Samas 8
समास 8 - समास आठवा : देहांतनिरूपण
समास 8 - दशक ९
समास आठवा : देहांतनिरूपण॥ श्रीराम ॥
ज्ञाता सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धातें ।
बद्धाचें काये जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥
बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें कांहींच नाहीं उरलें ।
जाणिवेचे विस्मरण जालें । मरणापूर्वी ॥ २ ॥
ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका ।
आतां दुश्चीत होऊं नका । म्हणे वक्ता ॥ ३ ॥
पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरूप वासनावृत्ती ।
वासनामिश्रीत प्राण जाती । देह सोडुनिया ॥ ४ ॥
वायोसरिसी वासना गेली । ते वायोरूपेंचि राहिली ।
पुन्हां जन्म घेऊन आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥
कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हां मागुते जीव येती ।
ढकलून दिल्हें तेणें दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥
सर्पदृष्टी जालियां वरी । तीं दिवसां उठवी धन्वंतरी ।
तेव्हां ते माघारी । वासना येते कीं ॥ ७ ॥
कित्येक सेवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती ।
येमलोकींहून आणिती । माघारे प्राणी ॥ ८ ॥
कित्येक पुर्वीं श्रापिले । ते शापें देह पावले ।
उश्रापकाळीं पुन्हां आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥
कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक परकाया प्रवेशले ।
ऐसे आले आणी गेले । बहुत लोक ॥ १०
॥
फुंकल्यासरिसा वायो गेला । तेथें वायोसून निर्माण जाला ।
म्हणोन वायोरूप वासनेला । ज्नम आहे ॥ ११ ॥
मनाच्या वृत्ती नाना । त्यांत जन्म घेते वासना ।
वासना पाहातां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥
वासना जाणिजे जाणिवहेत । जाणीव मुळींचा मूळतंत ।
मूळमायेंत असे मिश्रित । कारणरूपें ॥ १३ ॥
कारणरूप आहे ब्रह्मांडीं । कार्यरूपें वर्ते पिंडीं ।
अनुमानितां तांतडीं । अनुमानेना ॥ १४ ॥
परंतु आहे सूक्ष्मरूप । जैसें वायोचे स्वरूप ।
सकळ देव वायोरूप । आणी भूतसृष्टि ॥ १५ ॥
वायोमधें विकार नाना । वायो पाहातां तरी दिसेना ।
तैसी जाणीववासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥
त्रिगुण आणी पंचभूतें । हे वायोमध्यें मिश्रिते ।
अनुमानेना म्हणोन त्यातें । मिथ्या म्हणों नये ॥ १७ ॥
सहज वायो चाले । तरी सुगंध दुर्गंध कळों आले ।
उष्ण सीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥
वायोचेनि मेघ वोळती । वायोचेनि नक्षत्रें चालती ।
सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायो ॥ १९ ॥
वायोरूपें देवतें भूतें । आंगीं भरती अकस्मातें ।
वीध केलियां प्रेतें । सावध होतीं ॥ २० ॥
वारें निराळें न बोले । देहामधें भरोन डोले ।
आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २१ ॥
राहाणें ब्रह्मणसमंध जाती । राहाणें ठेवणीं सांपडती ।
नाना गुंतले उगवती । प्रत्यक्ष राहाणें ॥ २२ ॥
ऐसा वायोचा विकार । येवंचे कळेना विस्तार ।
सकळ कांहीं चराचर । वायोमुळें ॥ २३ ॥
वायो स्तब्धरूपें सृष्टीधर्ता । वायो चंचळरूपें सृष्टीकर्ता ।
न कळे तरी विचारीं प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥
मुळापासून सेवटवरी । वायोचि सकळ कांहीं करी ।
वायोवेगळें कर्तुत्व चतुरीं मज निरोपावें ॥ २५
॥
जाणीवरूप मूळमाया । जाणीव जाते आपल्या ठाया ।
गुप्त प्रगट होऊनियां । विश्वीं वर्ते ॥ २६ ॥
कोठें गुप्त कोठें प्रगटे । जैसें जीवन उफाळे आटे ।
पुढें मागुता वोघ लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥
तैसाच वायोमधें जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर ।
कोठें विकारें कोठें समीर । उगाच वाजे ॥ २८ ॥
वारीं आंगावरून जाती । तेणें हातपाये वाळती ।
वारां वाजतां करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥
नाना रोगांचीं नाना वारीं । पीडा करिती पृथ्वीवरी ।
वीज कडाडी अंबरीं । वायोमुळें ॥ ३० ॥
वायोकरितां रागोद्धार । कळे वोळखीचा निर्धार ।
दीप लागे मेघ पडे हा चमत्कार । रागोद्धारीं ॥ ३१ ॥
वायो फुंकितां भुली पडती । वायो फुंकितां खांडकें करपती ।
वायोकरितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥
मंत्रें देव प्रगटती । मंत्रें भूतें अखरकिती ।
बाजीगरी वोडंबरी करिती । मंत्रसामर्थ्यें ॥ ३३ ॥
राक्षसांची मावरचना । ते हे देवांदिकां कळेना ।
विचित्र सामर्थ्यें नाना । स्तंबनमोहनादिकें ॥ ३४ ॥
धडचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें ।
नाना विकार सांगावे । किती म्हणोनी ॥ ३५ ॥
मंत्रीं संग्राम देवाचा । मंत्रीं साभिमान ऋषीचा ।
महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥
मंत्रीं पक्षी आटोपिती । मूशकें स्वापदें बांधती ।
मंत्रीं माहसर्प खिळिती । आणी धनलाभ ॥ ३७ ॥
आतां असो हा प्रश्न जाला । बद्धाचा जन्म प्रत्यया आला ।
मागील प्रश्न फिटला । श्रोतयाचा ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहांतनिरूपणनाम समास आठवा ॥