ॥ ४१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
ब्रह्मनिरूपणनाम समास दुसरा ॥