उपासना

Samas 9

समास ९ - समास नववा : संदेहवारण

समास ९ - दशक ९

समास नववा : संदेहवारण॥ श्रीराम ॥

ब्रह्म वारितां वारेना । ब्रह्म सारितां सारेना ।

ब्रह्म कांहीं वोसरेना । येकीकडे ॥ १ ॥

ब्रह्म भेदितां भेदेना । ब्रह्म छेदितां छेदेना ।

ब्रह्म परतें होयेना । केलें तरी ॥ २ ॥

ब्रह्म खंडेना अखंड । ब्रह्मीं नाहीं दुसरें बंड ।

तरी कैसें हें ब्रह्मांड । सिरकलें मधें ॥ ३ ॥

पर्वत पाषाण सिळा सिखरें । नाना स्थळें स्थळांतरें ।

भूगोळरचना कोण्या प्रकारें । जालीं परब्रह्मीं ॥ ४ ॥

भूगोळ आहे ब्रह्मामधें । ब्रह्म आहे भूगोळामधें ।

पाहातं येक येकामधें । प्रत्यक्ष दिसे ॥ ५ ॥

ब्रह्मीं भूगोळें पैस केला । आणी भूगोळहि ब्रह्में भेदिला ।

विचार पाहातां प्रत्यय आला । प्रत्यक्ष आतां ॥ ६ ॥

ब्रह्में ब्रह्मांड भेदिलें । हें तों पाहतां नीटचि जालें ।

परी ब्रह्मास ब्रह्मांडें भेदिलें । हें विपरीत दिसे ॥ ७ ॥

भेदिलें नाहीं म्हणावें । तरी ब्रह्मीं ब्रह्मांड स्वभावें ।

हें सकळांस अनुभवें । दिसत आहे ॥ ८ ॥

तरी हें आतां कैसें जालें । विचारून पाहिजे बोलिलें ।

ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेपवचन ॥ ९ ॥

आतां याचें प्रत्युत्तर । सावध ऐका निरोत्तर ।

येथें पडिले किं विचार । संदेहाची ॥ १० ॥

ब्रह्मांड नाहीं म्हणो तरी दिसे । आणी दिसे म्हणो तरी नासे ।

आतां हें समजती कैसें । श्रोतेजन ॥ ११ ॥

तंव श्रोते जाले उद्दित । आहों म्हणती सावचित्त ।

प्रसंगें बोलों उचित । प्रत्योत्तर ॥ १२ ॥

आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें ।

हें तों घडेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥

आप तेज अथवा पवन । सारूं न सकती गगन ।

गगन पाहातां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥

अथवा कठीण जाली मेदनी । तरी गगनें केली चाळणी ।

पृथ्वीचें सर्वांग भेदूनी राहिलें गगन ॥ १५ ॥

याची प्रचित ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे ।

आकाश जैसें तैसें असे । चळणार नाहीं ॥ १६ ॥

वेगळेपण पाहावें । तयास आकाश म्हणावें ।

अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ॥ १७ ॥

तस्मात आकाश चळेना । भेद गगनाचा कळेना ।

भासलें ब्रह्म तयास जाणा । आकाश म्हणावें ॥ १८ ॥

निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें ।

म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेसाठीं ॥ १९ ॥

कल्पनेसि भासे भास । तितुकें जाणावें आकाश ।

परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥

पंचभूतांमधें वास । म्हणौन बोलिजे आकाश ।

भूतांतरीं जो ब्रह्मांश । तेंचि गगन ॥ २१ ॥

प्रत्यक्ष होतें जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें ।

म्हणओनियां गगनातें । भेदिलें नाहीं ॥ २२ ॥

पृथ्वी विरोन उरे जीवन । जीवन नस्तां उरे अग्न ।

अग्न विझतां उरे पवन । तोहि नसे ॥ २३ ॥

मिथ्या आलें आणी गेलें । तेणें खरें तें भंगलें ।

ऐसें हें प्रचितीस आलें । कोणेंपरी ॥ २४ ॥

भ्रमें प्रत्यक्ष दिसतें । विचार पाहतां काय तेथें ।

भ्रममूळ या जगाअतें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥

भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भेदिलें कोणें काई ।

भ्रमें भेदिलें म्हणतां ठाईं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥

भ्रमाचें रूप मिथ्या जालें । मग सुखें म्हणावें भेदिलें ।

मूळीं लटिकें त्यानें केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥

लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काय गेलें ।

केलें म्हणतांच नाथिलें । शाहाणे जाणती ॥ २८ ॥

सागरामधें खसखस । तैसें परब्रह्मीं दृश्य ।

मतिसारिखा मतिप्रकाश । अंतरीं वाढे ॥ २९ ॥

मती करितां विशाळ । कवळो लागे अंतराळ ।

पाहातां भासे ब्रह्मगोळ । कवीठ जैसें॥ ३० ॥

वृत्ति त्याहून विशाळ । करितां ब्रह्मांड बद्रिफळ ।

ब्रह्माकार होतां केवळ । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥

आपण विवेकें विशाळला । मर्यादेवेगळा जाला ।

मग ब्रह्मगोळ देखिला । वटबीजन्यायें ॥ ३२ ॥

होतां त्याहून विस्तीर्ण । वटबीज कोटिप्रमाण ।

आपाण होतां परिपूर्ण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥

आपण भ्रमें लाहानाळला । केवळ देहधारी जाला ।

तरी मग ब्रह्मांड त्याला । कवळेल कैसें ॥ ३४ ॥

वृत्ती ऐसी वाढवावी । पसरून नाहींच करावी ।

पूर्णब्रह्मास पुरववी । चहूंकडे ॥ ३५ ॥

जंव येक सुवर्ण आणितां । तेणें ब्रह्मांड मढवितां ।

कैसे होईल तें तत्वतां । बरें पाहा ॥ ३६ ॥

वस्तु वृत्तिस कवळे । तेणें वृत्ति फाटोन वितुळे ।

निर्गुण आत्माच निवळे । जैसा तैसा ॥ ३७ ॥

येथें फिटली आशंका । श्रोते हो संदेह धरूं नका ।

अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३८ ॥

विवेकें तुटें अनुमान । विवेकें होये समाधान ।

विवेकें आत्मनिवेदन । मोक्ष लाभे ॥ ३९ ॥

केली मोक्षाची उपेक्षा । विवेकें सारिलें पूर्वपक्षा ।

सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा । प्रमाण न लगे ॥ ४० ॥

हे प्रचितीचीं उत्तरें । कळती सारासारविचारें ।

मननध्यासें साक्षात्कारें । पावन होईजे ॥ ४१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

संदेहवारणनाम समास नववा ॥

20px