उपासना

Samas 5

समास 5 - समास पाचवा : अनुमाननिर्शन

समास 5 - दशक ९

समास पाचवा : अनुमाननिर्शन॥ श्रीराम ॥

पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । नये आमुच्या अनुमाना ।

प्रचित पाहातां नाना । मतें भांबावती ॥ १ ॥

जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । ऐसी बोलावयाचि प्रौढी ।

हें वचन घडिनें घडी । तत्वज्ञ बोलती ॥ २ ॥

पिंड ब्रह्मांड येक राहाटी । ऐसी लोकांची लोकधाटी ।

परी प्रत्ययाचे परीपाटीं । तगों न सके ॥ ३ ॥

स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । हे च्यारी पिंडींचे देह जाण ।

विराट हिरण्य अव्याकृत मूळप्रकृती हे खूण । ब्रह्मांडींची ॥ ४ ॥

हे शास्त्राधाटी जाणावी । परी प्रचित कैसी आणावी ।

प्रचित पाहातां गथागोवी । होत आहे ॥ ५ ॥

पिंडीं आहे अंतःकरण । तरी ब्रह्मांडीं विष्णु जाण ।

पिंडीं बोलिजेतें मन । तरी ब्रह्मांडीं चंद्रमा ॥ ६ ॥

पिंडीं बुद्धी ऐसें बोलिजे । तरी ब्रह्मांडीं ब्रह्मा ऐसें जाणिजे ।

पिंडीं चित्त ब्रह्मांडीं वोळखिजे । नारायेणु ॥ ७ ॥

पिंडीं बोलिजे अहंकार । ब्रह्मांडीं रुद्र हा निर्धार ।

ऐसा बोलिला विचार । शास्त्रांतरीं ॥ ८ ॥

तरी कोण विष्णूचें अंतःकर्ण । चंद्राचें कैसें मन ।

ब्रह्मयाचे बुद्धीलक्षण । मज निरोपावें ॥ ९ ॥

नारायणाचें कैसें चित्त । रुद्राहंकाराचा हेत ।

हा विचार पाहोन नेमस्त । मज निरोपावा ॥ १० ॥

प्रचितनिश्चयापुढें अनुमान । जैसें सिंहापुढें आलें स्वान ।

खयापुढें खोटें प्रमाण । होईल कैसें ॥ ११ ॥

परी यास पारखी पाहिजे । पारखीनें निश्चय लाहिजे ।

परिक्षा नस्तां राहिजे । अनुमानसंशईं ॥ १२ ॥

विष्णु चंद्र आणी ब्रह्मा । नारायेण आणी रुद्रनामा ।

यां पाचांची अंतःकर्णपंचकें आम्हा । स्वामी निरोपावीं ॥ १३ ॥

येथें प्रचित हें प्रमाण । नलगे शास्त्राचा अनुमान ।

अथवा शास्त्रीं तरी पाहोन । प्रत्ययो आणावा ॥ १४ ॥

प्रचितीवीण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।

तोंड पसरून जैसें सुणें । रडोन गेलें ॥ १५ ॥

तेथें काये हो ऐकावें । आणी काये शोधून पाहावें ।

जेथें प्रत्यायाच्या नावें । सुन्याकार ॥ १६ ॥

आवघें आंधळेचि मिळाले । तेथें डोळसाचें काय चाले ।

अनुभवाचे नेत्र गेले । तेथें अंधकार ॥ १७ ॥

नाही दुग्ध नाही पाणी । केली विष्ठेची सारणी ।

तेथें निवडावयाचे धनी । ते एक डोंबकावळे ॥ १८ ॥

आपुले इच्हेनें बोलिलें । पिंडाऐसे ब्रह्मांड कल्पिले ।

परी तें प्रचितीस आलें । कोण्या प्रकारें ॥ १९ ॥

म्हणोन हा अवघाच अनुमान । अवघें कल्पनेचें रान ।

भलीं न घ्यावें आडरान । तश्करीं घ्यावें ॥ २० ॥

