उपासना

Samas 7

समास 7 - समास सातवा : विकल्पनिरूपण

समास 7 - दशक ९

समास सातवा : विकल्पनिरूपण॥ श्रीराम ॥

आधी स्थूळ आहे येक । तरी मग अंतःकरण पंचक ।

जाणतेपणाचा विवेक । स्थूळाकरितां ॥ १ ॥

तैसेंचि ब्रह्मांडेंवीण कांहीं । मूळमायेसि जाणीव नाहीं ।

स्थूळाच्या आधारें सर्व हि । कार्य चाले ॥ २ ॥

तें स्थूळचि नस्तां निर्माण । कोठें राहेल अंतःकर्ण ।

ऐसा श्रोतीं केला प्रश्न । याचें उत्तर ऐका ॥ ३ ॥

कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठिभागीं चालती घरें ।

जीव करिती लहानथोरें । शक्तीनुसार ॥ ४ ॥

शंख सिंपी घुला कवडें । आधीं त्यांचें घर घडे ।

किंवा आधीं निर्माण किडे । हें विचारावें ॥ ५ ॥

आधी प्राणी ते होती । मग घरें निर्माण करिती ।

हे तों प्रत्यक्ष प्रचिती । सांगणें नलगे ॥ ६ ॥

तैसें आधी सूक्ष्म जाण । मग स्थूळ होतें निर्माण ।

येणें दृष्टांतें प्रश्न । फिटला श्रोतयांचा ॥ ७ ॥

तव श्रोता पुसे आणीक । जी आठवलें कांहीं येक ।

जन्ममृत्युचा विवेक । मज निरोपावा ॥ ८ ॥

कोण ज्न्मास घालितें । आणी मागुता कोण जन्म घेतें ।

हें प्रत्यया कैसें येतें । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥

ब्रह्मा जन्मास घालितो । विष्णु प्रतिपाळ करितो ।

रुद्र अवघें संव्हारितो । ऐसें बोलती ॥ १० ॥

तरीं हें प्रवृतीचें बोलणें । प्रत्ययास आणी उणें ।

प्रत्यय पाहातां श्लाघ्यवाणें । होणार नाहीं ॥ ११ ॥

ब्रह्म्यास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रतिपाळिलें ।

रुद्रास कोणें संव्हारिलें । माहाप्रळईं ॥ १२ ॥

म्हणौनि हा सृष्टीभाव । अवघा मायेचा स्वभाव ।

कर्ता म्हणों निर्गुण देव । तरी तो निर्विकारी ॥ १३ ॥

म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणचि विस्तारली ।

आणी विचारितां थारली । हें हि घडेना ॥ १४ ॥

आतां जन्मतो तो कोण । कैसी त्याची वोळखण ।

आणी संचिताचें लक्षण । तेंहि निरोपावें ॥ १५ ॥

पुण्याचें कैसें रूप । आणी पापाचें कैसें स्वरूप ।

याहि शब्दाच आक्षेप । कोण कर्ता ॥ १६ ॥

हें कांहींच न ये अनुमाना । म्हणती जन्म घेते वासना ।

परी ते पाहातां दिसेना । ना धरितां न ये ॥ १७ ॥

वासना कामना आणी कल्पना । हेतु भावना मति नाना ।

ऐशा अनंत वृत्ती जाणा । अंतःकर्णपंचकाच्या ॥ १८ ॥

असो हें अवघें जाणीव यंत्र । जाणीव म्हणिजे स्मरणमात्र ।

त्या स्मरणास जन्मसूत्र । कैसें लागे ॥ १९ ॥

देहो निर्माण पांचा भूतांचा । वायो चाळक तयाचा ।

जाणणें हा मनाचा । मनोभाव ॥ २० ॥

ऐसें हें सहजचि घडलें । तत्वांचें गुंथाडें जालें ।

कोणास कोणे जन्मविलें । कोण्या प्रकारें ॥ २१ ॥

तरी हें पाहातां दिसेना । म्हणोन जन्मचि असेना ।

उपजला प्राणी येना । मागुता जन्मा ॥ २२ ॥

कोणासीच जन्म नाहीं । तरी संतसंगें केलें काई ।

ऐसा अभिप्राव सर्वहि । श्रोतयांचा । २३ ॥

पुर्वीं स्मरण ना विस्मरण । मधेंचि हें जालें स्मरण ।

अंतर्यामीं अंतःकर्ण । जाणती कळा ॥ २४ ॥

सावध आहे तों स्मरण । विकळ होतां विस्मरण ।

विस्मरण पडतां मरण । पावती प्राणी ॥ २५ ॥

स्मरण विस्मरण राहिलें । मग देहास मरण आलें ।

पुधें जन्मास घातलें । कोणास कोणें ॥ २६ ॥

म्हणोनी जन्मचि असेना । आणी यातना हि दिसेना ।

अवघी वेर्थचि कल्पना । बळावली ॥ २७ ॥

म्हणौन जन्मचि नाहीं कोणासी । श्रोतयांची आशंका ऐसी ।

मरोन गेलें तें जन्मासी । मागुतें न ये ॥ २८ ॥

वाळलें काष्ठ हिरवळेना । पडिलें फळ तें पुन्हां लागेना ।

