उपासना

Samas 3

समास 3 - समास तिसरा : निःसंदेह निरूपण

समास 3 - दशक ९

समास तिसरा : निःसंदेह निरूपण॥ श्रीराम ॥

श्रोतीं केला अनुमान । ऐसें कैसें ब्रह्मज्ञान ।

कांहींच नाहीं असोन । हें केवि घडे ॥ १ ॥

सकळ करून अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता ।

सकळांमधें अलिप्तता । येईल कैसी ॥ २ ॥

तथापि तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता ।

स्वर्गनरकहि आतां । येणेंचि न्यायें ॥ ३ ॥

जन्म मृत्यु भोगिलेच भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी ।

यातना हि तयालागीं । येणेंचि पाडें ॥ ४ ॥

कुटून नाहीं कुटिला । रडोन नाहीं रडला ।

कुंथोन नाहीं कुंथिला । योगेश्वर ॥ ५ ॥

जन्म नसोन घातला । पतित नसोन जाला ।

यातना नसोन पावला । नानापरी ॥ ६ ॥

ऐसा श्रोतयांचा अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान ।

आतां याचें समाधान । केलें पाहिजे ॥ ७ ॥

वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें ।

परी हें तुमच्याच अनुभवें । तुम्हास घडे ॥ ८ ॥

ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा ।

संपदेविण हो धिवसा । तो निरार्थक ॥ ९ ॥

नाहीं ज्ञानाची संपदा । अज्ञानदारिद्रें आपदा ।

भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें ॥ १० ॥

योगी वोळखावा योगेश्वरें । ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्वरें ।

माहाचतुर तो चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥

अनुभवी अनुभवियास कळे । अलिप्त अलिप्तपणें निवळें ।

विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥

बद्धासारिखा सिद्ध । आणी सिद्धासारिखा बद्ध ।

येक भावील तो अबद्ध । म्हणावाच नलगे ॥ १३ ॥

झडपला तो देहधारी । आणी देहधारक पंचाक्षरी ।

परंतु दोघां येकसरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥

तैसा अज्ञान पतित । आणी ज्ञानी जीवन्मुक्त ।

दोघे समान मानील तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥

आतां असो हे दृष्टांत । प्रचित बोलों कांहीं हेत ।

येथें श्रोतीं सावचित्त । क्षणयेक व्हावें ॥ १६ ॥

जो जो ज्ञानें गुप्त जाला । जो विवेकें विराला ।

जोअनन्यपणें उरला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥

तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि व्हावें ।

तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥

देहीं पाहातां देसिना । तत्वें शोधितां भासेना ।

ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्यां ॥ १९ ॥

दिसतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं ।

तयास पाहातां वरिवरी । कळेल कैसा ॥ २० ॥

कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर ।

जयास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥

तो परमात्मा केवळ । तयास नाहीं मायामळ ।

अखंड हेतूचा विटाळ । जालाच नाहीं ॥ २२ ॥

ऐसा जो योगीराज । तो आत्मा सहजीं सहज ।

पूर्णब्रह्म वेदबीज । देहाकारें कळेना ॥ २३ ॥

देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।

तयास शोधितां नसे । जन्म मरण ॥ २४ ॥

जयास जन्ममरण व्हावें । तें तो नव्हेचि स्वभावें ।

नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥

निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ।

तरी उडाला आणी जन्मला । आपला आपण ॥ २६ ॥

माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणांच वरी ।

दुसयास चिंतितां अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥

समर्थ रायाचे महिमान । जाणतां होते समाधान ।

परंतु भुंकों लागलें स्वान । तरी तें स्वानचि आहे ॥ २८ ॥

ज्ञानी तो सत्यस्वरूप । अज्ञान देखे मनुष्यरूप ।

भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥

देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।

पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥ ३० ॥

देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।

परंतु बहुविध जाला । हें तों घडेना ॥ ३१ ॥

तैसा साधु आत्मज्ञानी । बोधें पूर्ण समाधानी ।

विवेकें आत्मनिवेदनी । आत्मरूपी ॥ ३२ ॥

जळोन काष्ठाचा आकार । अग्नि दिसे काष्ठाकार ।

परी काष्ठ होईल हा विचार । बोलोंच नये ॥ ३३ ॥

कर्पूर असे तों जळतां दिसे । तैसा ज्ञानीदेह भासे ।

तयास जन्मवितां कैसें । कर्दळीउदरीं ॥ ३४ ॥

बीज भाजलें उगवेना । वस्त्र जळालें उकलेना ।

वोघ निवडितां निवडेना । गंगेमधें ॥ ३५ ॥

वोघ गंगेमागें दिसे । गंगा येकदेसी असे ।

साधु कांहींच न भासे । आणी आत्मा सर्वगत ॥ ३६ ॥

सुवर्ण नव्हे लोखंड । साधूस जन्म थोतांड ।

अज्ञान प्राणी जडमूढ । तयास हें उमजेचिना ॥ ३७ ॥

अंधास कांहींच न दिसे । तरी ते लोक आंधळे कैसे ।

सन्नपातें बरळतसे । सन्नपाती ॥ ३८ ॥

जो स्वप्नामधें भ्याला । तो स्वप्नभयें वोसणाला ।

तें भये जागत्याला । केवि लागे ॥ ३९ ॥

मुळी सर्पाकार देखिली । येक भ्याला येकें वोळखिली ।

दोघांची अवस्था लेखिली । सारिखीच कैसी ॥ ४० ॥

हतीं धरितां हि डसेना । हें येकास भासेना ।

तरी ते त्याची कल्पना । तयासीच बाधी ॥ ४१ ॥

विंचु सर्प डसला । तेणें तोचि जाकळला ।

तयाचेनि लोक जाला । कासावीस कैसा ॥ ४२ ॥

आतां तुटला अनुमान । ज्ञानियास कळे ज्ञान ।

अज्ञानास जन्ममरण । चुकेचिना ॥ ४३ ॥

येका जाणण्यासाठीं । लोक पडिले अटाटीं ।

नेणपणें हिंपुटी होती । जन्ममृत्यें ॥ ४४

तेंचि कथानुसंधान । पुढें केलें परिच्हिन्न ।

सावधान सावधान । म्हणे वक्ता ॥ ४५ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

निःसंदेहनिरूपणनाम समास तिसरा ॥

20px