कल्पून निर्मिले मंत्र । देव ते कल्पनामात्र ।

देव नाहीं स्वतंत्र । मंत्राधेन ॥ २१ ॥

येथें न बोलतां जाणावें । बोलणें विवेका आणावें ।

आंधळें पाउलीं वोळखावें । विचक्षणें ॥ २२ ॥

जयास जैसें भासलें । तेणें तैसें कवित्व केलें ।

परी हें पाहिजे निवडिलें । प्रचितीनें ॥ २३ ॥

ब्रह्म्यानें सकळ निर्मिलें । ब्रह्म्यास कोणें निर्माण केलें ।

विष्णूनें विश्व पाळिलें । विष्णूस पाळिता कवणु ॥ २४ ॥

रुद्र विश्वसंव्हारकर्ता । परी कोण रुद्रास संव्हारिता ।

कोण काळाचा नियंता । कळला पाहिजे ॥ २५ ॥

याचा कळेना विचार । तों अवघा अंधकार ।

म्हणोनियां सारासार । विचार करणें ॥ २६ ॥

ब्रह्मांड स्वभावेंचि जालें । परंतु हें पिंडाकार कल्पिलें ।

कल्पिलें परी प्रत्यया आलें । नाहीं कदा ॥ २७ ॥

पाहातां ब्रह्मांडाची प्रचिती । कित्येक संशय उठती ।

हें कल्पनिक श्रोतीं । नेमस्त जाणावें ॥ २८ ॥

पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । कोण आणितो अनुमाना ।

ब्रह्मांडीं पदार्थ नाना । ते पिंडीं कैंचे ॥ २९ ॥

औटकोटी भुतावळी । औटकोटी तीर्थावळी ।

औटकोटी मंत्रावळी । पिंडीं कोठें ॥ ३० ॥

तेतीस कोटी सुरवर । अठ्यांसि सहस्त्र ऋषेश्वर ।

नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ॥ ३१ ॥

च्यामुंडा च्हपन्न कोटी । कित्येक जीव कोट्यानुकोटी ।

चौयासी लक्ष योनींची दाटी । पिंडीं कोठें ॥ ३२ ॥

ब्रह्मांडीं पदार्थ निर्माण जाले । पृथकाकारें वेगळाले ।

तेहि तितुके निरोपिले । पाहिजेत पिंडीं ॥ ३३ ॥

जितुक्या औषधी तितुकीं फळे । नाना प्रकारीं रसाळें ।

नाना बीजें धान्यें सकळें । पिंडीं निरोपावीं ॥ ३४ ॥

हें सांगतां पुरवेना । तरी उगेंचि बोलावेना ।

बोलिलें न येतां अनुमाना । लाजिरवाणें ॥ ३५ ॥

तरी हें निरोपिलें नवचे । फुकट बोलतां काय वेचे ।

याकारणें अनुमानाचें । कार्य नाहीं ॥ ३६ ॥

पांच भूतें ते ब्रह्मांडीं । आणि पांचचि वर्तती पिंडीं ।

याची पाहावी रोकडी । प्रचीत आतां ॥ ३७ ॥

पांचा भूतांचे ब्रह्मांड । आणी पंचभूतिक हें पिंड ।

यावेगळें तें उदंड । अनुमानज्ञान ॥ ३८ ॥

जितुकें अनुमानाचें बोलणें । तितुकें वमनप्राये त्यागणें ।

निश्चयात्मक तेंचि बोलणें । प्रत्ययाचें ॥ ३९ ॥

जेंचि पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । प्रचित नाहीं कीं रोकडी ।

पंचभूतांची तांतडी । दोहीकडे ॥ ४० ॥

म्हणोनि देहींचें थानमान । हा तों अवघाचि अनुमान ।

आतां येक समाधान । मुख्य तें कैसें ॥ ४१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

अनुमाननिर्शननाम समास पांचवा

20px