उपासना

Samas 4

समास 4 - समास चौथा : जाणपणनिरूपण

समास 4 - दशक ९

समास चौथा : जाणपणनिरूपण॥ श्रीराम ॥

पृथ्वीमधें लोक सकळ । येक संपन्न येक दुर्बळ ।

येक निर्मळ येक वोंगळ । काय निमित्य ॥ १ ॥

कित्येक राजे नांदती । कित्येक दरिद्र भोगिती ।

कितीयेकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमोद्धम ॥ २ ॥

ऐसें काय निमित्य जालें । हें मज पाहिजे निरोपिलें ।

याचे उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥

हे सकळ गुणापासीं गती । सगुण भाग्यश्री भोगिती ।

अवगुणास दरिद्रप्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥

जो जो जेथें उपजला । तो ते वेवसाईं उमजला ।

तयास लोक म्हणती भला । कार्यकर्ता ॥ ५ ॥

जाणता तो कार्य करी । नेणतां कांहींच न करी ।

जाणता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥

हें तों प्रकटचि असे । जनीं पाहातां प्रत्यक्ष दिसे ।

विद्येवीण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥

आपुली विद्या न सिकसी । तरी काये भीक मागसी ।

जेथें तेथें बुद्धी ऐसी । वडिलें सांगती ॥ ८ ॥

वडिल आहे करंटा । आणी समर्थ होये धाकुटा ।

कां जे विद्येनें मोटा । म्हणोनिया ॥ ९ ॥

विद्या नाही बुद्धी नाही । विवेक नाहीं साक्षेप नाहीं ।

कुशळता नाहीं व्याप नाहीं । म्हणौन प्राणी करंटा ॥ १० ॥

इतुकें हि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे ।

वैभव सांडितां अपैसें । पाठीं लागे ॥ ११ ॥

वडिल समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी ।

वडिला ऐसा व्याप न करी । म्हणोनियां ॥ १२ ॥

जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव ।

तोलासारिखा हावभाव । लोक करिती ॥ १३ ॥

विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे ।

करंटेपणें वोखटा दिसे । वोंगळ आणी विकारी ॥ १४ ॥

पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ ।

गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ॥ १५ ॥

गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं ।

कुशळता नाहीं तर्क नाहीं । प्राणीमात्रासी ॥ १६ ॥

याकारणें उत्तम गुण । तेंचि भाग्याचें लक्षण ।

लक्षणेवीण अवलक्षण । सहजचि जालें ॥ १७ ॥

जनामधें तो जाणता । त्यास आहे मान्यता ।

कोणी येक विद्या असतां । महत्व पावे ॥ १८ ॥

प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि समर्थ ।

नेणता जाणिजे वेर्थ । निःकारण ॥ १९ ॥

नेणतां विंचु सर्प डसे । नेणतां जीवघात असे ।

नेणतां कार्य नासे । कोणी येक ॥ २० ॥

नेणतां प्राणी सिंतरे । नेणपणें तर्ह्हे भरे ।

नेणपणे ठके विसरे । पदार्थ कांहीं ॥ २१ ॥

नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपाईं पडती ।

नेण्तां संव्हारती घडती । जीवनास ॥ २२ ॥

आपुले स्वहित न कळे जना । तेणें भोगिती यातना ।

ज्ञान नेणतां अज्ञाना । अधोगती ॥ २३ ॥

मायाब्रह्म जीवशिव । सारासार भावाभाव ।

जाटिल्यासाठीं होतें वाव । ज्न्ममरण ॥ २४ ॥

कोण कर्ता निश्चयेंसीं । बद्ध मोक्ष तो कोणासी ।

ऐसें जाणतां प्राणीयासी । सुटिकां घडे ॥ २५ ॥

जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण ।

जाणिजे अनन्यलक्षण । म्हणिजे मुक्त ॥ २६ ॥

जितुकें जाणोन सांडिलें । तितुकें दृश्य वोलांडिलें ।

जाणत्यास जाणतां तुटलें । मूळ मीपणाचें ॥ २७ ॥

न जाणतां कोटीवरी । साधनें केलीं परोपरीं ।

तरी मोक्षास अधिकारी । होणार नाहीं ॥ २८ ॥

मायाब्रह्म वोळखावें । आपणास आपण जाणावें

इतुक्यासाठीं स्वभावें । चुके जन्म ॥ २९ ॥

जाणतां समर्थाचें अंतर । प्रसंगें वर्ते तदनंतर ।

भाग्य वैभव अपार । तेणेचि पावे ॥ ३० ॥

म्हणौन जाणणें नव्हे सामान्य । जाणतां होईजे सर्वमान्य ।

कांहींच नेणतां अमान्य । सर्वत्र करिती ॥ ३१ ॥

पदार्थ देखोन भूत भावी । नेणतें झडपोन प्राण ठेवी ।

मिथ्या आहे उठाठेवी । जाणते जाणती ॥ ३२ ॥

जाणत्यास कळे वर्म । नेण्त्याचें खोटें कर्म ।

सकळ कांहीं धर्माधर्म । जाणतां कळे ॥ ३३ ॥

नेणत्यास येमयातना । जाणत्यास कांहींच लागेना ।

सकळ जाणोन विवंचना । करी तो मुक्त ॥ ३४ ॥

नेणतां कांहीं राजकारण । अपमान करून घेती प्राण ।

नेणतां कठीण वर्तमान । समस्तांस होये ॥ ३५ ॥

म्हणोनियां नेणणें खोटें । नेणते प्राणी करंटे ।

जाणतां विवरतां तुटे । जन्ममरण ॥ ३६ ॥

म्हणोन अलक्ष करूं नये । जाणणें हाचि उपाये ।

जाणतां सापडें सोये । परलोकाची ॥ ३७ ॥

जाणणें सकळांस प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण ।

परंतु अलिप्तपणाची खूण । जाणतां कळे ॥ ३८ ॥

येक जाणणें करून परतें । कोण सोडी प्राणीयातें ।

कोणी येक कार्य जें तें । जाटिल्याविण न कळे ॥ ३९ ॥

जाणणें म्हणिजे स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण ।

दोहींमधें कोण प्रमाण । शाहाणे जाणती ॥ ४० ॥

जाणते लोक ते शाहाणे । नेणते वेडे दैन्यवाणे ।

विज्ञान तेहि जाणपणें । कळो आलें ॥ ४१ ॥

जेथें जाणपण खुंटलें । तेथें बोलणें हि तुटलें ।

हेतुरहित जालें । समाधान ॥ ४२ ॥

श्रोतें म्हणती हें प्रमाण । जालें परम समाधान ।

परी पिंडब्रह्मांड ऐक्यलक्षण । मज निरोपावें ॥ ४३ ॥

ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे । बहुत बोलती ऐसें ।

परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

जाणपणनिरूपणनाम समास चवथा ॥

20px