उपासना

Samas 6

समास 6 - समास सहावा : गुणरूपनिरूपण

समास 6 - दशक ९

समास सहावा : गुणरूपनिरूपण

॥ श्रीराम ॥

आकाश जैसें निराकार । तैसा ब्रह्माचा विचार ।

तेथें वायोचा विकार । तैसी मूळमाया ॥ १ ॥

हें दासबोधीं असे बोलिलें । ज्ञानदशकीं प्रांजळ केलें ।

मूळमायेंत दाखविलें । पंचभूतिक ॥ २ ॥

तेथें जाणीव तो सत्वगुण । मध्य तो रजोगुण ।

नेणीव तमोगुण । जाणिजे श्रोतीं ॥ ३ ॥

म्हणाल तेथें कैंची जाणीव । तरी ऐका याचा अभिप्राव ।

पिंडीं माहाकारण देहीं सर्व । साक्षिणी अवस्था ॥ ४ ॥

तैसी मूळप्रकृती ब्रह्मांडींचें । देह माहाकारण साचें ।

म्हणोन तेथेंजाणीवेचें । अधिष्ठान आलें ॥ ५ ॥

असो मूळमायेभीतरीं । गुप्त त्रिगुण वास करी ।

पष्ट होती संधी चतुरीं । जाणावी गुणक्षोभिणी ॥ ६ ॥

जैस तृणाचा पोटराकळा । पुढें उकलोन होये मोकळा ।

तैसी मूळमाया अवलीळा । गुण प्रसवली ॥ ७ ॥

मूळमाया वायोस्वरूप । ऐक गुणक्षोभिणीचें रूप ।

गुणविकार होतांचि अल्प । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥

पुढें जाणीव मध्यस्त नेणीव । मिश्रित चालिला स्वभाव ।

तेथें मातृकास ठाव । शब्द जाला ॥ ९ ॥

तो शब्दगुण आकाशींचा । ऐसा अभिप्राव येथीचा ।

शब्देंचि वेदशास्त्रांचा । आकार जाला ॥ १० ॥

पंचभूतें त्रिगुणाकार । अवघा वायोचा विकार ।

जाणीवनेणीवेचा विचार । वायोचि करितां ॥ ११ ॥

वायो नस्तां कैंची जाणीव । जाणीव नस्तां कैंची नेणीव ।

जाणीवनेणीवेस ठाव । वायोगुणें ॥ १२ ॥

जेथें मुळीच नाही चळण । तेथें कैंचें जाणीवलक्षण ।

म्हणोनि वायोचा गुण । नेमस्त जाणावा ॥ १३ ॥

येकापासून येक जालें । हें येक उगेंचि दिसोन आलें ।

स्वरूप मुळीच भासलें । त्रिगुणभूतांचें ॥ १४ ॥

ऐसा हा मुळींचा कर्दमु । पुढें पष्टतेचा अनुक्रमु ।

सांगतां येकापासून येक उगमु । हें हि खरें ॥ १५ ॥

वायोच कर्दम बोलिला । तयापासून अग्नि जाला ।

तोहि पाहातां देखिला । कर्दमुचि ॥ १६ ॥

अग्निपासून जालें आप । तेंहि कर्दमस्वरूप ।

आपापासून पृथ्वीचें रूप । तेंहि कर्दमरूपी ॥ १७ ॥

येथें आशंका उठिली । भूतांस जाणीव कोठें देखिली ।

तरी भूतांत जाणीव हे ऐकिली । नाहीं वार्ता ॥ १८ ॥

जाणीव म्हणिजे जाणतें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।

वायोआंगीं सकळ गुण । मागां निरोपिलें ॥ १९ ॥

म्हणोन जाणीवनेणीवमिश्रीत । अवघें चालिलें पंचभूत ।

म्हणोनियां भूतांत । जाणीव असे ॥ २० ॥

कोठें दिसे कोठें न दिसे । परी तें भूतीं व्यापून असे ।

तिक्षण बुद्धी करितां भासे । स्थूळ सुक्ष्म ॥ २१ ॥

पंचभूतें आकारली । भूतीं भूतें कालवलीं ।

तरी पाहातं भासलीं । येक स्थूळ येक सूक्ष्म ॥ २२ ॥

निरोधवायो न भासे । तैसी जणीव न दिसे ।

न दिसे परी ते असे । भूतरूपें ॥ २३ ॥

काष्ठीं अग्नी दिसेना । निरोधवायो भासेना ।

जणीव तैसी लक्षेना । येकायेकीं ॥ २४ ॥

भूतें वेगळालीं दिसती । पाहातां येकचि भासती ।

बहुत धूर्तपणें प्रचिती । वोळखावी ॥ २५ ॥

ब्रह्मापासुन मूळमाया । मूळमायेपासून गुणमाया ।

गुणमायेपासून तया । गुणास जन्म ॥ २६ ॥

गुणापासूनियां भूतें पावली । पष्ट दशेतें ।