तैसें पडिलें शरीर येना । जन्मास मागुतें ॥ २९ ॥

मडकें अवचितें फुटलें । फुटलें तें फुटोनिच गेलें ।

तैसेंचि पुन्हां जन्मलें । नाहीं मनुष्य ॥ ३० ॥

येथें अज्ञान आणी सज्ञान । सारिखेच जालें समान ।

ऐसा बळावला अनुमान । श्रोतयांसी ॥ ३१ ॥

वक्ता म्हणे हो ऐका । अवघें पाषांड करूं नका ।

अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३२ ॥

प्रेत्नेंवीण कार्य जालें । जेविल्यावीण पोट भरलें ।

ज्ञानेंवीण मुक्त जालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥

स्वयें आपण जेविला । त्यास वाटे लोक धाला ।

परंतु हें समस्तांला । घडले पाहिजे ॥ ३४ ॥

पोहणें सिकला तो तरेल । पोहणें नेणें तो बुडेल ।

येथें हि अनुमान करील । ऐसा कवणु ॥ ३५ ॥

तैसें जयास ज्ञान जालें । ते ते तितुकेच तरले ।

ज्याचें बंधनचि तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥

मोकळा म्हणे नाहीं बंधन । आणी प्रत्यक्ष बंदीं पडिले जन ।

त्यांचें कैसें समाधान । तें तुम्ही पाहा ॥ ३७ ॥

नेणे दुसयाची तळमळ । तें मनुष्य परदुःखसीतळ ।

तैसाच हाहि केवळ । अनुभव जाणावा ॥ ३८ ॥

जयास आत्मज्ञान जालें । तत्वें तत्व विवंचिलें ।

खुणेसी पावतांच बाणलें । समाधान ॥ ३९ ॥

ज्ञानें चुके जन्ममरण । सगट बोलणें अप्रमाण ।

वेदशास्त्र आणी पुराण । मग कासयासी ॥ ४० ॥

वेदशास्त्रविचारबोली । माहानुभावांची मंडळी ।

भूमंडळीं लोक सकळी । हें मानीतना ॥ ४१ ॥

अवघें होतां अप्रमाण । मग आपलेंच काय प्रमाण ।

म्हणोन जेथें आत्मज्ञान । तोचि मुक्त ॥ ४२ ॥

अवघे च मुक्त पाहातां नर । हाहि ज्ञाचा उद्गार ।

ज्ञानेंविण तो उद्धार । हूणार नाहीं ॥ ४३ ॥

आत्मज्ञान कळों आले । म्हणोन दृश्य मिथ्या जालें ।

परंतु वेढा लाविलें । सकळास येणें ॥ ४४ ॥

आतां प्रश्न हा फिटला । ज्ञानी ज्ञानें मुक्त जाला ।

अज्ञान तो बांधला । आपले कल्पनेनें ॥ ४५ ॥

विज्ञानासारिखें अज्ञान । आणी मुक्तासारिखें बंधन ।

निश्चयासारिखा अनुमान । मानूंचि नये ॥ ४६ ॥

बंधन म्हणिजे कांहींच नाहीं । परी वेढा लाविलें सर्व हि ।

यास उपावचि नाहीं । कळल्यावांचुनी ॥ ४७ ॥

कांहींच नाहीं आणी बाधी । हेंचि नवल पाहा आधीं ।

मिथ्या जाणिजेना बद्धि । म्हणोन बद्ध ॥ ४८ ॥

भोळा भाव सिद्धी जाव । हा उधाराचा उपाव ।

रोकडा मोक्षाचा अभिप्राव । विवेकें जाणावा ॥ ४९ ॥

प्राणी व्हावया मोकळा । आधीं पाहिजे जाणीवकळा ।

सकळ जाणतां निराळा । सहजचि होये ॥ ५० ॥

कांहींच नेणिजे तें अज्ञान । सकळ जाणिजे तें ज्ञान ।

जाणिव राहातां विज्ञान । स्वयेंचि आत्मा ॥ ५१ ॥

अमृत सेऊन अमर जाला । तो म्हणे मृत्यु कैसा येतो जनाला ।

तैसा विवेकी म्हणे बद्धाला । जन्म तो कैसा ॥ ५२ ॥

जाणता म्हणे जनातें । तुम्हांस भूत कैसे झडपितें ।

तुम्हास वीष कैसें चढतें । निर्विष म्हणे । ॥ ५३ ॥

आधीं बद्धासारिकें व्हावें । मग हें नलगेचि पुसावें ।

विवेक दूरी ठेऊन पाहावें । लक्षण बद्धाचें ॥ ५४ ॥

निजेल्यास चेईला तो । म्हणे हा कां रे वोसणातो ।

अनुभव पाहाणेंचि आहे तो । तरी मग निजोन पाहावा ॥ ५५ ॥

ज्ञात्याची उगवली वृत्ती । बद्धाऐसी न पडेल गुंती ।

भुकेल्याची अनुभवप्राप्ती । धाल्यास नाहीं ॥ ५६ ॥

इतुकेन आशंका तुटली । ज्ञानें मोक्षप्राप्ती जाली ।

विवेक पाहातां बाणली । अंतरस्थिती ॥ ५७ ॥

इथि श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

विकल्पनिरसननाम समास सातवा ॥

20px