ऐसीयांचीं रूपें समस्तें । निरोपिलीं ॥ २७ ॥

आकाश गुणापासून जालें । हें कदापी नाही घडलें ।

शब्दगुणास कल्पिलें । आकाश वायां ॥ २८ ॥

येक सांगतां येकचि भावी । उगीच करी गथागोवी ।

तया वेड्याची उगवी । कोणें करावी ॥ २९ ॥

सिकविल्यां हि कळेना । उमजविल्यां हि उमजेना ।

दृष्टांतेंहि तर्केना । मंदरूप ॥ ३० ॥

भूतांहून भूत थोर । हा हि दाविला विचार ।

परी भूतांवडिल स्वतंत्र । कोण आहे ॥ ३१ ॥

जेथें मूळमाया पंचभूतिक । तेथें काये राहिला विवेक ।

मूळमायेपरतें येक । निर्गुणब्रह्म ॥ ३२ ॥

ब्रह्मीं मूळमाया जाली । तिची लीळा परीक्षिली ।

तंव ने निखळ वोतली । भूतेंत्रिगुणांची ॥ ३३ ॥

भूतें विकारवंत चत्वार । आकाश पाहातां निर्विकार ।

आकाश भूत हा विचार । उपाधीकरितां ॥ ३४ ॥

पिंडीं व्यापक म्हणोन जीव । ब्रह्मांडीं व्यापक म्हणोन शिव ।

तैसाच हाहि अभिप्राव । आकाशाचा ॥ ३५ ॥

उपाधीमचें सापडलें । सूक्ष्म पाहातां भासलें ।

इतुक्यासाठीं आकाश जालें । भूतरूप ॥ ३६ ॥

आकाश अवकाश तो भकास । परब्रह्म तें निराभास ।

उपाधीं नस्ता जें आकाश । तेंचि ब्रह्म ॥ ३७ ॥

जाणीव नेणीव मध्यमान । हेंचि गुणाचें प्रमाण ।

येथें निरोपिलें त्रिगुण । रूपेंसहित ॥ ३८ ॥

प्रकृती पावली विस्तारातें । पुढे येकाचें येकचि होतें ।

विकारवंतचि तयातें । नेम कैंचा ॥ ३९ ॥

काळें पांढरें मेळवितां । पारवें होतें तत्वता ।

काळें पिवळें मेळवितां । हिरवें होये ॥ ४० ॥

ऐसें रंग नानापरी । मेळवितां पालट धरी ।

तैसें दृश्य हें विकारी । विकारवंत ॥ ४१ ॥

येका जीवनें नाना रंग । उमटों लागती तरंग ।

पालटाचा लागवेग । किती म्हणोन पाहावा ॥ ४२ ॥

येका उदकाचे विकार । पाहातां दिसती अपार ।

पांचा भूतांचे विस्तार । चौयासी लक्ष योनी ॥ ४३ ॥

नाना देहाचें बीज उदक । उदकापसून सकळ लोक ।

किडा मुंगी स्वापदादिक । उदकेंचि होयें ॥ ४४ ॥

शुक्लीत शोणीत म्हणिजे नीर । त्या नीराचें हें शरीर ।

नखें दंत अस्तिमात्र । उदकाच्या होती ॥ ४५ ॥

मुळ्यांचे बारीक पागोरे । तेणें पंथें उदक भरे ।

त्या उदकेंचि विस्तारे । वृक्षमात्र ॥ ४६ ॥

अंबवृक्ष मोहरा आले । अवघे उदकाकरितां जाले ।

फळीं फुलीं लगडले । सावकास ॥ ४७ ॥

खोड फोडुन अंबे पाहातां । तेथें दिसेना सर्वथा ।

खांद्या फोडुन फळें पाहातां । वोलीं सालें ॥ ४८ ॥

मुळापासून सेवटवरी । फळ नाहीं तदनंतरीं ।

जळरूप फळ चतुरीं । विवेकें जाणावें ॥ ४९ ॥

तेंचि जळ सेंड्या चढे । तेव्हां वृक्षमात्र लगडे ।

येकाचें येकचि घडे । येणें प्रकारें ॥ ५० ॥

पत्रें पुष्पें फळें भेद । किती करावा अनुवाद ।

सूक्ष्म दृष्टीनें विशद । होत आहे ॥ ५१ ॥

भूतांचे विकार सांगों किती । क्षणक्षणा पालटती ।

येकाचे येकचि होती ॥ नाना वर्ण ॥ ५२ ॥

त्रिगुणभूतांची लटपट । पाहों जातां हे खटपट ।

बहुरूप बहु पालट । किती म्हणोन सांगावा ॥ ५३ ॥

ये प्रकृतीचा निरास । विवेकें वारावा सावकास ।

मग परमात्मा परेश । अनन्यभावें भजावा ॥ ५४ ॥

इथि श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

गुणरूपनिरूपणनाम समास सहावा ॥

20px